साधारण १९७०च्या आसपास एका समाजाचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तीने इचलकरंजी येथील लालनगर, नेहरूनगर, जाधव मळा या भागाला भेट दिली. या भागातील परिस्थिती, लोकव्यवहार, राहणीमान याचे अवलोकन केले आणि त्याचा अहवाल तयार केला. ‘या भागातील लोकांचे भविष्य धोकादायक असून काही वर्षांनी परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे,’ असा शेरा त्यांनी त्या अहवालात दिला. याच दरम्यान १९७० मध्ये पू. साने गुरुजींच्या विचारांचा वसा घेतलेल्या धडपडणाऱ्या मुलांनी या भागातील कामगार व तळागाळातील मुलांसाठी ‘आंतर भारती विद्यालय’ सुरू केले आणि चिरंतन शिक्षण देण्याचा विचार प्रत्यक्षात अमलात आणला आणि आज या शाळेमुळे या परिसराचा आमूलाग्र बदल झाला आहे.
शाळेची स्थापना झाली त्या वेळी इमारत नव्हती. काही घरातील खोल्या भाडय़ाने घेऊन वर्ग भरवले जात. विद्यार्थ्यांना घडवणं, सुजाण नागरिक घडवणं अशा ध्येयानं सारेच झपाटलेले असल्याने समाजातून चांगला प्रतिसाद मिळत गेला आणि आज ५ वी ते १०वीच्या २३ तुकडय़ांनी युक्त अशी सुसज्ज शाळा विद्यादानाचं पवित्र कार्य अत्यंत उत्साहात करत आहे.
आमच्या आंतर भारती विद्यालयात अनेक उपक्रम घेतले जातात. चित्रावरून वर्णन हा भाग घेताना विद्यार्थ्यांनी काढलेली चित्रं भिंतीवर लावली जातात, त्याबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी वर्णन लिहिलेलं असेल ते तिथं लावलं जातं. उपक्रम कट्टा तयार करून विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या साहित्याचं प्रदर्शन मांडलं जात. कवितेचा, पाठाचा आशय लक्षात घेऊन त्यावर आधारित नाटय़ बसवलं जातं. पत्रलेखन फक्त वहीतच न राहता प्रत्यक्षात थोरामोठय़ांना पत्र लिहिलं जात.
जयंत नारळीकर, मंगेश पाडगांवकर, सोनाली नवांगुळ अशा मान्यवरांनी आमच्या विद्यार्थ्यांना उत्तर लिहिलं आहे. मुलाखत हा भाग घेताना समाजातील कला, साहित्य, सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना बोलावून त्यांची प्रगट मुलाखत घेतली जाते. वृत्तलेखनासाठी स्थानिक बातमीदारांना बोलाविले जाते. हिंदी संस्कृत भाषा शिकवताना वरील प्रकारे त्यात विविधता आणली जाते.
इंग्रजी ही भाषा मुलांमध्ये रुजावी यासाठी अभ्यासक्रमाशी अनुरूप विविध चित्रं तयार करून घेतली जातात. ओरिगामीच्या माध्यमातून पक्ष्यांची ओळख करून दिली जाते. साऱ्याच भाषांच्या कविता प्रत्येक वर्गात उत्तम प्रकारे गायिल्या जातात.
आंतरराष्ट्रीय गणित वर्षांच्या निमित्तानं गणितातल्या गमतीजमती, मजेदार कोडी काचफलकात मुलांसाठी लावल्या. पाढे, पाठांतराच्या स्पर्धा, त्या त्या तारखेला तो पाढा म्हणायचा म्हणजे १५ तारखेला १५चा पाढा यामुळे पाढे पाठांतरात गंमत आली. वर्तुळे, त्रिकोण असे विविध भौमितिक आकार समजावेत म्हणून त्या आकाराचे कार्डशीट तयार करून वर्गात भिंतीवर लावले जातात.
विज्ञानाविषयी मुलांच्या मनात नेहमीच कुतूहल जागृत असतं. त्याला खतपाणी घालण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रयोगाचे साहित्य हाताळू दिलं जातं. विज्ञानातल्या आकृत्यांसाठी एक वेगळा प्रयोग केला गेला. रांगोळी काढायला, बघायला साऱ्यांनाच आवडतं. तेव्हा रांगोळीतून विज्ञानातल्या आकृत्या, रेणुसूत्रे, संकल्पना काढून त्यात रंग भरले जातात व नावे दिली जातात. जूनमध्ये जे शुक्राचं अधिक्रमण झालं, ते अधिक्रमण विद्यार्थ्यांना तर दाखवलंच. त्याबरोबर अनेक पालकांनीही त्याचा आनंद घेतला. विज्ञान प्रदर्शन, विज्ञान प्रश्नमंजूषा यामध्ये मुलांचा उदंड सहभाग असतो.
इतिहासाची गोडी वाटावी यासाठी ऐतिहासिक कथा, क्रांतिकारकांची चरित्रे, ऐतिहासिक नाणी- शस्त्र यांचे प्रदर्शन अशा विविध माध्यमातून राष्ट्रभक्ती, स्वदेश निष्ठा रुजवली जाते. भूगोलाची गोडी वाढावी यासाठी एक खास भूगोल मंडळ स्थापन केलेलं आहे. विविध देशांचे ध्वज काढण्याच्या स्पर्धा घेतल्या गेल्या. भौगोलिक घटनांवर आधारित विविध मॉडेल्स तयार करून प्रत्येक वर्गात लावले गेले.
चित्रकला हा विषय तर मुलांचा अतिशय आवडता विषय.
शाळेच्या दर्शनी भागातल्या भिंतीवर साने गुरुजींचं भव्य चित्र रेखाटलेलं आहे. ‘श्यामची आई’ या पुस्तकातील चित्ररूप कथा, ज्ञान, विज्ञान, मनोरंजन, क्रीडा, सामाजिक जाणीव या साऱ्यांना अनुसरून बोलक्या भिंती अनमोल बोध देत असतात.
क्षेत्रभेट ही विद्यार्थ्यांची आवडती गोष्ट. आमच्या गावातले सुप्रसिद्ध आपटे वाचनमंदिर, बागा, प्रेस, राजवाडा, बेकरी, नर्सरी, ग्रंथ प्रदर्शन, एस.टी. स्टँड, पोस्ट ऑफिस, नाटय़गृह अशा विविध ठिकाणी विद्यार्थ्यांना घेऊन जाऊन तिथं प्रत्यक्ष कार्य कसं चालतं याची माहिती दिली जाते.
गावाच्या आसपास पाणथळ जागी जेव्हा स्थलांतरित पक्षी येतात, त्या पक्ष्यांची ओळख व्हावी यासाठी तिथं विद्यार्थ्यांना घेऊन माहिती जाते. विविध वृक्षांच्या बिया गोळा करून त्याची रोपं तयार करून दरवर्षी गावातल्या विविध भागांत ती रोपं लावली जातात. गेल्या चार-पाच वर्षांत लावलेली झाडं आता झकास फुललेली आहेत. आकाश निरभ्र असताना दुर्बीण लावून ग्रह, तारे, तेजोमेघ दाखवून माहिती दिली जाते.
चिमण्यांची रोडावत चाललेली संख्या पाहून आमचे विद्यार्थी घरटी तयार करून दिशा व जागा लक्षात घेऊन योग्य ठिकाणी लावतात. अनेकांना घरटी कशी बनवायची याचं प्रात्यक्षिकही दाखवतात. विद्यार्थ्यांना आपल्या ‘राज्य- पुष्प-तामण (जारूल) या वृक्षाची ओळख व्हावी म्हणून क्रीडांगणात हा वृक्ष लावला आहे. तसेच सप्तपर्णी, कवितेतून भेटणारा कदंब, कचनार अशी स्वदेशी झाडंही लावलेली आहेत. प्रत्येक वर्गाची ग्रंथपेटी असून वेळ मिळेल त्याप्रमाणे मुलं वाचनाचा आनंद घेतात. आपले ऋतू, मराठी महिने, त्या ऋतूत उमलणारी फुलं, त्या ऋतूत येणारे सण आणि ऋतूला अनुसरून कविता असे सहा फलक अनुसरून कविता असे सहा फलक तयार करून लावले आहेत.
विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम पोषण आहाराबरोबर उत्तमोत्तम योगासने, योगासनातून मनोरे तयार करणे याकडे विशेष लक्ष दिले जाते.
दरवर्षी आकाशवाणीवर मुलांचा कार्यक्रम सादर केला जातो. मुलांनी स्वत: लिहिलेल्या साहित्यावर आधारित हा कार्यक्रम असतो. राज्याचे नाव, त्या राज्याची थोडक्यात माहिती लिहिलेले फलक प्रत्येक वर्गाच्या दारावर लावले आहेत. खऱ्या अर्थानं ‘आंतर भारतीची’ कल्पना रुजावी हा त्या मागचा हेतू. शाळेचा वार्षिक (बक्षीस) समारंभ अगदी थाटात होतो. यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कधी विद्यार्थ्यांचे आई-बाबा, कधी शिक्षकेतर कर्मचारी, शिपाईमामा, कधी माजी विद्यार्थी, कधी आजी-आजोबा यांच्या हस्ते पारितोषिक दिलं जातं. ही मंडळी जेव्हा व्यासपीठावर उपस्थित होतात, तेव्हा विद्यार्थ्यांचा टाळ्यांचा कडकडाट, त्यांच्या डोळ्यातला, चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय असतो. शाळेत नि:स्वार्थी वृत्तीनं काम करणारी सारीच मंडळी आहेत. त्यामुळे शाळेची प्रगती आपोआपच होत आहे.
– आंतर भारती विद्यालय
वेताळ पेठ, इचलकरंजी-४१६११५.
फोन नं.- २३०/२४३६१४३.