संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाअंतर्गत शिक्षणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या (बी.एड.) परीक्षेदरम्यान सोमवारी सर्व परीक्षा केंद्रांवर अन्य विषयाची प्रश्नपत्रिका वितरित झाल्याने प्रचंड गोंधळ उडाला. परीक्षार्थ्यांनी उत्तरपत्रिका सोडवण्यास नकार दिल्यानंतर परीक्षा रद्द करण्यात आली.
अमरावती विद्यापीठाची बी.एड.ची परीक्षा आजपासून सुरू झाली. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी विद्यापीठाचा घोळ समोर आला. परीक्षेच्या वेळापत्रकानुसार परीक्षार्थ्यांना ‘उदयोन्मुख भारतीय समाजातील शिक्षक’ या विषयाची प्रश्नपत्रिका सोडवायची होती. विद्यार्थ्यांच्या हाती जेव्हा प्रश्नपत्रिका पडली, तेव्हा विषयाचा कोड १५८१ असा व्यवस्थित होता. मात्र, प्रश्नपत्रिकेतील प्रश्न मात्र ‘शैक्षणिक मानसशास्त्र’ या विषयाचे असल्याचे परीक्षार्थी आणि परीक्षकांच्या लक्षात आले. अमरावती विद्यापीठ परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्य़ांमध्ये बी.एड.च्या परीक्षेसाठी ३२ परीक्षा केंद्रे आहेत. या परीक्षेत सुमारे ५ हजार ४६ विद्यार्थी सहभागी झाले होते. एखाद्या परीक्षा केंद्रावर हा घोळ झाला असावा, असे सुरुवातीला काही परीक्षकांना वाटले, पण संपर्कातून सर्वच परीक्षा केंद्रांवर चुकीच्या प्रश्नपत्रिका पोहोचल्याचे नंतर लक्षात आले. ज्या विषयाची प्रश्नपत्रिका परीक्षार्थ्यांच्या हाती पडली, त्या ‘शैक्षणिक मानसशास्त्र’ या विषयाची परीक्षा येत्या २३ एप्रिलला होणार आहे.  
 ‘उदयोन्मुख भारतीय समाजातील शिक्षक’ या विषयाऐवजी ही प्रश्नपत्रिका समोर आल्याने विद्यार्थी गोंधळून गेले. आताच्या क्षणी उत्तरपत्रिका सोडवली जाऊच शकत नसल्याने परीक्षा रद्द करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. अखेर ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला. मात्र, आजची परीक्षा कोणत्या तारखेला होणार आहे, यावर तातडीने निर्णय होऊ शकला नाही. या संदर्भात प्र-कुलगुरूंनी सायंकाळी बैठक बोलावली. अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशीम या पाच जिल्ह्य़ांतील ३२ परीक्षा केंद्रांवर हा प्रकार घडला. प्रश्नपत्रिकेवर ‘उदयोन्मुख भारतीय समाजातील शिक्षक’ या विषयाचा कोड नमूद असतानाही खाली मात्र ‘शैक्षणिक मानसशास्त्र’ या विषयाचे प्रश्न असणे ही मुद्रणातील चूक असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या प्रकाराने विद्यापीठातील परीक्षा संचालनातील घोळ पुन्हा समोर आला आहे.