मुदत संपली तरी उत्तीर्ण न झाल्यामुळे शैक्षणिक नुकसान होत असलेल्या हजारो एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्याचा निर्णय विद्यापीठाच्या विद्वत परिषदेच्या सभेत घेण्यात आला आहे. यामुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी मिळावी यासाठी काही विद्यार्थ्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. तर काही विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. या विद्यार्थ्यांबाबत सकारात्मक निर्णय घेऊन त्यांना चालू शैक्षणिक वर्षांत प्रवेश घेण्याची संधी देण्यात आली आहे.
या विद्यार्थ्यांनी उर्वरित कालावधीत सातव्या आणि आठव्या सत्राचा अभ्यास पूर्ण करून परीक्षा द्याव्यात असेही विद्वत परिषदेने नमूद केले आहे. या विद्यार्थ्यांना २००७मधील सुधारित पद्धत किंवा २०१२मधील सुधारित पद्धत निवडण्याचा पर्याय खुला राहणार आहे.