मार्च २०१५मध्ये दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचा अकरावी प्रवेश ऑनलाइन पद्धतीने होणार असून त्यासंदर्भातील पुस्तके २७ मे पासून शाळांमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या पुस्तकामध्ये विद्यार्थ्यांना लॉगइन आयडी आणि पासवर्ड व महाविद्यालयांच्या सांकेतिक क्रमांकाचा नमुना दिला जाणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विभागातील महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने केली जाते. यासाठी विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शन पुस्तिका दिली जाते. ही पुस्तिका विभागातील विद्यार्थ्यांना शाळांमध्ये मिळेल तर विभागाबाहेरील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केंद्रावर मिळेल,असे आवाहन शिक्षण उपसंचालकांनी केले आहे. विद्यार्थ्यांची माहिती दोन भागात भरावयाची असून पहिल्या भागात वैयक्तिक माहिती माहिती तर दुसऱ्या भागात महाविद्यालयांच्या पसंती क्रमाचा आहे. पुस्तक मिळाल्यावर यातील पहिला भाग शाळेच्या मदतीने भरता येईल. तर दुसरा भाग हा दहावीचा निकाल लागल्यावर भरावयाचा आहे. तोपर्यंत विद्यार्थी दुसऱ्या भागाचा सराव माहिती पुस्तिकेतील नमूना प्रवेश अर्जाच्या मदतीने करावा असे आवाहनही उपसंचालकांनी केले आहे. विद्यार्थ्यांना कार्यालयाच्या www.fyjc.org.in/mumbai, www.dydemumbai.org या संकेतस्थळावर या संदर्भातील माहिती उपलब्ध होईल. अकरावीच्या जागा यंदा २,७१३ ने वाढल्या आहेत. गेल्या वर्षी अकरावीच्या १,६०,१२८ जागा होत्या. त्या आता १,६२,८४१ इतक्या झाल्या आहेत. या पैकी ९०,५४९ इतक्या जागा शिक्षण उपसंचालकांच्या मार्फत ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमार्फत भरल्या जाणार आहेत. उर्वरित जागा या इनहाऊस, व्यवस्थापन आणि अल्पसंख्याक कोटय़ातील आहेत.