इ. स. २००० सालानंतरच्या पिढीने अनुभवलेल्या अस्थिरतेच्या भावनेवरचे हे सदर.. ज्यात व्यक्तिचित्रे, प्रवासवर्णने, सातत्याने बदलते संगीत  आणि सिनेमाचा ऊहापोह असेल. तसेच नवी पुस्तके, तंत्रज्ञान, कलेच्या नव्या बाजारपेठा, बदलती भाषाशैली इत्यादीची चर्चाही. थोडक्यात- तात्पुरतेपण आणि अस्थिरतेचे वरदान लाभलेल्या  पिढीची ही डायरी असेल..

फ्रेंच भाषा शिकायला गेलो तेव्हा त्या भाषेला अंगभूत असणारा खळाळता प्रवाही उत्साह माझ्या मनात होता. बहुदा ती भाषा म्हणजेच तो प्रवाही उत्साह असे मी मनात धरून चाललो होतो. ‘अपूर्वाई’ हे घरातील पुस्तक नऊशे वेळा वाचून फ्रेंच माणूस म्हणजे सतत शाम्पेन पिणारा, उसासे टाकत प्रेम करणारा, एका हाताने सतत चित्रे काढणारा आणि रोज संध्याकाळी निरनिराळ्या प्रेयस्या सोबत घेऊन नाचगाणी करणारा असे काहीसे माझे मत झाले असल्याने मला त्या भाषेचे फार आकर्षण तयार झाले होते. इंग्रजी भाषा आम्हाला शाळेत शिकायला होती. पण इंग्रज माणसांप्रमाणे ती ज्ञान रचना आणि शिस्तीची भाषा होती. प्रेम करायला शिकवणारी फ्रेंच भाषा कुठे आणि कशी शिकतात याचा मला पत्ता नव्हता.

सतराव्या वर्षी मी चित्रपटाच्या सेटवर सहाय्यक म्हणून काम करू लागलो आणि जगभरातील अनेक वेगळ्या सिनेमांशी माझा संपर्क आला. मी पुण्यातील एका चित्रपट महोत्सवात सलग ओळीने न्यू वेव्ह काळातील फ्रेंच सिनेमे पाहत होतो. जान्न मरो या माझ्या आवडत्या नटीचा ‘जूल ए जिम’ (Jules and jim) हा अप्रतिम सिनेमा खाली चालू असलेल्या इंग्रजी सबटायटल्ससकट बघताना मला असे वाटले की, हे काही खरे नाही. मला ही भाषा यायलाच हवी. ही पात्रं काय बोलतात ते मला इंग्रजीशिवाय कळायला हवे म्हणून मी ती शिकायला गेलो. ‘अलियान्स फ्रोन्सेज द पुणे’ या संस्थेत मी पहिल्या वर्गाला प्रवेश घेतला तेव्हा मी सोडून वर्गात सिनेमात रस असलेले कुणीच नव्हते. बहुतेक मुलामुलींना कॅनडियन व्हिसा हवा होता म्हणून ते फ्रेंच शिकत होते. एक मुलगी फेमिना मिस इंडियाची तयारी करीत होती. एक शेफ होता- ज्याला जहाजावर नोकरी हवी होती. प्रत्येकाला एक उद्देश होता. नोकरीचा किंवा व्हिसाचा. मला कोणताच नव्हता. तू का फ्रेंच शिकतोस, यावर मी ‘असाच शिकतो’.. गुलजारांच्या भाषेत ‘‘युं ही’’ असे म्हणायचो.

भाषेला स्वत:चे शरीर असते, आकार असतो आणि स्वभावसुद्धा. प्राथमिक अवस्थेत पुण्यातील अतिशय तळमळीने आणि आवडीने शिकवणाऱ्या शिक्षकांकडून ती भाषा शिकताना मला दडपण वेगळ्याच गोष्टीचे आले होते. आपण भारतात किती कुढत आणि घाबरून जगतो, या गोष्टीचे. मी पाहत असलेल्या आणि ऐकत असलेल्या फ्रेंच सामाजिक जीवनात एक मोकळेपणा आणि बहारदार उत्साह होता. माणसाला त्याची वाढ होण्यासाठी आवश्यक असलेला उद्धटपणा होता. निवड करण्याची मुभा होती. आणि ती वय, आíथक परिस्थिती या मुद्दय़ांपलीकडे सर्वानाच होती.

बारावीच्या सुट्टीत मी डेक्कनवरील एका पुस्तकाच्या दुकानातून गुस्ताव फ्लोबेर या प्रसिद्ध फ्रेंच लेखकाच्या ‘मादाम बोव्हारी’ या कादंबरीचा अनुवाद आणला होता आणि तो वाचून मी भारावून गेलो होतो. भाषा आणि ती भाषा बोलणाऱ्या समाजाचे निर्णय हातात हात घालून चालतात हे मला जाणवू लागले. मग मी मराठी भाषा बोलतो म्हणजे नुसती बोलत नाही, तर मी मराठी समाजाने आखून दिलेले निर्णय नकळतपणे घेतो हे मला लक्षात आले. आणि ही निर्णयप्रक्रिया बदलायला परकीय भाषेचे ज्ञान आपल्याला मदत करेल हे मला कळले. तेव्हा ती भाषा शिकायचा उद्देश माझ्या मनात तयार झाला असावा. मला कोणताही व्हिसा किंवा नोकरी नको होती. मला माझी समाजात आणि कुटुंबात आखून दिलेली निर्णय घेण्याची पद्धत स्वतपुरती बदलायची होती. मोकळे व्हायचे होते. म्हणून मी फ्रेंच भाषेकडे, फ्रेंच सिनेमा आणि साहित्याकडे आकर्षति झालो असणार असे मला आज विचार करताना वाटते. पण वर्गात मला कुणी कारण विचारले असता मी ते सांगू शकलो नाही. शिक्षकांनाही नाही.

फ्रेंच कवी रॅम्बोची कविता माझ्या आयुष्यात आली तेव्हा मला मी शिकत असलेल्या या भाषेची पुन्हा एकदा नव्याने ओळख करून घ्यायला हवी अशी जाणीव झाली. रॅम्बोने मला खडबडून जागे केले. ओळखीच्या वाटणाऱ्या त्या भाषेचा माझ्या मनातील नाद बदलला. आज दरवेळी रॅम्बोची कविता वाचताना, पुन्हा नव्याने समजून घेताना आणि त्यात हरवून जाताना मी फ्रेंच भाषेच्या लवचिकतेने आणि तिच्या उच्चारणातील शब्दध्वनीच्या सौंदर्याने पुन्हा पुन्हा मोहित होतो. मी ही भाषा शिकतो आहे याविषयी मनाला फार बरे वाटते. रॅम्बोची ही कविता माझ्या आयुष्यात न सांगता आली. पण आज माझ्या आयुष्यात एक फार महत्त्वाची जागा तिने निर्माण केली आहे. मराठी कवी आरती प्रभू आणि लेखक महेश एलकुंचवार यांनी केली आहे तशीच.

जां निकोला ऑर्थर रॅम्बो हा फ्रान्समधील एकोणिसाव्या शतकातील अतिशय महत्त्वाचा कवी. वयाच्या तेराव्या वर्षांपासून तो कविता करू लागला होता. सतरा ते एकोणीस या वयात त्याने आपल्या आयुष्यातील सर्व साहित्यनिर्मिती केली. जवळच्या मित्राच्या- Paul Verlaine या कवीच्या विरहाने एकोणिसाव्या वर्षी त्याने लिहिणे जवळजवळ पूर्णपणे थांबवले. Verlaine हा त्याचा मित्र, सहचर आणि महत्त्वाची प्रेरणा होता. रॅम्बोची कविता मला आज सोबत करते. ती सावकाश कळू लागली तेव्हा  आकर्षति करीत होती. मी त्याची समग्र कविता आधी इंग्रजीतून वाचली. मग सावकाश फ्रेंचमधून वाचली. घाबरत वाचली. त्रोटकपणे. अर्थ समजण्याची अपेक्षा न धरता वाचली. शब्दाच्या आवाजाच्या मोहाने. पण मग सावकाशपणे त्या कवितेचा आकार मनामध्ये घर करू लागला. दुखावलेला, एकटा पडलेला, आतून पोखरलेला हा तरुण मुलगा माझ्याशी शांतपणे बोलू लागला. तो माझ्याच वयाचा होता. मी मोठा झालो तरी तो एकोणीस वर्षांचाच राहिला. पण माझ्यापेक्षा नेहमीच जास्त धीट, जास्त उघडा आणि बेधडक. मी कधीच करू शकलो नाही अशा अनेक गोष्टी तो त्याच्या कवितेत करत होता.

आठ-दहा वर्षांपूर्वी माझ्याकडे राहायला आलेला माझा एक मल्याळी मित्र परत जाताना ‘A season in Hell’’ हे रॅम्बोने १८८३ साली रचलेल्या कवितेचे पुस्तक घरी विसरून गेला. ती माझी रॅम्बोची पहिली ओळख ठरली. माझ्याने ती कविता सुरुवातीला वाचवेना, इतकी ती दाहक आणि कठीण होती. मला संपूर्ण लक्ष त्या वाचनावर केंद्रित करावे लागले. संयम आणि संपूर्ण ऊर्जा वापरून ती कविता मला आत घ्यावी लागली. श्वास रोखून मी ते छोटे कवितेचे पुस्तक हाती घेऊन बसलो होतो. ते पचेना, पण खालीही ठेववेना. माझी तोपर्यंतची कवितेची कल्पना मोडीत काढणारा तो अनुभव ठरला. मला ओढ निर्माण झाली. सतरा ते एकोणीस या वयात हे दाहक, विचित्र आणि गडद काव्य निर्माण करून त्यानंतर पस्तिसाव्या वर्षी संपून.. मरून गेलेल्या माणसाची ओढ. फ्रान्समधील शार्लव्हील या खेडय़ात १८५४ साली जन्मलेला रॅम्बो माझ्याशी बोलू लागला होता. आश्वासक आणि खासगी.

रॅम्बोच्या कवितेने मला एकटय़ाने बसून मोठय़ाने कविता म्हणण्याचा आनंद दिला. आपण गाणी म्हणतो. कविता नाही. पण त्याची कविता मी वाचताना मोठय़ांदा म्हणतो. मला त्या कवितेत दडलेली कथा अनुभवताना ती ज्या भाषेत लिहिली आहे त्या भाषेचा आनंद घेत ती पचवावी असे वाटते. मी अनेक कवींच्या कविता अशा वाचून पाहिल्या; पण रॅम्बोच्या कवितेने मला म्हणायचा आनंद दिला तसा सर्व कवितांनी दिला असे नाही.

अनेक वर्षांनी मला हे लक्षात आले आहे, की नवी भाषा शिकण्याचे साकल्य त्या भाषेतील कविता अनुभवण्यामध्ये असते. कविता आपल्याला मुळाशी घेऊन जाते. कविता आपले जगणे डागडुजी करून काही काळ पूर्ववत करून देते. आपल्यापाशी समजून घेणारे कुणी नसेल तर कविता आपली असते. शांतपणे, एखाद्या विषासारखी भिनणारी कविता.

मला कविता करण्याची देणगी नाही. मी गद्य माणूस आहे. पण मला जगताना कविता लागते. प्रेमाची आणि देशप्रेमाची नाही, तर आतल्या पोकळीची कविता. जी लहान असताना आरती प्रभूंनी दिली. आणि त्यानंतर रॅम्बोने.

महेश एलकुंचवार यांच्या सर्व लिखाणात मला रॅम्बो पुन्हा वावरताना दिसतो. एलकुंचवारांना रॅम्बो नीट कळला आहे. त्यामुळेच मला त्यांचे सर्व साहित्य नेहमी सोबत करते. मला रॅम्बोची कविता समजून घेण्यासाठी एलकुंचवारांच्या साम्राज्यातील पोकळीचा कितीतरी मोठा आधार तयार झाला असावा.

रॅम्बोने मला नेहमी सोबत केली आणि माझा लिहिण्याचा संकोच दूर केला. न लिहिण्याचा निर्णय हा महत्त्वाचा आहे, हे त्याने मला समजावले. म्हणून मला तो फार आवडतो.

सचिन कुंडलकर kundalkar@gmail.com