दहावीनंतर पुढे काय, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आता विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षकच मार्गदर्शन करणार असून समस्याग्रस्त विद्यार्थ्यांना मदत करण्याकरिता हेल्पलाइनही सुरू करणार आहेत.
‘राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान’ व उत्तर विभागाचे बृहन्मुंबई शिक्षण निरीक्षक यांच्या वतीने उत्तर विभागातील शिक्षकांना पाच दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. येत्या शैक्षणिक वर्षांपासून हे शिक्षक शालेय विद्यार्थ्यांना व्यवसाय मार्गदर्शन करणार आहेत.
एकूण विद्यार्थ्यांपैकी केवळ एक टक्काच विद्यार्थ्यांना व्यवसाय मार्गदर्शन मिळते. म्हणून शिक्षकांनाच याकरिता तयार करण्याची योजना आखण्यात आली, असे उत्तर विभागाचे शिक्षण निरीक्षक अनिल साबळे यांनी सांगितले. भांडुपमध्ये नुकत्याच पार पडलेल्या या प्रशिक्षणात यात पोद्दार, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, भारती विद्यापीठ यासह अनेक संस्था सहभागी झाल्या होत्या. सैन्य दलातील निवृत्त मेजर सुभाष गावंड, व्यवसाय मार्गदर्शक किरण जोग, जिल्हा क्रीडा अधिकारी कैलास लटके यासह पी. बी. शिंदे, काझी जियौद्दिन, रवींद्र खानविलकर, नानासाहेब पुंदे यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. उत्तर विभागाचे कार्यक्रम अधिकारी गजेंद्र बनसोडे व चेंबूरमधील स्वामी मुक्तानंद हायस्कूलचे शिक्षक अनिल बोरनारे यांनी केले.