आयआयटी मुंबईतील टेकफेस्ट हा तमाम अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी जिव्हाळय़ाचा विषय मानला जातो. सन २०१४चे टेकफेस्ट संपत नाही तोच पुढील वर्षांच्या तयारीला सुरुवात झाली असून जानेवारी २०१५चा टेकफेस्ट यशस्वी करण्यासाठी एक पूर्ण फेस्टचा समन्वयक आणि २२ व्यवस्थापक असा २३ जणांचा संघ सज्ज झाला आहे. या विद्यार्थ्यांनी यंदा प्रत्येक महाविद्यालयात टेकफेस्टचा एक समन्वयक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार त्यांनी महाविद्यालयील विद्यार्थ्यांना आवाहन करण्यास सुरुवात केली आहे.
तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधन आणि विद्यार्थ्यांची कलाकुसर इतकेच नव्हेतर जगभरातील मान्यवरांची व्याख्याने असे तब्बल १५० हून अधिक स्पर्धा आणि कार्यक्रमांची रेलचेल दर वर्षी जानेवारीच्या पहिल्या वीकेंडला असते. दरवर्षी काहीतरी नवीन घेऊन टेकफेस्ट येत असते. सन २०१५मध्ये होणाऱ्या टेकफेस्टमध्ये अधिकाधिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सक्रीय सहभाग घेता यावा यासाठी महाविद्यालयीन समन्वयक नेमण्यात येणार आहेत. या समन्वयकाने त्याच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना वेळोवेळी टेकफेस्ट संदर्भात माहिती पुरवावी व त्यांच्या महाविद्यालयातील जास्तीत जास्त मुलांना जात कसे सहभागी करून घेता येईल या दृष्टीनेही प्रयत्न करणे आवश्यक असणार आहे. समन्वयक निवडीची प्रक्रिया खुली असून यासाठी कुणीही विद्यार्थी http://techfest.org/clgnom.html या संकेत स्थळाला भेट देऊन तेथे आपली नाव नोंदणी करू शकतो.