बारावीच्या वाणिज्य शाखेच्या ‘बुक किपिंग अ‍ॅण्ड अकाऊंटन्सी’ या विषयाची प्रश्नपत्रिका सकाळी परीक्षा सुरू होण्याआधीच मुंबईमध्ये ‘व्हॉट्सअप’च्या माध्यमातून फिरू लागल्याचे स्पष्ट झाल्याने ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’ने आता या दृष्टीने तपासाला सुरूवात केली आहे. मंडळाने या संदर्भात बेलापूर सायबर सेल आणि वाशी पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे.
सोमवारी ‘बुक कीपिंग अ‍ॅण्ड अकाऊंटन्सी’ या विषयाची परीक्षा झाली. मात्र, सकाळी ११ वाजता परीक्षा सुरू होण्याआधीच म्हणजे १०.२० च्या सुमारासच या विषयाची प्रश्नपत्रिका व्हॉट्सअपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये फिरत होती, अशी तक्रार मुंबई विभागीय मंडळाकडे आली. सुरवातीला मंडळाने पेपरफुटीची शक्यता फेटाळून लावत या संदर्भात गुन्हा दाखल करण्यास नकार दिला होता. परीक्षा ११ वाजता सुरू झाल्यानंतर तब्बल तासाभराने प्रश्नपत्रिका व्हॉट्सअपवरून फिरू लागल्याचा मंडळाचा दावा होता. त्यामुळे, या संदर्भात मंडळाने तक्रार दाखल केली नव्हती.
परंतु, आता हा पेपर परीक्षा सुरू होण्याच्या आधीच ‘व्हॉट्सअप’वर आल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे, मंडळाने या संबंधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
फेरपरीक्षेबाबतच्या शक्यतेबाबतही काही बोलण्यास मंडळाच्या अधिकाऱ्यांनी नकार दिला. पेपर फुटल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस तपास करीत आहेत. पेपर कुणी, कधी आणि कसा व्हॉट्सअपवर आणला हे समोर आल्यानंतर पेपर फुटला आहे की नाही किंवा त्याची व्याप्ती स्पष्ट होईल. त्यानंतर फेरपरीक्षेबाबत निर्णय घेऊ, असे विभागीय मंडळाचे सचिव सि. य. चांदेकर यांनी सांगितले.गुरुजींनीच फोडला बीजगणिताचा पेपर!
औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्य़ातील कन्नड शहरात न्यू हायस्कूल येथील दहावीच्या परीक्षा केंद्रावर शिक्षकांनीच बीजगणिताचा पेपर फोडल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. तीन शिक्षकांसह प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना वितरित होण्यापूर्वीच उत्तरे सोडवत असल्याचे पोलीस व भरारी पथकाच्या छाप्यात समोर आले. सकाळी १० वाजून ४० मिनिटांनी ही कारवाई करण्यात आली.
या केंद्रावर ३५ पाकिटातून बीजगणिताच्या प्रश्नपत्रिका पुरविण्यात आल्या होत्या. १२ पाकिटे मराठी प्रश्नपत्रिकेची होती. तेवढीच इंग्रजी व ११ पाकिटे उर्दू भाषेतील प्रश्नपत्रिकेची होती. विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वितरित करण्यापूर्वी पर्यवेक्षकांच्या हाती देताना एक प्रश्नपत्रिका या वितरणातून पळविण्यात आली आणि शाळेच्या मुख्याध्यापकाच्या कक्षात ३ शिक्षक व १ तंत्रज्ञ ती प्रश्नपत्रिका सोडवीत होते. तेव्हा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह भरारी पथकाने छापा टाकला.
मुंबईत वाणिज्य शाखेचा पेपर परीक्षा सुरू होण्याआधी व्हॉट्सअपवर उपलब्ध झाल्याची चर्चा..औरंगाबादमध्ये बीजगणिताच्या पेपरफुटीची बातमी.. लातूरमध्ये डमी विद्यार्थी पकडले गेल्याची घटना.. या बातम्यांनी ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’च्या दहावी-बारावी परीक्षांच्या विश्वासार्हतेवर कधीनव्हे ती इतकी प्रश्नचिन्हे उमटवली आहेत. त्यातच रसायनशास्त्र आणि गणित या विषयांच्या प्रश्नपत्रिकांमधील चुकांमुळे मंडळाचा गोंधळी कारभारही चव्हाटय़ावर आला आहे. लातूर, औरंगाबाद, मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्येही वाढलेल्या कॉपीच्या घटनांमुळे ‘कॉपीमुक्त अभियाना’चा तर पार बोऱ्या वाजल्याचे दिसून येत आहे.

मुंबईमध्ये बुक कीपिंग आणि अकाऊन्टन्सीच्या प्रश्नपत्रिका फुटल्याची चर्चा सोमवारी होती. मात्र, प्रश्नपत्रिका व्हॉट्सअ‍ॅपवर ११ वाजून २६ मिनिटांनी मिळाल्याची माहिती आहे. प्रश्नपत्रिका फुटली नसल्याचा अहवाल विभागीय मंडळाने दिला होता. परंतु, या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. औरंगाबाद विभागातील कन्नड भाषेतील दहावीची बीजगणिताची प्रश्नपत्रिका फुटल्याची चर्चा आहे. त्याबाबत राज्यमंडळाला अजूनही अहवाल मिळालेला नाही. परीक्षा पुन्हा घ्यायची की नाही याबाबतचा निर्णय अहवाल मिळाल्यावर घेण्यात येणार येईल.
– गंगाधर मम्हाणे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ