शिक्षक पदाच्या नियुक्तीसाठी ‘केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा’तर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या पात्रता चाचणी परीक्षेत देशभरातून अवघे एक टक्का शिक्षक उत्तीर्ण होऊ शकले आहेत.
‘सेंट्रल टीचर एलिजिबिलीटी टेस्ट’ (सीटीईटी) नामक या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. देशभरातून तब्बल ७ लाख ९५ हजार बीएड उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती. परंतु, नोव्हेंबर, २०१२मध्ये झालेल्या या परीक्षेत तब्बल ९९ टक्के उमेदवार नापास झाले असून अवघा १ टक्का म्हणजे ४,८४९ उमेदवार शिक्षक पदाच्या नेमणुकीसाठी पात्र ठरले आहेत.
‘शिक्षण हक्क कायद्या’तील तरतुदीनुसार अध्यापनाचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती पात्रता चाचणीद्वारे केली जाणे अपेक्षित आहे. त्यानुसार २०११पासून ही परीक्षा घेण्यात येत आहे. सीबीएसईशी संलग्नित केंद्रीय शाळांमधील शिक्षक पदाच्या नियुक्तीसाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे यापुढे बंधनकारक असणार आहे.
परंतु, मागील दोन परीक्षांच्या तुलनेत खालावलेला यंदाचा निकाल देशात दिल्या जाणाऱ्या बीएड प्रशिक्षणाच्या घसरलेल्या दर्जाचेच निदर्शन आहे. पहिल्या परीक्षेचा निकाल ९ टक्के व त्या पुढील वर्षी घेण्यात आलेल्या परीक्षेत हो निकाल ७ टक्के होता. पण, आता अवघ्या एक टक्क्य़ावर आलेल्या निकालाने बीएड शिक्षणाच्या दर्जावरच बोट ठेवले आहे.
महाराष्ट्रातही जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्तीसाठी २०१० साली पहिल्यांदा प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेची काठीण्यपातळी सीटीईटीपेक्षा कमी असल्याने सरकारला शिक्षकांच्या उपलब्ध जागा भरण्यापुरते उमेदवार मिळू शकले. परंतु, राज्यभरातून ही परीक्षा देणाऱ्या सुमारे १ लाख ४० डीएड उमेदवारांपैकी अवघे ५४ हजार नियुक्तीसाठी पात्र ठरले होते. त्यातही इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांच्या नियुक्तीसाठी उमेदवार न मिळाल्याने सरकारला पात्रता निकष खाली आणावे लागले होते.
सीटीईटीच्या परीक्षेच्या निमित्ताने देशातील बीएड शिक्षणाचा दर्जाही दिसून आला आहे. या परीक्षेच्या पहिल्या पेपरमध्ये २ लाख ७१ हजार उमेदवारांपैकी अवघ्या २,४८१ उमेदवारांना (०.९१टक्के) उत्तीर्ण होता आले आहे. तर दुसऱ्या पेपरमध्ये ५ लाख २४ हजार उमेदवारांपैकी केवळ २,००,३६८ (०.४५टक्के) उमेदवार उत्तीर्ण होऊ शकले. पहिली ते पाचवीपर्यंतच्या वर्गासाठी पहिल्या पेपरमध्ये तर पाचवी ते आठवीपर्यंतच्या वर्गासाठी दुसऱ्या पेपरमध्ये पास होणे बंधनकारक आहे.
सीबीएसईच्या उर्वरित संलग्न शाळांसाठी सीटीईटी किंवा त्या त्या राज्य सरकारची पात्रता चाचणी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.