दहावीच्या परीक्षेच्या विक्रमी निकालाचे परिणाम अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीवरही दिसून आला आहे. पहिल्या गुणवत्ता यादीच्या तुलनेत दुसऱ्या गुणवत्ता यादीत अवघ्या तीन आणि पाचच गुणांची घसरण झाल्याचे चित्र आहे.
दुसरी गुणवत्ता यादी बुधवारी जाहीर झाली. या यादीत ५३६०२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. यापकी ३४,६११ विद्यार्थ्यांना नवीन प्रवेशासाठी बेटरमेंटची संधी मिळाली तर या यादीत १८९९१ विद्यार्थ्यांचे नवीन प्रवेश निश्चित झाले आहेत.
कला शाखेत १६४६ विद्यार्थ्यांना तर वाणिज्य शाखेच्या ३५,२९५ आणि विज्ञान शाखेच्या १६,६६१ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाल्याचे शिक्षण उपसंचालक कार्यालयातून स्पष्ट करण्यात आल़े  दुसऱ्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना ११ जुलैपर्यंत संबंधित महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चिती करावी लागणार आहे.
जागाच जागा!
दुसरी गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर सुमारे साडेसात हजार विद्यार्थाना अद्याप प्रवेश मिळू शकलेला नाही. या विद्यार्थ्यांना तिसऱ्या गुणवत्ता यादीमध्ये प्रवेश मिळू शकेल. कारण दुसरी गुणवत्ता यादी जाहीर होण्यापूर्वी तब्बल ८० हजार जागा रिक्त होत्या. यामुळे सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळून आणखी जागा शिल्लक राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.