‘बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९’ अंतर्गत पालिकेच्या शिक्षण विभागाने २०१५-१६ या शैक्षणिक वर्षांत आपल्या विविध माध्यमांच्या ११६ प्राथमिक शाळांमध्ये इयत्ता आठवीचे १५२ वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सातवी उत्तीर्ण झालेल्या पाल्यासाठी या शाळांमध्ये प्रवेश घ्यावे, असे आवाहन पालिकेने नागरिकांना केले आहे.
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्राथमिक शिक्षण इयत्ता आठवीपर्यंत करण्यात आले आहे. त्यामुळे पालिकेने आपल्या प्राथमिक शाळांमध्ये इयत्ता आठवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जूनपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षांमध्ये पालिकेच्या मराठी माध्यमाच्या २६, हिंदी माध्यमाच्या ४०, उर्दू २०, इंग्रजी १०, गुजराथी ८, तामिळी ८, तेलुगु २, तर कन्नड २ प्राथमिक शाळांमध्ये हे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.