अमूर्त कलेला घाबरून त्याची चेष्टा आणि थट्टा करण्याचे वातावरण लहानपणी माझ्या आजूबाजूला पुष्कळ होते. हे मी सांगतो आहे ते नव्वदच्या दशकात स्वत:ला महाराष्ट्राचे सांस्कृतिक केंद्र म्हणवून घेणाऱ्या पुण्यामध्ये. मग इतर ठिकाणच्या परिस्थितीचा विचारच न केलेला बरा. त्याच त्याच जुन्या नाटककारांच्या प्रसिद्ध संहिता उगाळून, त्या झिजवत त्यांच्या उष्णतेवर आपल्या जुन्या आठवणी कुरवाळत रंगभूमीवर फार मोठे काहीतरी केल्याचा आव आणत महाराष्ट्र जगत असला, तरी आधुनिक दृश्यकला, चित्रपट आणि आधुनिक संगीतातील जिवंत प्रयोग याबाबतीत महाराष्ट्र भारतातील अनेक राज्यांपेक्षा ऐंशीच्या दशकातच खूप मागे पडलेला होता. एम. एफ. हुसेनच्या चित्रांची चेष्टा करत बसणे, सध्याच्या काळात काम करणाऱ्या नव्या चित्रकारांची नावेही कुणाला माहिती नसणे, अमूर्त कलाप्रयोगांना फिदीफिदी हसणे, हे मी दहा वर्षांचा मुलगा असताना माझ्या आजूबाजूला घरात आणि शाळेत वातावरण होते.

मुंबईत चालू असलेल्या दृश्यकलेतील मोठय़ा आणि महत्त्वाच्या उलाढाली आपल्या गावीही नव्हत्या. आमच्या शहरातील उद्दाम, उद्धट आणि परंपराप्रिय कलात्मक वातावरणाने उर्वरित जगाचे कोणतेही नुकसान झाले नाही. जगात होणाऱ्या उलाढालींचा परिणाम आधुनिक भारतीय दृश्यकलेवर ठाशीवपणे होत होता. भारतात इतर प्रांतांमधील कलाकार दृश्यकला, चित्रपट तंत्र आणि संगीत या क्षेत्रात खूप पुढचे काम करीत होते.

Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
risk of H5N1 bird flu outbreak Case Was Seen in Hens At Nagpur
कोविडहुन १०० पट जास्त भीषण विषाणू उड्या मारतोय! नागपुरातही आढळलं प्रकरण, तज्ज्ञांचं मत काय?
Boy killed for resisting unnatural act Sheel Daighar police arrests two
अनैसर्गिक कृत्यास विरोध केल्याने मुलाची हत्या, शीळ डायघर पोलिसांनी केली दोघांना अटक

‘रोजा’ हा मणिरत्नम् यांचा चित्रपट जेव्हा पाहिला तेव्हा आमच्या पिढीला आपली महाराष्ट्रातील सांगीतिक आणि दृश्यात्मक तांत्रिक जाणीव किती जुनाट होऊन राहिली आहे हे उमगले. मुंबईत झालेल्या दंगली, बॉम्बस्फोटांची मालिका आणि त्यानंतर बदललेले सामाजिक जीवन, याचा मोठा परिणाम महाराष्ट्रात म्हणजे मुंबईत राहून काम करणाऱ्या अनेक भाषिक आणि अनेक प्रांतीय कलाकारांच्या कामावर झाला. माझ्या पिढीच्या कामाला आणि शहरात जगण्याच्या अनुभवाला मुंबईच्या दंगली आणि स्फोटांनी महत्त्वाचा आकार दिला. आमच्या पिढीच्या मनातील भीती अंधाराची नाही, बॉम्बची आहे. मी दंगलीनंतर कायमच्या अस्थिर आणि अविश्वासू झालेल्या मुंबईतला स्थलांतरित आहे.

माझ्या शालेय काळात माधुरी पुरंदरे यांनी पिकासोचे चरित्र मराठीत आणले नसते, श्री. पु. भागवतांनी ‘कोरा कॅनव्हास’ हे पुस्तक प्रभाकर बरवे यांच्याकडून लिहून घेतले नसते, सुधीर पटवर्धन या प्रयोगशील आणि आधुनिक चित्रकाराने भारतीय चित्रकलेविषयी व्याख्यानाची मालिका गुंफली नसती; तर आमच्या पिढीचे फार मोठे नुकसान झाले असते असे आज मला वाटते. माधुरी पुरंदरे, अरुण खोपकर, सुधीर पटवर्धन, शांता गोखले आणि आजच्या काळात अभिजीत ताम्हणे यांनी आधुनिक भारतीय चित्रकलेविषयी, दृश्यकलेविषयी सतत लिखाण करून, व्याख्याने देऊन, लेख लिहून आमच्यासारख्या अनेक मराठी वाचकांना आणि वर्तमान समजून घेण्याची आसक्ती असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याविषयी जागरूक ठेवले. शांता गोखले आणि अभिजीत ताम्हणे यांचे विशेष आभार मानायला हवेत, याचे कारण- कलेच्या वर्तमानाचे नेमके टिपण आपल्या सकस वृत्तपत्रीय लिखाणातून ते दोघे सातत्याने करीत राहिले. अरुण कोलटकर, दिलीप चित्रे आणि प्रामुख्याने विलास सारंग या त्रयींच्या साहित्यातून आधुनिक दृश्यात्मकता आणि विस्तृत जगाचे पडसाद आमच्यापर्यंत पोचत राहिले. साहित्य, चित्रपट आणि दृश्यकला यातील अमूर्ततेला घाबरायचे नाही. समजून घ्यायचा प्रयत्न करायचा, याची जाणीव या माणसांच्या कामाने आम्हाला करून दिली. याच काळात चंद्रकात काळे आणि आनंद मोडक या दोघांनी मराठी कविता आणि लोकसंगीतामधील गोडी वाढावी आणि त्यातील अंतर्गत दृश्यात्मकता समोर साकारली जावी यासाठी एकामागून एक अप्रतिम सांगीतिक कार्यक्रम सादर केले. अमूर्ततेचे चांगले भान या अनेक लोकांच्या प्रयत्नांमुळे आम्हाला येत गेले.

या सर्व ऊर्जेला आणि उपक्रमांना समजून घ्यायला लहान वयात आम्हाला प्रयत्न करावे लागले. अनेक वेळा पुस्तके आणि चित्रे लोकांकडून मागून वाचावी, पहावी लागली. आमच्या घरी, शाळेत अशी  पुस्तके, चित्रांचे संग्रह नव्हते. गेल्या आठवडय़ात केरळमधील शाळांच्या सहली कोचीनमध्ये बिएनाले पाहायला आल्या होत्या तेव्हा मला बरे वाटले ते या एका कारणाने. लहान वयात त्या मुलांची वर्तमानाशी ओळख होते आहे म्हणून.

मी प्रभाकर बरवे यांची चित्रे मुंबईच्या राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयात भारावल्यासारखी पाहिली आणि ‘कोरा कॅनव्हास’ हे त्यांचे पुस्तक पुन:पुन्हा वाचून काढले होते. अंजली एला मेनन या भारतीय कलाकाराचे काम मी त्यांचे एक छोटे चित्र एका पुस्तकात सापडले म्हणून उठून मुंबईला जाऊन पाहून आलो. घरबसल्या दारापाशी कुणीही काही आणून देत नाही, आपली भूक असेल तर आपल्याला प्रयत्न करावे लागतात. वासुदेव गायतोंडे यांच्या चित्राकडे कसे पहावे याची जाणीव देणारे तेव्हा माझ्या आयुष्यात कुणीही नव्हते.

माझ्या आजूबाजूचे असलेले, साचलेले, निवांत सांस्कृतिक वातावरण माझ्यासाठी घातक आहे, ही जाणीव माधुरी पुरंदरे यांच्या पिकासोच्या मराठीतील चरित्राने पहिल्यांदा मला झाली. एका उन्हाळ्याच्या सुट्टीत हे पुस्तक मी बसून सलग वाचून काढले आणि मला लक्षात आले की, आपण फार साचेबद्ध डबक्याच्या वातावरणात जगत आहोत. आपल्याला त्वेषाने इथून बाहेर पडायला हवे. इंग्रजी भाषा शिकून बोलायचा आणि लिहायचा सराव करून जगात घडणाऱ्या अनेक नव्या गोष्टींशी संपर्क वाढवायला हवा. नाहीतर आपले काही खरे नाही. नव्वद सालातील हे सगळे मला या महिन्यातील कोचीनच्या प्रवासात बिएनाले प्रदर्शन बघताना पुन:पुन्हा आठवत राहिले.

कोचीनच्या कलाप्रदर्शनात एका मोकळ्या जागी भलामोठा पिरॅमिड उभारला आहे- माती आणि शेणाने सारवलेला. आत जायला एक छोटे दार. आपण आत शिरलो की संपूर्ण अंधार. काळामिट्ट. आपोआप आजूबाजूच्या मातीच्या भिंतीचा आधार आपले हात घेतात. आणि आपण वळणे घेत जाणाऱ्या अंधाऱ्या वाटेवरून पुढे पुढे चालत राहतो. आणि सावकाश कानावर अनेक आवाज यायला लागतात. कविता वाचल्या जात आहेत. अनेक भाषांमध्ये. मातीच्या भिंतीमागे स्पीकर दडवले आहेत. त्यातून अनेक कविता वाचले जाण्याचे आवाज येत आहेत. ज्या कवींना त्यांच्या देशामधून हद्दपार केले गेले, त्या जगभरातील अनेक हद्दपार कवींच्या त्या कविता आहेत. संपूर्ण अंधारात अनेक कविता ऐकत ऐकत अरुंद वाटेने आपण पुढे पुढे सरकत राहतो आणि अचानक बाहेर पडतो. युगोस्लावियामधील अलेश ष्टेजेर या कलाकाराने बनवलेले हे इंस्टॉलेशन. माझ्यासाठी या प्रवासातील एक महत्त्वाची आठवण.

सुनील पडवळ या मुंबईतील कलाकाराने अनेक जुन्या वस्तू, फोटो आणि यंत्रे यांच्या मांडणीतून गतकाळातील मुंबई शहराचे सत्त्व दोन दालनामध्ये मांडले आहे. तिथे भिंतीवर टांगलेले जुने दोन टाइपरायटर बघताच माझी बोटे शिवशिवतात. चोरी करावीशी वाटते. ते घेऊन धावत सुटावेसे वाटते. आणि वातावरण असे आहे की, चोरीला मी माझी सादरीकरण कला असे म्हणून न्याय मिळवू शकतो.

राऊल झुरिता या चिले देशातील कलाकाराने एका महाप्रचंड गोदामात जमिनीवर समुद्राचे पाणी भरले आहे. त्या पाण्यातून चालत चालत आपण खूप लांबवर समोरच्या भिंतीवर लिहिलेली एक कविता वाचायला जायचे आहे. ‘Sea Of Pain’ हे त्याचे २०१६ साली बनवलेले इंस्टॉलेशन. सिरीयन निर्वासितांना युरोपमध्ये शिरताना सोसायला लागलेल्या यातना त्या कवितेत उमटल्या आहेत. ती कविता वाचायला आपण तो समुद्र चालत ओलांडायला हवा. मग ती आपल्याला सापडेल.

भरत सिक्का हे आपल्या देशातील एक महत्त्वाचे फोटोग्राफर. त्यांचे काश्मीरमधील दाहक फोटोची मालिका या प्रदर्शनाचा भाग आहे. ते फोटो एका जुन्या मोडकळीला आलेल्या वाडय़ात जीर्ण भिंतीवर लावले आहेत. बिएनालेच्या संचालकांचे हे वैशिष्टय़ आहे कीत्यांनी जुन्या कोचीनमधील वास्तूंचा कलाप्रदर्शनासाठी फार कल्पकतेने वापर करून घेतला आहे.

या बिएनलेच्या आवृत्तीत चिनी कलाकारांनी भव्य आकारात सादर केलेली व्हीडिओ आर्टस्, कलेविषयी असलेल्या आपल्या प्रस्थापित दृष्टीला मोडून फेकून देतील अशी आहेत. त्या व्हीडिओ मधील राक्षसी आकारमानाची दृश्ये आणि भयावह रंगसंगती आपल्याला मोबाईल फोनवर खेळल्या जाणाऱ्या गेम्सच्या जगात घेऊन जाते, पण फार मोठय़ा आकारात, शेकडो फुट लांब अशा पडद्यावर. त्या दृश्य मालिकांना कोणतीही कथा-पटकथा नाही. तंत्रज्ञान आणि सतत येणाऱ्या नवीन उपकरणांच्या काळात उमललेली ती एक न संपणारी अस्वस्थ आणि अथकपणे काही न उलगडता पुढे जात जाणारी चित्रमालिका आहे. कंटाळा आल्यावर हल्ली माणसे वाकडा चेहरा करून मोबाईल बाहेर काढून त्याची रागाने बटने दाबत बसतात तशा भावनेची!

अमूर्ततेच्या सवयीने तुमच्या मनातील परक्या अनुभवाविषयीचा राग कमी होतो. मिसळण आणि भेसळ याविषयी तुम्ही सजग होता. शुद्धतेच्या फंदात पडणे हे वेळ वाया घालवणे आहे, हे आपल्याला लक्षात येऊन फार महत्त्वाचे असे राजकीय आणि सामाजिक भान आपल्या मनात सावकाश उमलत जाते. त्यामुळे शांत अमूर्त अनुभवाची आपल्या समाजाला आणि जगण्याला पूर्वी नको होती तितकी आज गरज आहे, याची जाणीव कोचीनमध्ये होणाऱ्या बिएनालेसारख्या प्रकल्पामुळे मनात तयार होते.

भारतातील हिवाळ्यात घरात बसून राहू नये; उठावे आणि चालू लागावे. मार्च महिना संपेस्तोवर कोचीनला बिएनाले चालू राहणार आहे.

सचिन कुंडलकर kundalkar@gmail.com