अन्नपूर्णा परिवाराच्या प्रारंभी सुरुवातीच्या जिवाभावाच्या मैतरणींनी मला ‘महिला सक्षमीकरणाच्या’ वाटेवरील अनेक गरजा, खाचखळगे आणि रस्ते दाखवले. ‘त्यांचे जीवन सुकर होण्यासाठी आणखी काय करू?’ अशा प्रश्नचिन्हातूनच उत्तरं सापडत गेली व वेगवेगळे प्रकल्प उभे करण्याची प्रेरणा त्यातून मिळत गेली. मैतरणी, सख्या आणि स्त्री-पुरुष सहकाऱ्यांच्या मदतीमुळेच हे सारं उभं राहू शकलं.

अन्नपूर्णा परिवाराच्या २५ वर्षांच्या वाटचालीत मला एक एक करत अनेक सहकारिणी व मैत्रिणी भेटत गेल्या. बऱ्याच बाबतीत मी त्यांची मेंटॉर वा गुरू होते, पण मीही त्यांच्याकडून खूप शिकत गेले. आम्ही साऱ्याजणी एकजीवाने ‘अन्नपूर्णा’ परिवाराला दर पावली पुढे नेत गेलो. अगदी सुरुवातीची ३/४ र्वष फक्त मी आणि शेवंताबाई, लक्ष्मीबाई, जहीदाबी, लीलाबाई, पाटीलबाई अशा मैतरणींचा काळ होता. त्यांच्या खडतर जीवनातील सुखदु:खं मी जवळून पाहात होते. त्यांना मार्गदर्शन करता करता स्वत:च शिकत होते. त्यांच्या विविध समस्यांमधून मला त्यांना आणखी कोणत्या सेवा द्याव्यात हे सुचत गेलं व त्या सेवा मी ‘अन्नपूर्णा’मध्ये प्रकल्प रूपाने उभ्या करत गेले.

दु:खाचे डोंगर छातीवर झेलून दिलखुलास हसत दररोज ‘माझा खेळ मांडू दे’ म्हणणाऱ्या शेवंताबाई. नवऱ्याचा बेदम मार खाऊन, पोटच्या पोरांचा मृत्यू पचवूनसुद्धा हसायला न विसरलेल्या, ‘कुनीबी पैसं बुडवायचे न्हाईत. एकजूट-एकमूठ’ असा नारा देणाऱ्या जहीदाबी. ‘आपल्यातली एक जन मेली, तिच्या डोईवर कर्ज हाय, काढा गं कनवटीचं २/५ रुपयं. एक दिस चहा नका पिऊ’ म्हणत सर्वाना जीवनविम्याची अ ब क ड ई नकळत शिकवून जाणाऱ्या लीलाबाई ढोक. ‘ताई, कष्ट करणाऱ्या मान्साला नेकीनं रोजीरोटी कशीबी कमावता येतीया’ म्हणत कोंबडय़ा/बकऱ्या/अंडी/बोरं/पेरू/कणसं असा मोसमी माल विकून भरपूर सोनं अंगावर घालणाऱ्या पण एकुलत्या एक मतिमंद मुलीसाठी तळमळणाऱ्या सोजरबाई. बाई असून पुरुषांसारखं भाजीचा गाडा ढकलत कांदे, बटाटे गल्लोगल्ली विकणाऱ्या लक्ष्मीबाई तर संसाराचं ओझं पेलता पेलता अकाली हृदय बंद पडून गेल्या. आणि दहावी पर्यंत शिक्षण झालेल्या, पण तथाकथित सौंदर्य नसल्याने अगदीच विसंगत नवऱ्याशी नांदाव्या लागलेल्या पाटीलबाई. त्यांनी अनेक स्त्रियांना कळकळीने पटवून सांगितलं, ‘अन्नपूर्णाचं सदस्य होणं कसं फायद्याचं आहे.’ पण दुर्दैवानं नवऱ्याच्या बाहेरख्यालीपणामुळे अकाली एच.आय.व्ही.नं त्यांनाच जगाचा निरोप घ्यावा लागला.

अशा साऱ्या सुरुवातीच्या जिवाभावाच्या मैतरणींनी मला ‘महिला सक्षमीकरणाच्या’ वाटेवरील अनेक गरजा खाचखळगे आणि रस्ते दाखवले. ‘त्यांचे जीवन सुकर होण्यासाठी आणखी काय करू?’ अशा प्रश्नचिन्हातूनच उत्तरं सापडत गेली व वेगवेगळे प्रकल्प उभे करण्याची प्रेरणा त्यातून मिळत गेली. त्या सर्व प्रकल्पांमध्ये मला खंबीरपणे साथ देणे व इतर स्त्रियांना त्या प्रकल्पाची संकल्पना समजून सांगणे यात माझ्या या मैतरणींनी मला खूप मदत केली.

‘‘आम्हाला तुझ्यासारखं जॉब सोडून नाही जमणार, पण जमेल तेवढी मदत करतो तुला.’’ म्हणत हिशोब लिहायला विनामोबदला आलेल्या चित्रा, अंजली अशा सुशिक्षित नोकरदार मैत्रिणी. ज्या ‘अन्नपूर्णा’ परिवाराचा अविभाज्य घटक बनून गेल्या. विश्वस्त मंडळावरील जबाबदारी निभावू लागल्या. वृषालीताई या प्राध्यापिका म्हणून निवृत्त झालेल्या व आमच्यात मिसळून गेल्या.

एकेक करत ‘अन्नपूर्णा’ परिवाराचा कर्मचारीवर्ग मी घडवत गेले. त्यामध्ये १८- २० व्या वर्षी आलेल्या शुभांगी, पुष्पा, संगीता, अनिता या तरुण मुली दहावी, बारावी शिकलेल्या, पण संधीअभावी घुसमट जाणवणाऱ्या. ‘अन्नपूर्णा’मध्ये आल्या आणि मी शिकवेन ते शिकत गेल्या. क्रेडिट, डेबिट, पैसे गोळा करणे, मीटिंग घेणे सारं सारं शिकल्या. त्यांच्या माझ्यावरील प्रेमाने, भक्तिभावाने मलाच खूपदा हलून जायला होतं. शुभांगी तर आमच्या संगणक विभागाची ३० जणींच्या गटाची प्रमुख झालीय. ती चालतीबोलती ‘सक्सेस स्टोरी’ आहे. १२ वी शिक्षण झालेल्या शुभांगीने ‘अन्नपूर्णा’तील गरजेनुसार बदलत गेलेली ५ सॉफ्टवेअर्स हाताळली आहेत. बाहेरून आलेले पाहुणे /बँकर्स/रिसर्चर्स शुभांगीची संगणकावरील व टीमवरील कमांड बघून थक्क होतात, ‘‘ती संगणक अभियंता आहे का असं विचारतात.’’

सुनीता खोत, वैजयंता, सुहासिनी, आशा, सुरेखा, कल्पना, मनीषा, संगीता, सोनल, जयश्री या मुंबईच्या वस्त्यांमध्ये फिरून ‘अन्नपूर्णा’चं ‘सक्षमीकरण मॉडेल’ घरोघरी पोचवत आहेत. सुनीताच्या शब्दात ‘‘मी नोकरी नाही करत. माझ्यासारख्या अनेक स्त्रियांना गरिबीच्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्याची संधी मला ‘अन्नपूर्णा’ने दिलीय. ती मी वापरतेय.’’

पुण्याच्या टीममध्ये सुनीता कमले, लता, रेखा, अश्विनी या वस्त्यांमधील कामकाजात वाघिणींसारख्या भाग घेतात. सभासदांच्या प्रत्येक प्रश्नावर त्या उत्तर देऊ  शकतात, चालतीबोलती मॅन्युअल्स आहेत जणू काही. ‘अन्नपूर्णा’ परिवाराची पहिली १० र्वष न शिकलेल्या, पण लढाऊ  स्त्रियांचं जिवंत प्रतीक असणाऱ्या, जीवनाशी पावलोपावली दोन हात करणाऱ्या मैतरणी आणि शिकलेल्या, स्वत:ची नोकरी करत, संसार सांभाळत पण कुठल्याही फायद्याशिवाय जिवाला जीव देणाऱ्या सख्यांच्या सोबतीनं चालले.

२००३ पासून संस्थेच्या दैनंदिन कामकाजासाठी जास्त शिक्षित कर्मचारीवर्गाची गरज वाढत गेली. मी सर्व प्रकारच्या प्रशिक्षणातील एम.एस.डब्ल्यू., एम.बी.ए. तरुण मुली-मुलं घेऊन त्यांना शिकवत गेले. त्यांना ‘अन्नपूर्णा’च्या सभासदांच्या गरजा व संस्थेच्या व्यवस्थापनातील गरजा शिकवण्याचा प्रयत्न करत राहिले. त्यातून एक तळमळीची, प्रशिक्षित टीम उभी राहिली आहे. यातील बहुसंख्य टीम एम.एस.डब्ल्यू. आहे व तरुण महिला आहेत. उज्ज्वला, शामला, अनिता, आरती, माया, संगीता, कविता, मोहिनी, शीतल, सुधीर, समाधान, सिद्धी अशा अनेक एम.एस.डब्ल्यू. केलेल्या तरुण मंडळींनी छान जबाबदाऱ्या पेलल्या आहेत व आता साठीकडे झुकलेल्या मला ‘अन्नपूर्णा’तील उज्ज्वल भवितव्य व दुसऱ्या फळीतील नेतृत्व त्यांच्या रूपात दिसत आहे.

‘अन्नपूर्णा’चं वस्ती पातळीवरील काम जेवढं महत्त्वाचं आहे, तेवढंच बॅक ऑफिस व टेक्निकल सपोर्ट महत्त्वाचा आहे. अकाउंट्स, बॅलन्सशीट, सॉफ्टवेअर, ऑडिट या महत्त्वाच्या जबाबदाऱ्यासुद्धा अनेक तरुणी सांभाळताहेत त्यात मधुरा, नीलम, प्राची, अश्विनी, सविता, मंजिरी, स्वाती, नेहा, गौरी, सोनिया अशी तडफदार व तळमळीची टीम आहे. ज्यांना अन्नपूर्णाच्या सक्षमीकरण मॉडेलबद्दल आस्था, तळमळ आहे व हे काम सर्व कायद्याच्या चौकटीत बसवून पुढे नेण्याची त्यांची धडपड आहे.

‘वस्ती प्रतिनिधी’ ही संकल्पना मी अगदी सुरुवातीपासून विकसित केली. स्त्रियांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेणं यासाठी त्यांनीच त्यांच्या प्रतिनिधी निवडायच्या अशी यंत्रणा उभी केली. दर वर्षी सप्टेंबर ते डिसेंबपर्यंत विविध वस्त्यांमधील २१ ब्रँच ऑफिसेसमधून, कम्युनिटी मीटिंगमधून ही निवड प्रक्रिया घडते. २ वर्षांसाठी प्रतिनिधी निवडल्या जातात. त्यांना कर्ज, आरोग्य निधीचे दावे, जीवन निधी, कुटुंब निधीचे दावे मंजूर करण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. ‘अन्नपूर्णा’ची स्टाफची प्रशिक्षित टीम, डॉक्टर्स व सॉफ्टवेअरचे रिपोर्ट्स यांच्या मदतीने हे प्रशिक्षण दिलं जातं व पुढील २ वर्षे ही प्रतिनिधींची टीम दरमहा बैठकींमध्ये उपस्थित राहून सर्व आर्थिक उलाढालीमध्ये निर्णय घेतात, खर्चावर नियंत्रण ठेवतात.

अतिशय सर्वसमावेशक, पारदर्शक पद्धतीने ‘अन्नपूर्णा’ परिवाराचं कामकाज चालतं यामध्ये या सभासद प्रतिनिधींच्या टीम्सचा मोठाच सहभाग आहे. ‘अन्नपूर्णा’ परिवारात मिसळून गेलेली, वस्ती पातळीवर सभासदांचं नेतृत्त्व करणारी स्त्री प्रतिनिधींची टीम उभी राहिली आहे. यामध्ये सुनीता कुंभार आहेत, सहावीपर्यंत शिकलेल्या, धड लिहितावाचता न येणाऱ्या पण गाणी रचून त्यातून स्त्रियांच्या भावना हृदयाला भिडणाऱ्या शब्दांत व्यक्त करू शकतात. मनीषा, संगीतासारख्या धडपडय़ा तरुणी आहेत ज्या अगदी कष्टाची कामं करून संसार चालवतात, पण ‘अन्नपूर्णा’च्या बैठकांना यायचं म्हटलं की उत्साह उतू जातो. हिरीरीने महत्त्वाचे निर्णय घेतात.

‘अन्नपूर्णा’ परिवाराची ‘वार्षिक सर्वसाधारण सभा’ म्हणजे उत्साह, उत्तम सहभाग, पारदर्शकता याचं जिवंत चित्र असतं. गेल्या २४ वर्षांपासून, अगदी १०० सभासद होत्या तेव्हापासून सर्व सभासदांना वर्षांतून एकदा एकत्र बोलावून एक मीटिंग मी घेत आले. गेल्या दहा वर्षांपासून जानेवारीत पुणे मुंबई अशा २ ठिकाणी ही सर्वसाधारण सभा घेतली जाते. प्रत्येक ठिकाणी १० हजार सभासद उत्साहाने व शिस्तबद्ध रीतीने ४ तास सभेत सहभाग घेतात. सर्व निर्णयांना मंजुरी देतात. हीच महिलाशक्ती अन्नपूर्णा परिवाराची खरी ताकद बनली आहे. या साऱ्या वाटचालीत ‘अन्नपूर्णा’ परिवारातील ५ संस्था, विविध प्रकल्प उभे राहिले, वाढत गेले, कोटय़वधी रुपयांची उलाढाल व लाखो सभासदांची प्रगती-विकास करत आहेत.

यातील पुरुष सहकाऱ्यांचा उल्लेख केल्याविना हा लेख अपूर्ण राहील. कॉ. सुरेश धोपेश्वरकर, कॉ. पिसाळ, कॉ. उटगी व डॉ. इलंगोवन हे निवृत्त बँक कर्मचारी नेते, बँक अधिकारी मंडळींनी त्यांच्या वडिलधाऱ्या मायेची छाया या परिवारावर सतत धरली आहे. असं हे ‘अन्नपूर्णा परिवाराचं महिला समक्षीकरणाचं मॉडेल.’ स्त्री-पुरुष समानतेच्या पायावर उभं राहिलं आहे. त्यामध्ये जात, धर्म, भाषा, लिंग भेद कशालाही थारा नाही!

डॉ. मेधा पुरव सामंत

dr.medha@annapurnapariwar.org