‘‘गावात आजारपण आले की, त्याला चेटकीण म्हणून जबाबदार एखाद्या बाईलाच धरले जाई. पुरुषांपेक्षा कमी मजुरीवर तिला काम करावे लागे. नवऱ्याने किंवा बापाने काढलेले कर्ज फेडताना विनावेतन त्या आपले श्रम खर्ची घालताना दिसत. धार्मिक कार्यात महत्त्वाची भूमिका निभावणारी स्त्री सामूहिक न्यायनिवाडय़ाच्या प्रक्रियेत मात्र कुठेच नसे.’’ रायगड जिल्ह्य़ातील आदिवासी, कातकरी समाजात काम करताना आलेले अनुभव आणि त्यातून दिसलेली, बदललेली स्त्री याबद्दलचे सलग चार लेख दर आठवडय़ाला.

सुरेखा दळवी या रायगड येथील श्रमिक क्रांती संघटनेच्या सचिव आहेत. आदिवासी, शेतकरी यांचे नैसर्गिक संसाधनावरील हक्क, असंघटित कामगारांचे प्रश्न, विस्थापितांचे प्रश्न, नागरिकांचे अधिकार व स्थानिक स्वराज्य संस्था या विषयासंबंधी अभ्यास, लोकांत जाणीव जागृती, प्रबोधन व प्रशिक्षण आणि लोकसंघटन बांधणीतून प्रत्यक्ष संघर्षांत्मक काम आणि रचनात्मक कामाचे प्रयोग अशा प्रकारच्या सामाजिक-राजकीय कामातील कार्यकर्ता म्हणून त्या प्रसिद्ध आहेत.

आणीबाणीनंतर १९७८ मध्ये तेव्हाच्या कुलाबा (आताचा रायगड) जिल्ह्यत पनवेल तालुक्यातील तारा येथील युसुफ मेहेर अली केंद्राशी जोडून राष्ट्र सेवा दलाच्या विद्यार्थी विभागाने सुरू केलेल्या आदिवासींच्या अनौपचारिक शिक्षण व आरोग्याशी संबंधित कामात त्या सहभागी असतात. आदिवासी वस्त्यांतून फिरताना जाणवलेल्या शोषण, अन्याय, अत्याचाराला तोंड देण्यासाठी १९८३ मध्ये ‘श्रमिक क्रांती संघटना’ या जन संघटनेची स्थापना केली. तेव्हापासून संघटनेची पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून कार्यरत. संघटना व सामाजिक कामाची गरज म्हणून १९८३ मध्ये वकिलीची सनद घेतली. सध्या वकिली शिक्षणाचा उपयोग आदिवासी, शेतकरी, ग्रामीण गरीब कष्टकरी व स्त्रियांचे हक्क संरक्षणासाठी करत आहेत.

‘‘गावात आजारपण आले की, त्याला चेटकीण म्हणून जबाबदार एखाद्या बाईलाच धरले जाई. पुरुषांपेक्षा कमी मजुरीवर तिला काम करावे लागे. नवऱ्याने किंवा बापाने काढलेले कर्ज फेडताना विनावेतन त्या आपले श्रम खर्ची घालताना दिसत. धार्मिक कार्यात महत्त्वाची भूमिका निभावणारी स्त्री सामूहिक न्यायनिवाडय़ाच्या प्रक्रियेत मात्र कुठेच नसे.’’ रायगड जिल्ह्य़ातील आदिवासी, कातकरी समाजात काम करताना आलेले अनुभव आणि त्यातून दिसलेली, बदललेली स्त्री याबद्दलचे सलग चार लेख दर आठवडय़ाला.

माझा जन्म, शिक्षण मुंबईत झाले असले तरी तेव्हा मुंबईचे महानगर झाले नव्हते. त्यामुळे मुंबईच्या उपनगरात असणारे आदिवासी विशेषत: आजच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील कुटुंबे ताडगोळे व रानमेवा घेऊन येताना पाहिले होते. गोदूताई परुळेकर, कुसुमताई व वसंतराव नारगोळकर, आचार्य भिसे यांच्या कामाबद्दल वाचून माहिती होती. त्यात मुख्यत: आदिवासींचे शोषण व दारिद्रय़ यावरचे अनुभव आणि संघर्षांच्या कहाण्या यांची माहिती असे. अन्य साहित्यातील, चित्रपटातील आदिवासी स्त्रीचे चित्रण हे बहुधा पहाडातील मुक्त, स्वच्छंदी, अल्लड स्त्रीचे असे. काळ्या सावळ्या आदिवासी स्त्रियांची सुंदर माता, निसर्ग कन्यका अशी चित्र असणारी मोठाली कॅलेंडर्सदेखील अनेक कुटुंबांत भिंतीवर लावलेली दिसत. एकुणातच आदिवासी जीवनाबद्दल एक कुतूहल शहरी माणसाच्या मनात अजूनही आढळते.

पण खरे आदिवासी स्त्रीचे जगणे कळायला लागले ते आणीबाणीनंतर ऐंशीच्या दशकात, जाणीवपूर्वक कुलाबा जिल्ह्य़ातील (तेव्हाच्या. आता रायगड जिल्हा) कातकरी व ठाकर जमातीबरोबरच्या कामाशी जोडली गेले तेव्हा. हे अनुभव मध्यमवर्गीय शहरी कल्पना व समजुतींना धक्का देणारे होते. तसेच एक नवी दृष्टी देणारे आणि समाजाच्या जीवनपद्धतीबद्दल वेगळे भान देणारेदेखील आहेत. अगदी सुरुवातीचे अनुभव. पनवेलजवळच्या एका कातकरीवाडीत प्यायला पाणी मागितले, तेव्हा सर्व अंग नारू व खरुज अशा रोगांनी भरलेली हिरी नावाची मुलगी लाल चहाच्या रंगाचे पाणी कळकट जर्मलच्या ग्लासमध्ये घेऊन आली होती. डोंगरावर असणाऱ्या वाडीत पाण्याची कोणतीच सोय नव्हती. डबक्यातील अपुऱ्या व दूषित पाण्याने होणारे सर्व आजार आणि त्यांचे जोडीला त्याबद्दलचे अज्ञान होते. एकदा भूक लागली म्हणून वाडीत काही खायला मिळतेय का ते शोधताना ६-७ वर्षांची मथी शेतातला उंदीर चुलीत भाजून खायला घेऊन आली. साईच्या कातकरी वाडीतील मारुतीची बायको साखरी लाकडांची मोळी विकायला गेली असताना वाटेतच बाळंत झाली. तेथून इतर बायांच्या मदतीने घरी आली आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा लाकडांची मोळी विकायला गेली. लग्नात विवाहासाठी आलेल्या वधू लग्नाआधीच झालेली मुले हाताला धरून, कडेवर घेऊन, कधी तर गरोदर अवस्थेत स्वत:चे लग्न लागावे म्हणून येताना दिसत. तिथल्या स्त्रियांचे जगणे हे असे होते त्या वेळी.

कोणताच नागरी जीवनशैलीचा स्पर्श जगण्यात दिसत नव्हता. आनंदी दिसल्या तरी शरीर व पोटाच्या गरजापलीकडे जगण्याची कोणतीच स्वप्नं त्यांच्या डोळ्यात दिसत नव्हती. केसांना तेलफणी कधीच लागलेली दिसली नाही, दारू पिऊन झिंगून पडली आहे अशी बाई दिसली की ओळखायचे कातकरी आहे. आणि छान फुले घातलेल्या, सजलेल्या पण साडीचा पदर न घेता चालणाऱ्या बाया दिसल्या की, कळायचे ठाकर आहेत. लग्न, जत्रा अशा वेळी मात्र सर्वच बाया हौसेने खूप छान सजून, विविध दागिने घालून आणि भरपूर फुले, वेण्या माळलेल्या दिसायच्या. एकदा पेणच्या बाजारात फिरत होते. कातकरी पुरुष आणि बायापण दारू पिऊन मस्त झिंगून पडलेल्या होत्या. अचानक जोरात भांडण्याचा आणि लागोपाठ कोणाला तरी फाडकन मारल्याचा आवाज आला. वळून पाहिले तर एक आदिवासी बाई नवऱ्याला एकीकडे मारत होती. दुसरीकडे तोंडाचा पट्टा सुरू होता. मजुरीचे सर्व पैसे दारूत संपविलेल्या नवऱ्यावर ती संतापली होती. बाई भर रस्त्यात नवऱ्याला त्याच्या चुकीबद्दल मारते आहे. मला खूपच गंमत वाटत होती. आजवर माणसे आपला राग आपल्यापेक्षा दुबळ्यांवर काढताना पाहिले होते. शिवाय बाई तर दुबळी असते, तेव्हा तिने मार खाल्ला पाहिजे. मार खाण्याची सवय लावून घेतली पाहिजे. किंवा नवरा आहे तो मारणारच, तरच तो खरा पुरुष, असे मानण्याचा काळ होता तो.

नंतर असे मुक्तपणे व्यक्त होणारे स्त्री-पुरुष अनेकदा दिसू लागले. कधी हाती आलेला पैसा आपल्या मर्जीने खर्च करणारी एखादी बाई दिसे, तर कधी आपल्या शेतात, अंगण-परसात कोणती झाडं लावावी अथवा पीक घ्यावे याचा निर्णय घेणारी बाई दिसे. आपले लग्न आपण ठरविणारी मुलगी आढळून येई तशीच पटत नाही नवऱ्याशी म्हणून लग्न मोडून एकापेक्षा अनेक संसार मांडणारी बाईदेखील आढळे. जंगलात फिरून रानमेवा व रानभाज्या गोळा करणे असो की, ओढय़ा-तळ्यावर जाऊन मासे, खेकडे पकडणे, याबद्दलचे त्यांचे ज्ञान तर अफाटच. कुठे काय आहे आणि ते कसे मिळवायचे याबाबतचे विशेष कौशल्य शिकावे तर त्यांच्याकडून असे वाटत राही. नजर तर घारीसारखी तीक्ष्ण. आसपासचे रान तर त्यांच्या पूर्ण ओळखीचे असावे असे वाटत राही. बकऱ्या चरायला डोंगरदऱ्यात फिरता फिरता, चुलीसाठी लाकडे आणि काहीतरी खाणं गोळा करून आणताना त्या दिसत. रानावनात फिरताना एखादे जनावर समोर आले की, निर्भयपणे त्याला सामोरे जाताना, शेतात काम करताना किंवा सणासुदीला मजेत गाणी म्हणत फेर धरून नाचणाऱ्या बाया दिसत.

कुणाच्याही घरात गेल्या की, त्या घरातील बाई करीत असलेल्या कामाला सहजपणे हातभार लावणाऱ्या, समोर आलेल्या कोणाच्याही मुलाला पटकन आपले परके असा विचार न करता खायला घालणाऱ्या बायांची तर मला खूप मजा वाटत असे. एकदा एक जख्खड म्हातारी थरथरणारे हातपाय सावरत काम करताना आणि तरण्या स्त्रिया बसून गप्पा मारताना दिसल्या तेव्हा मी विचारले होते, ‘‘ही म्हातारी एकटीच आहे का?’’ तेव्हा मला उत्तर मिळाले होते. ‘‘नाही. मुले-सुना, नातवंडे आहेत ना. पण जोवर हातपाय चालतात तोवर आपले आपणच करायचे. अगदी झेपेनासे झाले की आहेतच करणारे मदतीला. आणि कुणी नसलं तरी गाव आहे ना?’’ कोणत्याही नात्यांच्या ओझ्याशिवाय जगता येते याची नव्याने ओळख होत होती.

बायकोच्या पहिल्या लग्नातून झालेल्या मुलाला दुसरा नवरा सहजतेने आपलं मूल म्हणून स्वीकारीत असे तशीच बाईदेखील नवऱ्याची दुसऱ्या स्त्रीपासून झालेली मुले कोणताही भेदभाव न करता आपली म्हणून वाढवताना दिसे. व्यक्तिगत कुटुंबाचं जगणं आणि समूह म्हणून जगणं याची एक छान सांगड घातलेली दिसून येई. म्हणजे कुटुंब व्यवस्था आहे, पण समाज पतीपत्नीच्या दैनंदिन जगण्यात तक्रार आल्याशिवाय फार हस्तक्षेप करताना दिसत नव्हता. विवाह, मुलांचे जन्म, घटस्फोट याबाबतच्या निर्णयाचा अधिकार स्त्री अथवा पुरुष यापैकी कुणा एकाकडेच सोपविलेला नव्हता. दोघांच्या परस्पर संमतीने व न लादलेल्या जबाबदारीने या गोष्टी घडत. थोडक्यात विभक्त कुटुंब व समूहजीवन अशा जीवनपद्धतीचा अंगीकार आढळे.

एकीकडे असे निसर्गात मोकळे जगणे दिसत होते तर दुसरीकडे सामाजिक विषमतेचे चटके आणि सरकारी व्यवस्थेकडून केले जाणारे शोषण त्यांना जाणवत नसले तरी, मला खटकू लागले होते. गावात आजारपण आले की, त्याला जबाबदार एखाद्या बाईलाच धरले जाई आणि चेटकीण भुताळी म्हणून तिला अमानवी त्रास दिला जाई. पुरुषांपेक्षा कमी मजुरीवर तिला काम करावे लागे. नवऱ्याने किंवा बापाने काढलेले कर्ज फेडताना विनावेतन त्या आपले श्रम खर्ची घालताना दिसत. जंगलातून दिवसभर फिरून गोळा केलेली लाकडे असोत किंवा रानातील भाज्या व फळे असोत अतिशय कमी भावाने विकताना या सर्वजणी दिसत. अनेक प्रकारे असुरक्षित व अस्थिर आयुष्य तिच्या वाटय़ाला आलेले असे. धार्मिक कार्यात महत्त्वाची भूमिका निभावणारी स्त्री सामूहिक न्यायनिवाडय़ाच्या प्रक्रियेत कुठेच नसे.

पूर्वी ठाणे व रायगड जिल्ह्य़ातील हजारो आदिवासी मजूर कुटुंबे रत्नागिरी जिल्ह्य़ात कोळसाभट्टीवर जगायला जात. आता हे प्रमाण कमी झाले आहे. जनावरांसारखं राबणं आणि पाच-दहा किलोमीटर परिसरातील रानात एकेका कुटुंबाने किमान मजुरी व सुविधांशिवाय राहणं असे. आठवडय़ाची खर्ची मिळे त्यावर उदरनिर्वाह करावा लागे. तेव्हा कोळसाभट्टीसाठी लाकडे रचणे, गवत, माती व पाणी आणणे ही कामे करून पोटासाठी खाद्य शोधण्याचे कामही बाईला करावे लागे. तिथे कोणत्याही किमान सोयी-सुविधांशिवाय जगणाऱ्या बाया कामधंद्याच्या ठिकाणी उघडय़ावरच बाळंत होत आणि लगेच कामाला जुंपल्या जात. काही मुलं जन्मत:च थंडीवाऱ्याने तसेच किमान आरोग्य सुविधेअभावी मरून जात. कधी बाई बाळंतपणात दगावत असे. कधी जंगली जनावरांच्या हल्ल्याचे बळी होत. अशा ठिकाणी लहान मुलांना शाळेत पाठवणे तर दूरच, पण ही सर्व मुले कुटुंबाला कामात हातभार लावणारे बालमजूर होती. या सर्व घटनांची नोंद सरकारी पातळीवर कुठेच नसे. आजही नाही. कोळसाभट्टय़ा बंद पडल्या आणि शहरांच्या वेशीवर वीटभट्टय़ा सुरू झाल्या तशा या बाया विटा थापण्याचे, वाळलेल्या विटा उचलून रचून ठेवण्याचे, भट्टीसाठी वाहतूक करण्याचे काम करतात. पहाटे थंडीवाऱ्यात सुरू केलेलं काम दुपापर्यंत चालते. मजुरांसाठी किमान निवारा, सुरक्षा व्यवस्था, आरोग्य सुविधा, मुलांच्या शिक्षणाची सोय कुठेच नसते. कुटुंबाबरोबर श्रम, घरातील दैनंदिन कामे याच्या जोडीला परक्या ठिकाणी वाईट पुरुषी नजरांपासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्याचे कामही बाईला करावे लागत असते.

प्रत्येक कातकरी चोर असा शिक्का पोलिसांनी समाजावर मारला असल्याने कातकरी बाया तर कायम पोलिसांच्या धाकात असत. दूरवर पोलीस दिसला की, गावातील सर्व कुठेतरी दडी मारून बसत. केवळ संशयावरून कोणताही गुन्हा दाखल नसताना अटक न करता बायांना अनेक दिवस पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवलेले असे, का तर घरातील पुरुषांना हजर करावे म्हणून.

वन विभाग आणि आदिवासी यांचे संबंध कायम विळ्याभोपळ्याचे. कुणी घर बांधल्याचे कळले की दारू कोंबडीचे फुकटचे जेवायला वन कर्मचारी त्या घरी हजर होणार. घरातील बाई त्यासाठी त्या गार्डाला शिव्याशाप देत अडीनडीला राखून ठेवलेला कोंबडा, क्वचित वस्तू विकत असे. प्रत्येक गावात भल्या पहाटे रानात जाऊन घरातील चुलीसाठी जळण आणणाऱ्या आणि उदरनिर्वाहासाठी मोळ्या विकायला जाणाऱ्या अनेक बाया दिसत. त्यांना फॉरेस्ट गार्डाकडून होणाऱ्या जाचाबद्दल बोलत. कुणाची कोयती, कुऱ्हाड जप्त केलेली असे, तर कुणाची मेहनतीने आणलेली डोक्यावरची मोळी. गार्डाला कसं चुकवलं हे सांगताना त्यांचा चेहरा फुलून येत असे. सुटकेचा आनंददेखील त्यात

असे. रोज किमान पंधरा-वीस किलोमीटरची पायपीट केवळ जळण आणि विक्रीसाठी मोळ्या आणताना करीत तशीच पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत असे. बाईच्या आयुष्यातील सर्वाधिक वेळ आणि श्रम या दोन कामांसाठी खर्ची पडत असे.

एकीकडे निसर्गातील मुक्त जगताना दैनंदिन गरजापूर्तीसाठी होणारी दमछाक आणि व्यवस्थेकडून केले जाणारे शोषण थांबले पाहिजे. समतेसाठी आवश्यक अशा संधी, सुरक्षा आणि सुविधा देशाचे नागरिक म्हणून या समूहांनादेखील मिळाल्या पाहिजेत असे वाटू लागले आणि मग वाडय़ावस्त्यांतून फिरताना सर्वाशी संवाद साधणे सुरू झाले.

(क्रमश)

सुरेखा दळवी – surekhadalavi@yahoo.com