मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्षांच्या एमएचआरएम विषयाच्या पेपर फुटीप्रकरणी जुनी प्रश्नपत्रिका दिल्या गेलेल्या दोन महाविद्यालयांच्या चौकशीचा अहवाल विद्यापीठात सादर करण्यात आला असून त्यावर चर्चा करण्यासाठी मंगळवारी तातडीची परीक्षा मंडळीची बैठक झाली. यामध्ये या दोन्ही परीक्षा केंद्रावर बसलेल्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेऊ नये, या समितीच्या शिफारशीस बठकीमध्ये मान्यता देण्यात आली.
४ एप्रिल रोजी तृतीय वर्षांचा एमएचआरएम या विषयाचा पेपर फुटला होता. पेपप फुटल्याचे विद्यापीठाला परीक्षा सुरू व्हायच्या पाऊण तास आधी कळल्यामुळे विद्यापीठाने आयत्यावेळी प्रश्नपत्रिका संच बदलला. मात्र अंधेरी आणि विक्रोळी येथील दोन महाविद्यालयांनी जुनीच प्रश्नपत्रिका दिली होती. या दोन महाविद्यालयांमध्ये असे का घडले याची कारणे शोधण्यासाठी विद्यापीठाने सोमय्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय जोशी आणि प्राचार्य डॉ. उषा मुकुंदन यांची समिती स्थापन केली होती. या समितीने अहवाल सादर करून शिफारशी केल्या आहेत.
समितीने विद्यापीठाच्या कॉल-लॉगशीटचा संदर्भ घेतला असता, विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून वेळेत या दोन्ही परीक्षा केंद्रावर वारंवार भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केल्याचे आढळून आले. मात्र या दोन्ही परीक्षा केंद्रांवरील केंद्रप्रमुख आणि आयटी समन्वयकांच्या ही बाब लक्षात आली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना आधीचीच प्रश्नपत्रिका दिल्याचे उघड झाले. त्याचप्रमाणे या पेपरफुटीची व्याप्ती मर्यादित असल्याने व परीक्षामंडळाने तीन संचामधून दोन संच वितरीत केल्यामुळे या परीक्षा केंद्रांवरील विद्यार्थ्यांचे हीत लक्षात घेऊन पुनर्परीक्षा घेऊ नये, अशी शिफारस करण्यात आली व ती परीक्षा मंडळाने मान्य केली.