प्रत्यक्षात वकील म्हणून काम करताना न्याय मिळण्याच्या वाटेत स्त्रियांना येणाऱ्या अनेक अडचणी मला समजल्या आणि अतिगरीब स्त्रियांच्या केसेस घेऊ  लागले. पण त्यांना नियमितपणे हजर राहणेसुद्धा अशक्य होई. कारण त्यांच्यासोबत यायला घरच्यांना वेळ नसे तसेच त्यांच्याकडे प्रवास खर्चासाठी पैसेसुद्धा नसत. त्यांना न्याय देण्याच्या विचारातूनच पुढे ‘चेतना स्त्रिया विकास केंद्रा’ची स्थापना झाली.

पुण्यातील ‘सेंट अ‍ॅण्ड्रय़ुज गर्लस्’ हायस्कूलमध्ये शिकताना शालेय शिक्षणासोबतच इतरही खूप गोष्टी शिकण्यास मिळाल्या. उदाहरणार्थ, शाळेमध्ये मुलींनी येता-जाता महत्त्वाच्या बातम्या वाचाव्यात, या उद्देशाने वर्तमानपत्रातील महत्त्वाची कात्रणे एका मोठय़ा फळ्यावर लावली जात. त्यासाठी वरच्या वर्गातील मुली व काही शिक्षिका पुढाकार घेत असत. मी शाळेत प्रवेश घेतल्यापासून नियमितपणे या बातम्या वाचत असे. दहावीत असताना पुण्यात हुंडाबळींच्या बातम्यांनी वर्तमानपत्रांचे रकाने भरत. ते वाचून मन सुन्न होत असे. त्याच वेळी मी मनोमन निश्चय केला की आपण वकील होऊन स्त्रियांवरील अत्याचार रोखायचे.

पुढे ‘नवरोसजी वाडिया’ महाविद्यालयामध्ये बी. ए.च्या प्रथम वर्गात प्रवेश घेतला. आमच्या वर्गात नियमितपणे येणाऱ्या मुलींची संख्या कमीच असायची. राज्यशास्त्राच्या तासाला तर मी एकटी मुलगी असे. एकतर पालक मुलींना पाठविण्यास नाखूश होते आणि मुलीसुद्धा मुलांच्या शेरेबाजीला कंटाळून येण्याचे टाळत. त्या काळात माझ्या एका वर्गमैत्रिणीच्या बाबतीत अशीच एक घटना घडली. झाले असे की, काही मुली आकुर्डी ते पुणे रोज लोकल रेल्वेने प्रवास करून महाविद्यालयात येत. बहुतेक सर्वच मुली स्त्रियांच्या विशेष कम्पार्टमेंटमध्येच बसत किंवा उभ्या राहात. लोकलच्या डब्याच्या रचनेप्रमाणे वरच्या भागाला जाळी लावल्यामुळे दुसऱ्या डब्यातील लोकांना सहजपणे पलीकडे डोकावता येत असे. माझी मैत्रीण अगदी मान खाली घालून वावरणारी असली तरी तिलासुद्धा मुले चिडवत. एके दिवशी मी माझ्या राज्यशास्त्राच्या वर्गात जात असताना तिने एक चिठ्ठी माझ्या हातात ठेवली. त्यात म्हटलं होतं की दोन मुलगे मला सतत चिडवत असतात म्हणून मी आत्महत्येचा निर्णय घेतला आहे. चिठ्ठी वाचून मी हादरूनच गेले. तिचा विषय नसल्याने तिला आमच्या वर्गात बसता येणार नव्हते, पण आमची वर्गखोली बेसमेंटमध्ये असल्याने तिला एका खांबाच्या मागे बसवून मी तिचा हात घट्ट पकडून मागील बाकावर जाऊन बसले होते. वर्ग सुटल्यावर मी तिला समजावण्याचा प्रयत्न करू लागले तर ती रडायलाच लागली. तिचे वडील व भाऊ  पोलीस होते व त्यांना हे समजले तर ते तिला मारतील व तिचे महाविद्यालयात येणे कायमचे बंद होईल, अशी भीती तिला वाटत होती.

आम्ही दोघी तिथे बोलत उभ्या असतानाच आमचा वर्गप्रतिनिधी समोर दिसला. मी त्याच्याशी तिला होणाऱ्या त्रासाबद्दल तावातावाने बोलू लागले. मी एवढय़ा आवेशात बोलत होते की, ५०-६० मुले-मुली गोळा झाल्याचे मला समजलेसुद्धा नाही. हा प्रश्न प्राचार्यापर्यंत गेला व त्या दोन मुलांना तात्पुरते काही दिवस महाविद्यालयात येण्यास बंदी घालण्यात आली. या सर्व प्रकाराने आमच्या शिक्षकांनी मला बोलावून घेतलं आणि  सांगितलं, ‘‘मुलांबरोबर अशी भांडू नकोस नाहीतर ती मुले तुलाच त्रास द्यायला सुरुवात करतील. तूसुद्धा लहानच आहेस.’’  पण मी मात्र माझ्या मैत्रिणीला कसा न्याय मिळवून दिला या गोष्टीने खूप आनंदून गेले होते. माझे घर जवळ असतानाही मी त्या दिवशी तिला अगदी रेल्वे स्थानकापर्यंत सोडवायला गेले. त्यानंतर बऱ्याच मुली माझ्याकडे त्यांचे प्रश्न घेऊन येत. मी नेहमीच नोकरी करून शिकत होते, त्यामुळे प्रत्यक्षात वर्ग प्रतिनिधी होऊन मुलींच्या समस्या सोडविणे मला शक्य नव्हते. मी ते आमच्या वर्ग प्रतिनिधीच्या कानावर घालत असे. वेळप्रसंगी खोडकर मुलांची कानउघाडणीसुद्धा करत असे. या सर्व प्रवासात माझ्या शिक्षकांचाही माझ्या जडणघडणीत मोठा वाटा होता. एन.एस.एस.च्या कार्यक्रमांमधून मी सामाजिक प्रश्नांबद्दल आणखी सजग झाले.

त्यानंतर मी एलएल.बी.साठी ‘सिम्बॉयसिस’ला गेले व एका सामाजिक संस्थेत नोकरी करू लागले. मी रोज नव्याने शिकणाऱ्या कायद्यांची माहिती माझ्या संपर्कातील स्त्रिया व युवकांना देऊ लागले. मी काम करत असलेल्या वस्तीत रोजच वेगवेगळ्या कारणांवरून शेजाऱ्यांमध्ये भांडणे होत, कौटुंबिक वाद होत. मी माझ्या परीने तो सोडविण्याचा प्रयत्न करत असे. माझ्या सपंर्कात येणाऱ्या स्त्रिया व मुली सर्व वयोगटातल्या होत्या. त्यांचे प्रश्न नागरी सोयी-सुविधांचा अभाव आणि गरिबीशी निगडित तर होतेच पण जास्त प्रमाणात कौटुंबिक हिंसा व लैंगिक अत्याचारांशी संबंधित होते. त्यांच्या कौटुंबिक प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी मला कायद्याच्या चौकटीत काही उत्तर सापडत नव्हतं. पण तरीही मी त्यांना नवऱ्याकडून मारहाण झाली तर पोलिसांकडे नेऊन त्याच्यांवर झालेल्या अत्याचाराची कुठल्यातरी कलमाखाली नोंद करावी म्हणून आग्रह धरत असे. एकदा एका बाईच्या नवऱ्याला ‘हाफ मर्डर’च्या आरोपाखाली सहा महिने तुरुंगात पाठविले होते तर एका सेंट्रल बँकेत काम करणाऱ्या एका दारुडय़ा नवऱ्याला ९ महिन्यांच्या गर्भवती पत्नीला लैंगिक सुखाची मागणी पूर्ण करण्यासाठी जबरदस्ती करण्याच्या कारणावरून मनोरुग्णालयात भरती करून उपचार करण्यास भाग पाडले. या अशा अनेक घटनांतून कायद्याची विद्यार्थिनी म्हणून मी घडत होते व कधी एकदा वकील होऊन अशा प्रकरणांचा फडशा पाडते असे होऊन गेले होते.

१९९४ ला सनद हातात पडताच माझा आनंद गगनात मावेनासा झाला, पण मला वकिली करता येणार नाही असे संस्थेने सांगितल्याने मी ती नोकरी सोडली व एका वकिलाकडे कामाला रुजू झाले. पण वकिलीच्या क्षेत्रात कनिष्ठांना (ज्युनिअर्सना) मानधन देण्याची पद्धत नसल्याने पुन्हा मला अर्थार्जनासाठी नोकऱ्या शोधाव्या लागल्या व एका स्त्री सक्षमीकरणाच्या प्रकल्पात मी समन्वय या पदावर वकिली करण्याच्या सवलतीसह रुजू झाले. त्यानंतर रोज सकाळी व संध्याकाळी कार्यालयीन कामे करून दुपारच्या वेळेत मी न्यायालयात काम करू लागले. मी पहिल्यांदाच पोटगीची केस कौटुंबिक न्यायालयात दाखल केली. तिचा एकतर्फी निकालही लागला. पण माझ्या अशिलाचा नवरा परदेशात असल्याने वसुली कशी करावी हा प्रश्न होता. मी त्याच्या आसपास राहणाऱ्या रहिवाशांना भेटून तो आला की मला कळवा असे सांगितले होते. त्याप्रमाणे त्यांनी मला कळवले व एके दिवशी सकाळी ६ वाजताच त्याला बेलिफांमार्फत नोटिस बजावून पोलिसांनी न्यायालयात हजर केले. मी ठरल्याप्रमाणे न्यायालयात जाऊन तिला तिचे पैसे मिळवून दिले. सोबत तिची बहीणही आली होती. तिला फार नाही फक्त २५०० रुपयांची वसुली मिळाली. आता मी एवढय़ाशा खर्चात मुलींचा खर्च कसा भागवू याची चिंता तिला लागली. या घटनेने मी खूप शिकले आणि प्रत्यक्षात न्याय मिळण्याच्या वाटेत स्त्रियांना येणाऱ्या अनेक अडचणी मला समजल्या व अशा प्रकारच्या अति गरीब स्त्रियांच्या केसेस घेऊ  लागले. पण त्यांचा प्रश्न वेगळाच होता. त्यांना नियमितपणे तारखांना हजर राहणेसुद्धा अशक्य होई. कारण त्यांच्यासोबत घरच्या कुणाला यायला वेळ नसे आणि त्यांच्याकडे प्रवास खर्चासाठी पैसेसुद्धा नसत. म्हणून त्या केस दाखल केल्यावर सुरुवातीला न्यायालयात येत परंतु नंतर मध्येच गायब होत आणि त्यांचा शोध घेणे मला अवघड होई. याच दरम्यान आमच्या प्रकल्पांच्या संचालकांना मी संस्थेची नोंदणी केली पाहिजे असे सुचविले आणि ‘चेतना स्त्रिया विकास केंद्रा’ची स्थापना झाली. त्याविषयी पुढच्या २५ मार्चच्या लेखात.

अ‍ॅड. असुंता पारधे

assunta.pardhe@gmail.com