मुक्ता मनोहर या महाविद्यालयीन जीवनापासूनच वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होत होत्या. १९७५ पासून स्त्रियांच्या चळवळीत सहभाग. पुरोगामी स्त्री संघटना, बायजा आदी द्वैमासिकातील संपादकीय मंडळात त्यांचा सहभाग होता. राज्यातील बिडी कामगार, कापड कामगार, गिरणी कामगार, आदिवासी शेतमजूर स्त्रिया अशा कष्टकरी स्त्रियांच्या आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. सध्या मुक्ता मनोहर या पुणे महानगरपालिका कामगार युनियन, क्रांतिवीर भगतसिंग ब्रिगेड, श्रमिक महिला मोर्चा, महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघ आदी संघटनांवर विविध पदांवर कार्यरत आहेत. स्त्री आणि सामाजिक समस्यांविषयी त्यांनी लेखन आणि नाटय़ लेखन केले आहे. सुमारे ३५ महत्त्वाच्या संस्थांनी त्यांच्या कामाची नोंद घेऊन पुरस्कार देऊन प्रोत्साहित केले आहे.

‘‘नाही. मी या छापट्ट मुलाशी लग्न करणार नाही..’’

‘‘तू समजतेस कोण स्वत:ला?’’ वडिलांचा चांगलाच मोठ्ठा झालेला आवाज..

‘‘आवाज चढवून बोलू नका. लक्षात ठेवा मी माणूस आहे.’’ तितक्याच जोरात आवाज चढवून माझं उत्तर.

‘‘अगं बाई, आता गप्प बस’’ हुंदक्यात दबलेला पण धुमसणाऱ्या आईकडून माझ्या दंडाला चिमटा..

मग अशा वेळी नेहमीच सायकल बाहेर काढून मी घराबाहेर पडणं. ‘किलरेस्कर प्रेस’मध्ये विद्या बाळ यांना गाठणं.. बाहेरच्या जगात आंतरराष्ट्रीय महिला वर्ष जाहीर झालेलं, म्हणजे १९७५ चा कालखंड. मी विद्याताईंना सांगे माझ्या कुटुंबाची गोष्ट.

‘वास्तविक वडिलांनीच मला ‘पण लक्षात कोण घेतो.’, ‘कळ्यांचे नि:श्वास’.. अशी किती तरी पुस्तकं माझ्या वयाच्या तेराव्या वर्षीच वाचायला दिली होती. आम्ही तिघी बहिणीच होतो. माझ्या वडिलांना त्याचं कधीच दु:ख झालं नव्हतं. पण माझी मोठी बहीण कॉलेजच्या पहिल्या वर्षांतच प्रेमात पडली आणि तिनं त्या मुलाशी हट्टानं लग्नही केलं. या आंतरधर्मीय प्रेम लग्नामुळे त्या लहान गावात वडिलांना आणि आईला बरीच मानहानी सहन करावी लागली. गावही सोडावं लागलं. आधीच छोटय़ा गावातली त्यांची सरकारी नोकरी. तिथं थोडं जरी स्वत:चं मत मांडलं तरी होणाऱ्या बदल्या. मग अडवले जाणारे पगार. घरातले कमावते एकटे तेच. आई कष्टाळू, सहनशील. मला हे जाणवतं, पण म्हणून त्यांना बरं वाटावं यासाठी कोणत्याही मुलाशी मी निमूटपणे लग्न करायचं?’

विद्याताईसुद्धा आस्थेवाईकपणे बोलायच्या. या बोलण्यातून, या चर्चातून कुटुंब ही एक सामाजिक संस्था असते हे मला जाणवायला लागलं. स्वत:चेच  आई-वडील, भावंडं, नातेवाईक, जात-पात, रूढी-परंपरा.. अशा किती तरी पैलूंची पाळंमुळं, वर्तमान आणि भविष्य याचे विविध पदर समोर यायला लागले. सगळीच माणसं अशा व्यवस्थांतून घडतात, सहन करतात किंवा बंडखोरीही करतात. मी अंतर्मुख होत होते.. आणि याच कालखंडात माझ्या मनात आकाराला येत होतं, माझ्या भावी जोडीदाराचं अस्तित्व! अशा प्रक्रियांतून माझी ओळख ‘मागोवा’ नावाच्या एका गटातल्या अशोक मनोहर या तरुणाशी झाली.

‘‘तुझं माझं नाहीच पटलं तर?’’ मी विचारलं.

‘‘घटस्फोटाचा कागद आपण आधीच तयार ठेवूयात का?’’ त्याचं हसून उत्तर.

‘‘नाही रे.. तर मुद्दा चालला होता, तो स्त्री-पुरुष  समानतेचा. माणूस म्हणून जगण्याचा.’’ मी स्वत:ला सावरून! मग त्यानं पुढं केलेल्या त्याच्या ‘माणूस’च्या अंकातल्या कविता..

माझी सुंदर गोंडस मुले

फाड फाड इंग्लिशमधून बोलत असतील

पण त्याचवेळी असंख्य मुले

पोटासाठी शाळा सोडून

घाम गाळत राबत असतील..

स्वत:च्या स्वातंत्र्याचा आणि आत्मसन्मानाचा माझा धागा बघता बघता समस्त मानवी हक्कांशी जोडण्याचा एक महामार्गच मला त्याच्या बोलण्यात जाणवला. फारसा खर्च न करता नोंदणी पद्धतीनं आम्ही लग्न केलं. अशोक आदिवासींच्यात काम करतो, पुढे नोकरी करेलच असं नाही वगैरे माझ्या आई-वडिलांनी माझ्याकडून आलेल्या काहीशा दडपणातूनच मान्य केलं. ते थोडेसे नाराज. पुन्हा काळजीतच! माझ्या आयुष्याने मात्र नवं वळण घेतलेलं.

लग्न न करता एकत्र राला काय हरकत आहे? विवाह संस्था म्हणजे काय? जात-धर्म-वंश-स्त्रीचं योनिशुचित्व आणि मुलं-बाळं होण्याचं आणि मुख्यत: मुलगाच होण्याचं असलेलं महत्त्व असे असंख्य पैलू ‘आमचा अभ्यास करा’ असं म्हणत माझ्या समोर यायला लागले. कारण मी ‘पुरोगामी स्त्री संघटनेत’ सक्रिय झाले होते. डॉ. सुलभा,

डॉ. कुमुद पोरे आणि कॉम्रेड लीलाताई भोसले यांची झालेली ओळख म्हणजे या प्रवासाची एक वेगळी सुरुवात होती. जिचे धागे सामाजिक चळवळीशी बांधले जात होते. जीवनाला अजूनच समृद्ध करण्याची ती सुरुवात होती.

मग विविध मोर्चाचे आयोजन, बायजा द्वैमासिक – त्याचं संपादक मंडळ आणि त्या सगळ्यांमध्ये गुंतून जाणं, भारावून काम करणं सुरू झालं. पोस्टर्स तयार करणं, रंगवणं, मोर्चासाठी घोषणा तयार करणं, मोर्चात मुक्त आवाजात मोठय़ांदा ‘हम भारत की नारी है.. फुल नही चिंगारी है..’ असं ओरडणं, या सगळ्याची वेगळीच चैतन्यदायी नशा आयुष्याचा भाग बनायला लागली. तर दुसरीकडे ‘मागोवा’ गटाशी संबंधित पुण्यातले अशोक व अशोकचे मित्र यांच्याबरोबर आमच्या अभ्यास बैठकांची सुरुवात झाली. यामध्ये ‘मागोवा’मधल्याच पुण्याच्या आणि मुंबईच्या, तरुण मुली होत्या आणि आम्ही एकमेकींच्या जिवाभावाच्या मैत्रिणीही होत गेलो. स्त्रियांच्या दुय्यमत्वाचं नक्की स्वरूप काय आहे याचा आम्ही वेध घेत होतो आणि त्याला जोड होती मुख्यत: मार्क्‍सवादाची.

मार्क्‍सवादी विचारांभोवती स्त्री-चळवळीतच मोठं वैचारिक वादळ सुरू झालेलं होतं. अर्थातच या चर्चा आमच्यासारख्या मध्यमवर्गीय स्त्रियांपुरत्याच मर्यादित होत्या, पण तरीही आमच्यापेक्षा अगदी वेगळंच जीवन जगणाऱ्या स्त्रियांचा बऱ्याच वेळा भरपूर सहवास आम्हाला मिळत असे. या स्त्रिया होत्या, मुख्यत: मागोवा गटाने ज्या आदिवासी भागात त्यांच्या कार्याला मूर्त आकार दिला होता, त्या शहादा इथल्या आदिवासी स्त्रिया. आदिवासी श्रमिक माणसं आणि त्यांच्याबरोबर जोडलेले आम्ही सगळेजण. ‘मागोवा गट’ तसा विसर्जित झाला तरी शहाद्यातली चळवळ सुरूच होती. अनेक पद्धतीने आम्ही त्याचा भाग बनत होतो.

प्रत्येक अनुभव, श्रमिकांच्या जीवनाचे, हक्कविहीन माणसांचे जगणे आमच्या मनात असंख्य वादळांना जन्म देत असे. आयुष्याला जगण्याचंच एक उधाण येतं होतं. आता ‘मी’ एकटी नव्हते तर ‘आम्ही’ सगळे होतो.

आमच्या उद्दिष्टांची, आमच्या ध्येयांची चर्चा करता करता अजून एक नवं वळण दैनंदिन जीवनातच आम्हाला दिसत होतं. ती एक अशी पाऊलवाट होती, जिच्या भोवती कोणतीच हिरवळ नव्हती. ही पाऊलवाट आम्हाला शहरी जीवनातल्या चमकत्या, गजबजलेल्या महामार्गापलीकडे घेऊन जात होती. ही पाऊलवाट आम्हाला शहरी श्रमिक स्त्रियांकडे घेऊन जात होती. त्यांचे रापलेले तरीही कणखर असणारे चेहरे, सतत पाण्यात काम करण्यामुळे त्यांच्या हाता आणि पायांना झालेल्या चिखल्या-भेगा, त्यांची ती झोपडपट्टय़ांतली पत्र्यांची छोटी घरं, त्यांच्या घरात विटांवर विटा ठेवून उंच केलेल्या पलंगाखाली आणि वरही आपसातल्या कुरबुरींना पंखाखाली घेऊन दोन दोन तरुण मुलांचे सुरू असलेले संसार. आम्ही बसलेल्या पलंगावरची चादर खाली खेचून, ‘‘चला पाय वर करा. मला माझ्या रूममध्ये जाऊ द्यात, जरा झंपर बदलते.’ असं म्हणून सर्रकिनी पलंगाखाली शिरणाऱ्या, दिलखुलास हसणाऱ्या आणि मोठय़ा उत्साहानं आमच्यासमवेत मोर्चाला निघणाऱ्या शहरी श्रमिक स्त्रियांचा आमचा संबंध येत होता. आम्ही करत असलेल्या स्त्री-मुक्तीच्या चर्चाशी या स्त्रियांचा काय संबंध आहे हा आमच्या चळवळीपुढचाच आव्हानात्मक प्रश्न बनला.

या काळातच अजून एक महत्त्वपूर्ण घटना घडली.  तो आठ मार्च या जागतिक महिला दिनानिमित्ताने निघालेला स्त्रियांचा मोर्चा होता. त्यात आमच्यासारख्या मध्यमवर्गीय आणि मोठय़ा संख्येनं असणाऱ्या मोलकरीण स्त्रिया आणि पुणे महानगरपालिकेतल्या सफाई सेविका होत्या. घोषणांना जोर आलेला. मग आमचा मोर्चा अप्पा बळवंत चौकातल्या प्रभात टॉकीजपाशी येऊन थडकला. तिथे ‘तोहफा’ या चित्रपटाचं एक अश्लील पोस्टर लावलेलं होतं. आमचा मोर्चा तिथे थांबल्यावर स्त्रीदेहाच्या प्रदर्शनावर आम्ही जोरदार हल्लाबोल सुरू केला. आणि मोर्चाच्या पुढेच असणाऱ्या स्त्रियांपैकी कोणीतरी म्हणालं, ‘‘नुसतं ओरडून-बोंबलून काय होणार? चला ते पोस्टरच काढूयात.’’ आम्हाला काही कळण्याच्या आत त्या पुढे धावल्याही. ते अश्लील पोस्टर उतरवायचं काम पूर्णही झालं. पत्रकार पुढे सरसावले. ज्याची एक लक्षवेधी बातमी झाली.

८ मार्चच्या मोर्चा आणि सभांच्या वृत्तपत्रांकडून विशेष नोंदी घेतल्या जाऊ लागल्या. आम्हाला आनंद, समाधान! चला, आमचं म्हणणं थोडसं का होईना जगासमोर यायला लागलं आहे. अशा केवळ ८ मार्चच्या सभेमध्ये स्पष्ट आलेल्या फोटोंमुळे एखाद्या वस्तीच्या समस्त जीवनालाच कलाटणी मिळू शकते याची आम्ही कल्पना केली नव्हती.

मोठय़ा स्वाभिमानानं अशाच एका ८ मार्चच्या सभेत सहभागी झालेल्या, सव्‍‌र्हे नं. २६१ पांडवनगर इथल्या मोलकरीण स्त्रियांच्या जीवनालाच एक मोठा धक्का देणारी कलाटणी मिळाली. एका विलक्षण संघर्षांची तिथे ठिणगी उडाली. आमच्या जीवनालाही एक नवं परिमाण मिळणार होतं त्याविषयी पुढील शनिवारी..

मुक्ता मनोहर

muktaashok@gmail.com