‘मराठी भाषा दिन’ साजरा न करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करण्याचा इशारा मुंबई विद्यापीठाने दिला आहे.
विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये २७ फेब्रुवारी रोजी ‘मराठी भाषा दिन’ साजरा करण्यात यावा, असे विद्यापीठाचे परिपत्रक आहे. परंतु, विद्यापीठाच्या तब्बल ६५० संलग्नित महाविद्यालयांपैकी केवळ ३० टक्के महाविद्यालयांनी गेल्या वर्षी हा दिवस साजरा केला होता. खुद्द विद्यापीठाने दिलेल्या या माहितीनंतर ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना’ने सर्व महाविद्यालयांना हा दिवस साजरा करणे बंधनकारक करण्यात यावे, अशी मागणी केली. त्यानुसार विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाने नव्याने परिपत्रक काढून सर्व महाविद्यालयांना मराठी भाषा दिनानिमित्त कार्यक्रम सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
महाविद्यालयाच्या मराठी भाषा व वाङ्मय मंडळामार्फत उपक्रम राबविताना विद्यार्थ्यांची भाषिक जाणीव समृद्ध करणे, अमराठी भाषकांना मराठी भाषेच्या व संस्कृतीच्या मुख्य प्रवाहात आणणे आदी उद्दिष्टांना अनुसरून कार्यक्रम आयोजिण्यात यावे, असे विद्यापीठाने म्हटले आहे. कार्यक्रम न घेतल्यास संबंधित महाविद्यालयांवर कारवाई करण्याचा इशारा विद्यापीठाने दिला आहे.