बोगस पटसंख्या दाखवणाऱ्या राज्यातील २३१ शाळांची मान्यता रद्द करण्यात येणार असून त्याबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येणार असल्याचे राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने यांनी सांगितले. नेहरू युवा केंद्र, पुणे श्रमिक पत्रकार संघ यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमानंतर माने यांनी पत्रकारांशी संवाद साधला. रस्त्यावर भीक मागणाऱ्या, बेघर मुलांसाठी निवासी शाळा सुरू करण्यात येणार असल्याचेही माने यांनी सांगितले.
शासनाकडून अनुदान लाटण्यासाठी शाळा बोगस विद्यार्थिसंख्या दाखवत असल्याचा तक्रारी आल्यामुळे राज्यभरामध्ये पडपडताळणी मोहीम राबवली गेली होती. या पटपडताळणीमध्ये बहुतांश शाळांनी बोगस पटसंख्या दाखवल्याचे उघड झाले होते. याबाबत विचारले असता माने म्हणाले, ‘‘पटपडताळणीमध्ये अनेक शाळा दोषी आढळल्या होत्या. त्यामध्ये ज्या शाळांनी पन्नास टक्क्य़ांपेक्षा जास्त प्रमाणात बोगस विद्यार्थी दाखवले अशा राज्यभरात २३१ शाळा आहेत. अशा शाळांची मान्यता रद्द करण्यात येणार आहे.’’

बेघर मुलांसाठी शासन निवासी शाळा
नेहरू युवा केंद्र, पुणे श्रमिक पत्रकार संघ यांच्यातर्फे ‘रस्त्यावरील मुलांचे शिक्षण, पुनर्वसन योजना आणि प्रसारमाध्यमांचे योगदान’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी माने म्हणाले, ‘‘शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रत्येक मुलाला शिक्षणाचा अधिकार मिळाला आहे. मात्र, अजूनही अनेक मुले शिक्षणापासून वंचित आहेत. रस्त्यावर भीक मागणाऱ्या, बेघर अशा मुलांसाठी स्वतंत्रपणे शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ही शाळा निवासी असून पुढील शैक्षणिक वर्षांपासून ती सुरू होणार आहे. राज्यातील पहिली शाळा पुण्यामध्ये सुरू करण्यात येणार असून त्या संदर्भात पुणे महानगरपालिकेकडे जागेसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.’’