प्रवेश प्रक्रियेला चांगला पर्याय मिळेपर्यंत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया बंद करण्याची मागणी शिवसेनाप्रणित युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना भेटून केली आहे. याशिवाय परीक्षांचे वेळापत्रक आणि मूल्यांकनातील गोंधळ दूर करून परीक्षा व्यवस्थेची पुनर्बाधणी करण्याची मागणीही ठाकरे यांनी केली आहे.
ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमुळे दरवर्षी प्रचंड गोंधळ उडतो. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेनंतरही विद्यार्थ्यांना पुढच्या प्रक्रियेसाठी महाविद्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. यासाठी योग्य तो नवा पर्याय मिळेपर्यंत ऑनलाइन प्रवेश प्रक्रियाच रद्दबातल करावी, अशी  मागणी ठाकरे यांनी केली आहे.
यासह महाविद्यालयांमध्ये स्वच्छ उपहारगृह, स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्याची, तक्रार निवारणासाठी ‘हॉटलाईन’ यंत्रणा निर्माण करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकरदेखील उपस्थित होते.