बारावी परीक्षेला १२ लाख ९४ हजार ३६३ विद्यार्थी बसणार आहेत. बारावी परीक्षेपुढील सर्व अडथळे दूर झाले असून शासनाने आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे परीक्षा सुरळीत पार पडेल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घेऊन त्यानुसार उत्साहाने व कोणताही ताण येऊ न देता परीक्षेला सामोरे जावे, असे त्यांनी सांगितले.
रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित व अर्थशास्त्र या चार विषयांच्या वेळापत्रकात काही दिवसांपूर्वी बदल करण्यात आला. त्यानुसार आता ही परीक्षा पार पडेल. या परीक्षेसाठी ७५३५ कनिष्ठ महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असून २३२२ परीक्षा केंद्रे आहेत. काही विषयांची परीक्षा रविवार १७ मार्चलाही होणार असल्याने मुंबई विभागात मध्य, हार्बर किंवा पश्चिम मार्गावर मेगाब्लॉक ठेवू नये, अशी विनंती शालेय शिक्षण विभागाने रेल्वे महाव्यवस्थापकांना केली आहे. माहिती तंत्रज्ञान विषयाच्या ऑनलाइन परीक्षेसाठी ७७,९५७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून १०३८ केंद्रांवरुन विद्यार्थी ही परीक्षा देतील.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक विभागीय मंडळामध्ये एक या प्रमाणे जिल्हानिहाय समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षेत कॉपी किंवा अन्य गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी मोहीम राबविली जाणार असून प्रत्येक जिल्ह्य़ासाठी ७ अशी २४५ भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत.
विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण आल्यास संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांशी संपर्क साधावा. तसेच मंडळनिहाय हेल्पलाइनही सुरू करण्यात आल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष सर्जेराव जाधव यांनी केले आहे. मंडळनिहाय हेल्पलाइन क्रमांक पुढीलप्रमाणे- मुंबई (०२२) २७८९३७५६, पुणे (०२०) ६५२९२३१६, नागपूर (०७१२) २५५३५०७, औरंगाबाद (०२४०) २३३४२२८, नाशिक (०२५३) २५९२१४३, कोल्हापूर (०२३१) २६९६१०३, अमरावती (०७२१) २६६२६०८, लातूर ( ०२३८२) २२८५७०, कोकण ( ०२३५२) २३१२५०.