निसर्गात उगवलेलं खाण्याऐवजी मानवाने काही गोष्टी स्वत: पिकवायला सुरुवात केली. स्वत: निर्माण केलेल्या रासायनिक शेतीच्या विनाशचक्रात खेचली जाऊन मानवजातही नामशेष होण्याच्या वाटेवर लागली आहे. शासनाने विषमुक्त, सुरक्षित आणि कसदार अन्नपुरवठय़ाबाबत आग्रही असणं, सेंद्रिय शेतीची व्याप्ती वाढवण्याबरोबरच अन्नधान्य पिकवणारी संपूर्ण शेतीच ‘विषांशमुक्त’ करणं हे नजीकचं उद्दिष्ट मानलं पाहिजे.

‘चले जाव चळवळी’ला १९९२ मध्ये पन्नास र्वष पूर्ण होत होती. ज्येष्ठ स्वातंत्र्यसनिक अच्युतराव पटवर्धन यांनी पाणलोट क्षेत्र विकासाच्या (‘पाक्षेवि’) आधारे सुरुवातीला प्रत्येक तालुक्यातील एक गाव निवडून ते आदर्श गाव बनवावं, असं सुचवलं. हे काम सरकारी यंत्रणेकडून नव्हे, तर स्वयंसेवी संस्थांमार्फत करायचं होतं. ‘नवनिर्माण न्यास’ सुरू करताना विविध भागांतून तरुण कार्यकत्रे सहभागी झाले होते. त्यांच्यापकी एक नामदेव. नांदेड जिल्ह्य़ातल्या त्याच्या वर्ताळा गावात आदर्श गाव योजनेचं काम सुरू करायचं ठरलं. अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली निवडलेल्या पहिल्या यादीत या गावांचा समावेश झाला होता.

Victory over division of voting caused by independents propaganda war on social media in last phase
अपक्षांमुळे होणाऱ्या मतविभाजनावर विजयाचा कौल? अंतिम टप्प्यात समाज माध्यमांवर प्रचारयुद्ध
The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
panvel dr sujay vikhe patil marathi news,
पारनेरचा प्रचार कामोठेमध्ये
talathi bharti
तलाठी भरतीच्या सुधारित गुणवत्ता यादीत अनेक अपात्र; ७० संशयितांचा निकालही थांबवला

विकासकामांचं नियोजन तळागाळापासून व्हायला पाहिजे, असं आपण म्हणतो. ‘पाक्षेवि’बाबत मात्र ‘माथा ते पायथा’ नियोजन आणि अंमलबजावणीही अपेक्षित असते. ‘पाक्षेवि’ म्हणजे थोडक्यात, ‘माती अडवा, पाणी जिरवा’ कार्यक्रम. या प्रकल्पात समाजप्रबोधनाच्या जोडीलाच तांत्रिक कामांचा आराखडा बनवून घेणं, लोकांकडून ती कामं प्रत्यक्ष करून घेणं, त्याच्या नोंदी व हिशेब ठेवणं, पगार काढणं वगरे संस्थांच्या आजवरच्या पठडीपेक्षा वेगळ्या स्वरूपाची कामं अंतर्भूत होती. वर्ताळ्याची निवड झाल्यावर आबांनी तिथे जाऊन एकेक टप्पा सुरू केला. मी अधूनमधून जात होते. हळूहळू गलीप्लग, दगडीबांध, ग्रॅबियन बंधारा, सीसीटी, ढाळाचे बांध वगरे मंडळींची ओळख झाली. लोकांची आणि गावांचीही ओळख होऊ लागली.

आम्ही पहिल्यांदा गेलो, तेव्हा सहा किलोमीटर चालूनच गावात पोचता येत होतं. गावात एखादी सायकलही नव्हती. थोडे महत्त्वाचे पाहुणे कोणाकडेही आले तरी एकमेव टेबलफॅन असलेल्या घरी नेऊन त्यांचा पाहुणचार केला जायचा. रबीचं क्षेत्र जेमतेम दोन-तीन एकर. इथे वर्षांला ४० इंच पाऊस, म्हणजे चांगलाच म्हणायला हवा. तरी पावसाळा संपल्यावर पिण्याच्या पाण्याची पंचाईत व्हायची. मजूरच नव्हे, शेतकऱ्यांनाही ऊसतोड, वीटभट्टय़ा अशा कामांवर ‘जगायला’ जावं लागायचं. यामुळे (देवधर्माव्यतिरिक्त) सामाजिक संघटनही क्षीण होतं. व्यक्ती आणि समाज या दोन टोकांत, त्यांना जोडणाऱ्या विविध संस्था असतात. ज्यात ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत राजकीय संस्था, ते कुटुंबसंस्था, धर्मसंस्था अशा अमूर्त संस्थाही आल्या. एखाद्या समाजाचं संस्थात्मक जीवन किती समृद्ध, निकोप, प्रगल्भ आहे, यावर त्याच्या प्रगतीचे टप्पे दिसून येतात. इथे दूध सोसायटी, पाणीपुरवठा सोसायटी, तरुण मंडळ, असली काही भानगड नव्हती. स्वयंसेवी संस्था माहीत नव्हती. मराठवाडय़ातलं हे एक प्रातिनिधिक खेडं होतं. ‘मागासलेपणा’चे अर्थ आणि आयाम हळूहळू स्पष्ट होत होते.

‘पाक्षेवि’ कामांचा समग्र आराखडा मंजूर करून घेऊन ‘माथा ते पायथा’ कामं सुरू झाली. पुढे आबांची तब्येत साथ देईना. म्हणून त्यांच्याऐवजी मी नियमितपणे वर्ताळ्याला जाऊ लागले. आदर्श गाव राज्य समितीवर माझी नेमणूक झाली. पुण्यात राहायला असल्याने, माझ्यावर जबाबदारी सोपवलेल्या लातूर, नांदेड, उस्मानाबाद आणि परभणी या जिल्ह्य़ांतल्या सुमारे तीस गावांची आराखडा मंजूर होण्यापासून अडकलेली कामं समितीच्या कार्यालयात जाऊन मार्गी लावणं मला शक्य झालं. मोठय़ा धरणांच्या मानाने खूप कमी खर्चात पाण्याची उपलब्धता झाली. खरीप पिकाची हमी मिळाली. जळण, चाऱ्याची तरतूद झाली. डेअरी सुरू झाली. स्थलांतर थांबून रबी पिकांत वाढ झाली. असे सुपरिणाम गावागावांत दिसू लागले. पूर्वी दरमहा भरायला जवळ पसाच नसायचा. आता वर्षभर पसे मिळू लागले. बचतगटांच्या माध्यमातून स्त्रियांमध्ये सामाजिक अभिसरण सुरू झालं. २००० च्या सुमाराला सर्व कामं पूर्ण झाली आणि या पर्वाची सांगता झाली. या प्रक्रियेतील सहभागामुळे माझं मातीशी नातं आणखी दृढ झालं.

२००२ मध्ये आबा गेल्यानंतर पारगावला राहून मी घरची शेती बघायला सुरवात केली. तेव्हा ‘पाक्षेवि’ संकल्पना व अनुभवाचा खूप उपयोग झाला. मुंबईहून येऊन जाऊन दादाची साथ होतीच. परंतु लहानपणीच्या शेतीपेक्षा वेगळा अनुभव येत होता. पूर्वीएवढी किंबहुना जास्तच रासायनिक खतं घालूनसुद्धा उत्पादन घटत चाललं होतं. जमीन कडक होत होती. रोगराईचं प्रमाण वाढलं होतं. अशातच, सुभाष पाळेकर या सेंद्रिय शेतीतज्ज्ञांबद्दल कळलं. आम्ही काही शेतकरी त्यांच्या भाषणाला गेलो. त्यांचं विवेचन ऐकताना रासायनिक शेतीपद्धतीमुळेच हे परिणाम दिसत आहेत, मुळातच काही तरी बिघडतंय, हे लक्षात आलं. आमच्या शेतीतल्या बऱ्याचशा प्रश्नांची उकल होऊ लागली. समजलं त्याप्रमाणे परत येऊन सेंद्रिय शेतीचे प्रयोग सुरू केले. शेतीच्या निरीक्षणांनी खूप काही शिकवलं. उमेद वाढली आणि सेंद्रिय शेतीखालील क्षेत्रही वाढत गेलं. सेंद्रिय शेती करताना आणि अनुषंगाने अभ्यास करताना समजत गेलं, जगभर रासायनिक शेतीचा हाच अनुभव आहे. जमिनीची धूप होत आहे. किडींची प्रतिकारक्षमता वाढत आहे. ‘अमेरिकेत गेल्या ४५ वर्षांत कीटकनाशकांचा वापर १० पटींनी वाढूनही किडींमुळे होणारं नुकसान दुप्पट झालं आहे.’ कीटकनाशकांतली घातक रसायनं अन्नात उतरत आहेत. म्हणून वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड प्रगती होत असूनही समाजातले आजार वाढतच आहेत. मुळात मानवाचं स्वास्थ्य हे वनस्पती, पशुपक्षी आणि ‘जिवंत जमीन’ या सर्वाच्या आरोग्याशी अतूटपणे निगडित आहे, हे लक्षात आलं.

पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांमार्फत चालणाऱ्या निसर्गचक्राचा माणूस हाही एक भाग. तसं पाहिलं तर अगदी दुबळा. पण आपल्या बुद्धिकौशल्याने त्याने बाह्य़ परिस्थितीत हस्तक्षेप केला, त्यातून त्याची प्रगती होत गेली. निसर्गावर मात करण्यापर्यंत त्याची महत्त्वाकांक्षा वाढली. निसर्गात पिकं नसतात, तशी तणंही नसतात. साऱ्या वनस्पती निसर्गाला सारख्याच लाडक्या. या अर्थाने ‘शेती करणं’ हीच निसर्गापासून काहीशी फारकत आहे. इथपर्यंत ठीक आहे. पण आजची संख्यात्मक उत्पादन वाढवणारी संकरित बियाणी, त्यासाठी कृत्रिम रासायनिक खतं, अंतप्र्रवाही विषारी कीटकनाशकं, तणनाशकं, कृत्रिम संप्रेरकं, या सर्वाची मिळून जी ‘रासायनिक शेतीपद्धती’ म्हणून ओळखली जाते, तिचा अर्थ समजून घ्यायला हवा.

निसर्गचक्रात सूक्ष्म जीवजंतूंपासून ते लहानमोठे कीटक, गांडुळं, प्राणी, पशुपक्षी असे अन्नाचे सर्व लाभार्थी, ते अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होतात. पंचमहाभूतांच्या जोडीला, या तमाम जीवसृष्टीच्या योगदानातून वनस्पतींच्या पोषण आणि संरक्षणाच्या यंत्रणांची गुंफण निसर्गात विकसित होत गेली. विशेष म्हणजे, हजारो-लाखो र्वष ती निरंतर चालत राहिली. या सर्व सजीवांचा ‘योगक्षेम वाहण्या’ची आश्वासक हमी या व्यवस्थेत अंतर्भूत होती. सर्व जीवमात्रांचा संख्यात्मक समतोल सांभाळण्याचीही व्यवस्था त्यात होती.

या सर्वाना बाजूला सारून, किंबहुना जिवंत प्रक्रियांचा बळी देऊन तो सगळा मक्ता माणसाने आता स्वत:कडे घेतला आहे. तोही रसायनांच्या जिवावर. यात पुनर्भरण नाही. नसर्गिक, जैव यंत्रणांचं जतन नाही. निसर्गचक्राचा आदर नाही. त्याच्यावर विजय मिळवण्याचा अट्टहास आहे. सर्व जीवमात्रांचा नाही, फक्त स्वत:चा विचार आहे. कृत्रिम रसायनांमुळे अन्नद्रव्यांचं संतुलन ढासळून जमिनीचं आरोग्य बिघडू लागलं. उत्पादनावर परिणाम झाला. नेमक्या याच गोष्टी आमच्या शेतीत घडत होत्या. रासायनिक निविष्टा बंद करून नसर्गिक प्रक्रियांना वाव दिल्यानंतर सर्वात पहिला बदल दिसला तो मातीच्या पोतात. ‘कोंभाची लवलव। सांगे मातीचे मार्दव’ या उक्तीप्रमाणे पिकांतही तो उतरला.

रासायनिक शेतीपद्धतीमुळे पिकांतील पोषक अन्नद्रव्यांचा ऱ्हास होतो. विषारी रसायनांच्या प्रभावामुळे प्रजननक्षमता क्षीण होऊन सजीवांच्या अनेक प्रजाती नष्ट होऊ लागल्या आहेत. अमेरिकेचा राष्ट्रीय पक्षी गरुड, नामशेष होणाऱ्या प्रजातींच्या यादीत आला तेव्हा तिथे खळबळ उडाली. पण र्निवश होणाऱ्या अतिसूक्ष्म जीवाचंही निसर्गात कळीचं स्थान असतं, मानवाच्या अस्तित्वासाठीही तो जीव तितकाच महत्त्वाचा असतो, हे आपण विसरलो. स्वत: निर्माण केलेल्या या विनाशचक्रात खेचली जाऊन मानवजातही नामशेष होण्याच्या वाटेवर लागली आहे, याचंही भान आपल्याला राहिलेलं नाही. पुरुषांमधील वंध्यत्व वाढत चालल्याची संशोधनं रोज प्रसिद्ध होत आहेत. लहानपणीच्या गोष्टीतल्या राक्षसाचा जीव कुठल्या तरी दूरवरच्या पिंजऱ्यातल्या पोपटात अडकलेला   मानवजातीचा जीवही या प्रत्येकामध्ये अडकलेला आहे. ते संपले तर आपणही फार काळ तग धरू शकणार नाही. ‘जगातल्या शेवटच्या मधमाशीनंतर आपण फार तर चारएक र्वष जगू’ हे अल्बर्ट आइन्स्टाइनचे उद्विग्न उद्गार हेच अधोरेखित करतात. आज ‘नष्ट होण्याच्या वाटेवरील प्रजातीं’च्या यादीत मधमाश्यांचा समावेश झालेलाच आहे. पूतनामावशीची कथा पुराणांपुरती मर्यादित राहिलेली नाही. अमृतासमान मातेचं दूध आज बहुविध विषांचं कॉकटेल झालं आहे. आपलं अन्नच आपल्याला फितूर झालं आहे. अर्थव्यवस्थेत शेती आणि शेतीत मातीची उपेक्षा केल्याचे गंभीर परिणाम आपल्या उंबरठय़ावर येऊन धडकले आहेत.

वैयिक्तक आयुष्यात एका दुर्दैवी क्षणी अन्नाचं हे प्राणघातक, विषारी स्वरूप माझ्यापुढे अचानक उभं ठाकलं आणि मी हडबडून गेले. सेंद्रिय शेती आधीपासून सुरू होती. पण नुसती सेंद्रिय शेती करणं पुरेसं नाही; विषमुक्त सेंद्रिय उत्पादनं ग्राहकापर्यंत सातत्याने पोचवणं आणि त्यांनी ती जाणीवपूर्वक स्वीकारणंही तितकंच महत्त्वाचं आहे, हे प्रकर्षांने जाणवलं. यानंतर परिसरातील शेतकऱ्यांशी बोलून ‘सेंद्रिय सेतू’ या शेतकरी गटाची स्थापना केली. सभासद शेतकऱ्यांनी भाजीपिकं आपसात वाटून घेऊन, सेंद्रिय पद्धतीने पिकवून त्याची शहरी ग्राहकांना थेट विक्री करणं, असं थोडक्यात ‘सेतू’च्या कामाचं स्वरूप. हवामानातील तीव्र बदलांपासून ते बदलत्या जीवनशैलीमुळे घराघरातील स्वयंपाकघराचा होणारा संकोच, या आव्हानांना तोंड देत मागणी आणि पुरवठा यांचा मेळ घालण्याची कसरत करावी लागली. यात आमच्या मालाचा भाव आम्ही शेतकरी ठरवत होतो, हे विशेष. ग्राहकांना खात्रीशीर सेंद्रिय शेतमाल आणि शेतकऱ्यांना हमीभावासह खात्रीची बाजारपेठ, असं हे फूल आणि मधमाशीचं नातं तयार झालं होतं. मुख्यत: वाहतूक व विक्रीखर्च न परवडल्यामुळे या उपक्रमाचं स्वरूप थोडं बदललं आहे. सध्या सेंद्रिय विक्री करणाऱ्या काही संस्थांना आम्ही सेंद्रिय भाज्या पुरवत आहोत.

आता शासनाने शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीचा पुरस्कार सुरू केला आहे. केलेल्या कामातून धोरणात्मक बदलांकडे वाटचाल व्हावी, ही सामाजिक कार्यातली अपेक्षा पूर्ण होत असल्याचं समाधान जरूर आहे. पण अन्नसुरक्षेमध्ये ‘सुरक्षित अन्न’ हा महत्त्वाचा घटक समजला जात नाही, याची खंतही आहे. अक्षरश: जिवावर बेतणाऱ्या विषारी रसायनांच्या राजरोस आणि अंदाधुंद फवारण्या आपल्या रडारवरच येत नाहीत. रासायनिक शेतीऔषधांसाठी वर्षांकाठी ऐंशी हजार कोटी रुपयांचं अनुदान दिल्याच्या जाहिराती झळकतात, तेव्हा छातीत धडकी भरते. १९६० पर्यंत फक्त सेंद्रियच शेती असलेल्या आपल्या देशात, सेंद्रिय शेतीच्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात कृषी नव्हे, तर वाणिज्य मंत्रालयाकडून झाली. आज सारं जग भारताकडे मोठी बाजारपेठ म्हणून पाहात आहे. विषमुक्त सेंद्रिय अन्नाचं उत्पादन मात्र आपण मुख्यत: निर्यातीसाठी करत आहोत. अलीकडेच, निर्यातीसाठी निगुतीने पिकवलेल्या द्राक्षांचे कन्टेनर्स, त्यात क्लोरोमेट क्लोराइड हा एक घटक विहित प्रमाणापेक्षा जास्त आढळला म्हणून युरोपच्या उंबरठय़ात तिष्ठत राहून शेवटी परत आले. ही जागरूकता आपल्या सरकारकडून आपल्या जनतेसाठी का दाखवली जात नाही? सरकारी साहाय्याने उभ्या राहणाऱ्या शेतकरी बाजारात विषमुक्तच भाजीपाला मिळण्याचा आग्रह का धरला जाऊ नये?

आज देशी सेंद्रिय बाजारपेठ निर्माण करण्याचे प्रयत्न बहुतांशी सेंद्रिय शेतकऱ्यांच्या किंवा त्यांच्या गटांच्या पुढाकाराने एकाकीपणे चाललेले आहेत. याला मर्यादा आहेत. शासनाने विषमुक्त, सुरक्षित आणि कसदार अन्नपुरवठय़ाबाबत आग्रही असणं,  सेंद्रिय शेतीची व्याप्ती वाढवण्याबरोबरच अन्नधान्य पिकवणारी संपूर्ण शेतीच ‘विषांशमुक्त’ करणं हे नजीकचं उद्दिष्ट मानलं पाहिजे. आजच्या बाजारव्यवस्थेचा बाज शेतकरी आणि ग्राहक या दोन्ही घटकांच्या विरोधी आहे. शेतीतील सर्वच अरिष्टांची चर्चा करण्याची ही जागा नाही. पण शेतकऱ्यांचे गट बनत आहेत. सुजाण ग्राहकांनीही एकत्र येऊन सेंद्रिय शेतकऱ्यांना पाठबळ पुरवावं. या दोघांचं जिवंत नातं बळकट व्हावं. त्यासाठी आणि या लेखांच्या निमित्ताने झालेली ओळख पक्की करण्यासाठी आमच्या सेंद्रिय शेतीला अवश्य भेट द्या. आपलं स्वागत आहे.

लेखिका सेंद्रिय कृषिभूषण पुरस्कार प्राप्त आहेत.

पारगाव सालोमालो, ता. दांडै, जि. पुणे ४१२२०३.

संपर्क क्रमांक-९०११०३४९५०.

वसुधा सरदार ajitvasudha@gmail.com (समाप्त)