माणसाचे नैसर्गिक आयुर्मान वाढले असल्याने, ज्यांना आयुष्यभराच्या कष्टानंतर एक साधारण सांपत्तिक स्थर्य लाभले आहे अशी आजूबाजूची वयाने ज्येष्ठ माणसे सध्याच्या काळात वृद्धत्वाला घाबरत नाहीत, असे दिसून येते. वयाच्या साठीनंतरही अनेक क्षेत्रांत तुम्ही चांगले काम करीत पुढची दहा-पंधरा वष्रे सहजपणे कार्यरत राहू शकता. त्यासाठी इच्छा लागते आणि अंगात बौद्धिक मांद्य आणि आळस नसेल तर फार बरे आयुष्य जाऊ शकते.

प्रश्न उरतो तो जुने होण्याचा. म्हातारे नाही तर जुने. ज्याला इंग्रजीमध्ये ‘आऊटडेटेड’ म्हणतात ते. सध्या सर्व माणसे जर कोणत्या एका गोष्टीला घाबरत असतील तर ती जुने होण्याला घाबरतात; म्हातारे नाही. कारण सध्या काळ असा आहे, की कोणत्याही कार्यक्षेत्रात चाळिशीच्या वरची माणसे ही अडगळ ठरू लागलेली असते. त्यामुळे म्हातारपण वगैरे शब्द आपल्याला घाबरवत नाहीत. चाळीस वर्षांच्या वरील माणसांना सतत वेगाने बदलणाऱ्या काळातील गणिते समजून नवे गिअर सतत टाकावे लागतात, नाही तर आपण फार नकळतपणे कोपऱ्यात सरकवले जातो. वार्धक्य, कुणी घर देता का घर?, मुले घरी विचारत नाहीत असले बावळट प्रश्न आमच्या पिढीला कधीही पडणार नाहीत. सर्वात मोठा प्रश्न उरेल तो म्हणजे- आपल्याला काम करायची ऊर्जा असूनही, आपण सजगपणे स्वतला नव्या जगाशी जुळवून घेत बसण्यात जर कमी पडलो तर कुणीही आपला अपमान करीत नाही किंवा आपल्याला वाईट वागवत नाही, पण फार चलाखीने पन्नाशीला आलेल्या माणसांना जग नकळत हळुवारपणे बाजूला सारून टाकते. त्यासाठी साठी वगैरे येण्याची वाट पाहावी लागत नाही. तुम्ही कार्यरत असता, पण तुम्ही निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत नसता. तुमची सही लागते, पण तुमचे मत नको असते. त्या वयाच्या माणसांना आदर-सन्मान वगैरे दिला, त्यांची जुनी तीच ती मते ऐकून घेतली, त्यांच्या लिखाणाची दोन पुस्तके प्रकाशित केली, त्यांच्या फेसबुकवरील पोस्ट लाइक केल्या, की त्या माणसांना बरे वाटते. पण नवीन ऊर्जा आणि भूमिका तसेच कामाच्या धोरणाची आखणी या बाबतीत आजची पन्नाशीला आलेली पिढी एकारलेली, तर्कट आणि हास्यास्पदरीत्या जुनी होत चालली आहे. याचे कारण त्या पिढीची अ‍ॅनालॉग (Analog) विचारसरणी आणि अतीव जुना आदर्शवाद, जुनी पारंपरिक मूल्यांची चौकट न सोडण्याची इच्छा. या माणसांचा चांगुलपणासुद्धा कंटाळवाणा असतो, कारण त्यावर जुन्या आदर्शवादाची पिवळट साय जमून राहिलेली असते. त्यांचे शरीर तंदुरुस्त असले तरी मन वाळू लागलेले असल्याची सोपी नसíगक अवस्था आलेली असते. भारतात हे घडताना जास्त दिसते, कारण भारतात वय या गोष्टीला फार पूर्वीपासून गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिले गेले आहे. जो वयाने ज्येष्ठ तो जाणता असतो, ही जुनी समजूत बाळगून वयाचा लॉलीपॉप चघळत अनेक माणसे सध्या जीन्स आणि टी-शर्ट घालून पन्नाशीला पोचतात. ही माणसे साधारपणे भारतीय स्वातंत्र्याच्या आसपास दहा-पंधरा वर्षांत जन्मून वाढलेली पिढी आहे. अशी माणसे सध्या भारतात प्रमुख पाहुणे म्हणून जिथे तिथे बोलावली जातात. त्यांना कामात सहभागी करून घेण्यापेक्षा त्यांचा मुलाखती घेणे, त्यांचा सत्कार करणे, त्यांचे सामाजिक मुद्दय़ांवर मत विचारणे, असे सगळे करून त्यांना गुंतवून ठेवता येते आणि नव्या पिढीला काम करायची मोकळीक मिळते हे त्यामागचे सोपे कारण आहे. वय आणि अनुभव, वय आणि शहाणपण याचा संबंध गेल्या पंधरा-वीस वर्षांत मोडीत निघाला आहे.

ही पिढी हल्ली शरीराने अतिशय फीट असते. कुठूनही कुठेही फिरू शकते. भरपूर वेळ बोलू शकते. लोकांचे तासन्तास ऐकू शकते आणि या अनुभवातून त्यांना आपण व्यग्र आहोत असा भास निर्माण होतो. तेवढे त्या पिढीला पुरते. त्यांचा आदर केला की ते आपल्याला फार त्रास देत नाहीत. आजच्या काळात जर सगळ्यात पाप कोणते असेल तर रिकामे असणे. माणसाला रिकामे असण्याची भीती वाटते, कारण रिकाम्या वेळेत करायच्या काही पोषक आणि आवश्यक गोष्टी आपल्याला शिकवलेल्या नसतात. माणसांना छंद नसतात. नवीन गोष्टी शिकण्याची आस नसते. प्रवास करायची सवय नसते. नव्या माणसांशी जुळवून घेण्याची जाण नसते. अनेक माणसे मला माहिती आहेत, ज्यांना आकर्षक लोकसंग्रह करण्याची कलाच माहीत नसते. कारण पसे कमावणे आणि व्यवहार यापलीकडे अनेक माणसांनी आयुष्यभर काही केलेले नसते. आठवडाभर पसा कमवायचा आणि शनिवार-रविवारी झोपायचे किंवा प्यायचे किंवा वृत्तपत्रीय पुरवण्या वाचत चर्चा करायच्या, असे आयुष्य अनेक माणसे सहजपणे जगत आलेली असतात. आदर्शवादाचा भास हा व्हिस्कीच्या ग्लासइतकाच मस्त असतो. अशी माणसे भारतात प्रमुख पाहुणे किंवा सभेचे अध्यक्ष म्हणून बसवण्यास अतिशय मुबलक उपलब्ध असतात असे आपल्याला सध्या दिसते.

जुने होणे ही गोष्ट घडते त्या लोकांच्या बाबतीत ज्यांना आयुष्यभर इतर कुणाच्या तरी संदर्भाने जगण्याची सवय असते. कुटुंब, स्वत उभारलेले आणि वेळच्या वेळी बंद न केलेले व्यवसाय, सामाजिक काम करणाऱ्या संस्था, मित्रमंडळ आणि त्याचे जुने अड्डे. हजारो माणसे ही अशा सामूहिक संदर्भात जगत आलेली असतात. व्यक्ती म्हणून त्यांना सोलून बाजूला ठेवले तर ती वाऱ्यावर उडून जातील अशी त्यांची आयुष्यं असतात. आपण ताजे, नवे किंवा जुने हे लोकांच्या संदर्भाने जगल्यावर होतो. जी माणसे एकल वृत्तीची व शांतपणे स्वतचे मार्ग आणि काम शोधणारी असतात त्यांना या बदलत्या काळात आऊटडेटेड होण्याची कोणतीही शंकासुद्धा येत नाही.

माझ्यासाठी माझ्या माहितीतील अशी दोन हुशार माणसे आहेत. दोन वेगळ्या पिढीतील आणि संपूर्ण वेगळ्या वातावरणात जगणारी. एक आहेत कवी-लेखक आणि दिग्दर्शक गुलजारसाहेब. आणि दुसरे आहेत परममित्र मिलिंद सोमण. ही दोन्ही माणसे त्यांचा अभ्यास करावा इतकी वेगळी आणि हुशार आहेत. बुद्धिमान आहेत, कार्यरत आहेत, शारीरिक पातळीवर अतिशय तंदुरुस्त आहेत. सतत नवीन गोष्टी शोधून एकटय़ाने त्या पार पाडणारी आहेत आणि मुख्य म्हणजे शांत शहाणी आहेत. कमी बडबड करतात. सल्ले आणि सामाजिक शिकवण्या घेत नाहीत. कुणाला काहीही शिकवत नाहीत. कारण त्यांनाच त्यांचा वेळ थोडा आणि स्वप्ने खूप असे झाले आहे. आणि मुख्य म्हणजे रिटायर होण्याचे नाव नाही. याचे कारण स्वतची व्यग्रता आणि काम स्वत निर्माण केले आहे. इतर कुणावरही ते कामासाठी अवलंबून नाहीत. या दोन्ही माणसांचा वर्तमानकाळ हा त्यांच्या भूतकाळाइतकाच आकर्षक आहे. या दोन्ही माणसांना आपण गप्पांचे फड रंगवताना, मुलाखती देताना, टीव्हीवर बरळताना, फेसबुकवर तरुण पोरांशी वाह्यत गप्पा मारताना कधीही पाहणार नाही. अशी माणसे फार पटकन कुणाला आपल्या खांद्यावर हात ठेवू देत नाहीत. आणि आपले बूट उगाच कुठल्याही नव्या पिढीच्या माणसाला घालूच देत नाहीत. ताजी माणसे आहेत ती. (तो मिलिंद सोमण कोण? तो मॉडेल? त्याने ते कपडे काढून फोटो काढले होते तो? असले सिनिकल प्रश्न मनात असणाऱ्या गोडगोजिऱ्या माणसांना तो सध्या काय काम करतो आहे याची माहिती इंटरनेटवर सहजपणे घेता येईल. गुलजार काय करतात हे सांगण्याची गरज पडू नये, पण सर्वात आकर्षक असे काय असेल तर आजही ऐंशीचा टप्पा ओलांडलेले गुलजारसाहेब रोज पहाटे उठून त्वेषाने टेनिस खेळतात आणि घरी येऊन मस्त लिखाण करतात.)

हल्लीच्या काळात कुणी आपला आदर करू लागले, की ती सर्वात मोठी धोक्याची घंटा आहे हे समजावे. म्हणजे आपण प्रमुख पाहुणे व्हायला महाराष्ट्रात लायक झालो आहोत. वर्तमानपत्रातील वेंधळ्या गोड पोरी दुपारच्या वेळी फोन करून ‘‘सर काल अमुकराव असे असे म्हणाले, तर त्यावर तुम्हाला काय वाटते?’’ अशी मते विचारू लागल्या की काळाची घंटा वाजते आहे असे समजावे. तुमच्या हस्ते कुणाला पारितोषिक द्यायला बोलावले तर जवळजवळ अपमान करून फोन बंद करावा. मॅजेस्टिक गप्पा मारायला कोठावळे आपल्याला बोलावतात तेव्हा त्यांनाच आपण चहा-फराळाला घरी बोलवावे व त्यांच्याशी मस्त गप्पा माराव्यात. तिथे विलेपाल्र्यात किंवा पुण्याच्या एस. एम. जोशी सभागृहात जाऊन दिग्गज होऊ नये. कौतुक करून मारून टाकणे ही महाराष्ट्राची फार जुनी परंपरा आहे. त्यामुळे आदरसत्कार आणि नव्या पिढीकडून स्तुती ऐकू येऊ लागली की पटकन पायात पळण्याचे बूट चढवावे आणि दहा किलोमीटर पळून यावे.

सचिन कुंडलकर – kundalkar@gmail.com