तीन प्रवेश फेऱ्या राबविल्यानंतरही सरकारी व अनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये रिक्त राहिलेल्या ३१२ जागांकरिता सोमवारी विशेष प्रवेश फेरी सुरू करण्यात आली.
आयआयटी, एनआयटी आदी केंद्रीय संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांमुळे अनेक नामांकित सरकारी महाविद्यालयांमध्ये दरवर्षी प्रवेश प्रक्रियेच्या शेवटी काही जागा रिक्त राहतात. यंदा यामुळे तब्बल ३१२ जागा रिक्त राहिल्या आहेत.
यात व्हीजेटीआय, आयसीटी, सीओईपीसारख्या दर्जेदार सरकारी महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांकडून सर्वाधिक मागणी असलेल्या अभ्यासक्रमांच्या रिक्त जागांचाही समावेश आहे. या जागांवर प्रवेश मिळविण्याची संधी या विशेष प्रवेश फेरीमुळे विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
या रिक्त जागांमध्ये व्हीजेटीआयमधील संगणकशास्त्र आणि माहिती-तंत्रज्ञानाच्या प्रत्येकी दोन जागा, इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीच्या सहा, इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशनच्या आणि सिव्हिलच्या प्रत्येकी पाच जागांचा समावेश आहे, तर सरदार पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल या अभ्यासक्रमांच्याही काही जागा रिक्त आहेत.
‘इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल इंजिनीअरिंग’च्या (आयसीटी) रसायन अभियांत्रिकी, फायबर आणि टेक्स्टाइल प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी, पॉलिमर अभियांत्रिकी आणि टेक्नॉलॉजी आणि खाद्य तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी या अभ्यासक्रमांच्याही जागा रिक्त आहेत. विद्यार्थ्यांनी इतर क्षेत्रांना पसंती दिल्याने अभियांत्रिकी महाविद्यालयांना प्रतिसाद मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

६ ऑगस्टकडून पसंतीक्रम
मुंबईबाहेरील पुण्याचे सीओईपी, औरंगाबाद, कराड, चंद्रपूर, जळगाव, अवसरी आणि अमरावती येथील सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालये, नांदेडचे गुरू गोविंद सिंगजी इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनीअरिंग आदी सरकारी आणि अनुदानित महाविद्यालयांमधील रिक्त जागांवर प्रवेश मिळविण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. याकरिता ६ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांकडून पसंतीक्रम भरून घेतला जाणार आहे. रिक्त जागांची माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.