गुणवत्तापूर्ण शिक्षण, दूरशिक्षण आणि तुलनेने शुल्क कमी.. अशी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची (टिमवि) ख्याती होती. मात्र, अपात्र नियुक्त्या करून विद्यापीठाने गुणवत्तेशी तडजोड केलीच आहे; आता पुण्याबाहेरील केंद्राच्या मान्यताही रखडल्या आहेत.
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने अधिकार मंडळातील सदस्य, अधिष्ठाता या पदासाठी अनेक अपात्र उमेदवारांच्या नियुक्तया केल्या आहेतच. पदासाठी आवश्यक असलेल्या प्राथमिक शैक्षणिक बाबीही काही अधिष्ठाता पूर्ण करत नसल्याचे समोर येत आहे. त्याचप्रमाणे आता विद्यापीठाच्या बाहेरगावच्या केंद्रांबाबतही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. विद्यापीठाची मुंबई येथे बेलापूर, सोलापूर या ठिकाणी अभ्यास केंद्र आहेत. या केंद्रांमार्फत अनेक अभ्यासक्रम चालवले जातात. मात्र या केंद्रांना अद्यापही मान्यता नसल्याचे समोर येत आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाकडे विद्यापीठाने परवानगी मिळण्यासाठी अर्ज केला आहे. मात्र, जवळपास गेली दोन वर्षे हे अर्ज पडून आहेत. नियमानुसार केंद्राला मान्यता मिळाल्यानंतरच त्याच्या माध्यमातून अभ्यासक्रम चालवता येतात. अनेक केंद्रांना मान्यता मिळालेली नसतानाही या केंद्रांच्या माध्यमातून विद्यापीठाचे अभ्यासक्रम चालवण्यात येत आहेत. नियमानुसार या विद्यापीठाला त्यांच्याच आवारात विविध अभ्यासक्रम चालवण्यासाठी परवानगी आहे. बाहेरील केंद्राबरोबरच पुण्यातही असे अभ्यासक्रम विद्यापीठाच्या क्षेत्राबाहेर चालवण्यात येत आहेत. काही अभ्यासक्रम चालवण्यासाठी केंद्राच्या स्वायत्त संस्थांची परवानगी लागते. मात्र, विद्यापीठाला मिळालेल्या या परवानग्यांबाबतही शंका उपस्थित करण्यात येत आहेत.

नव्या जागांची खरेदी का?
बाहेरगावच्या केंद्रांसाठी  विद्यापीठाने अनेक ठिकाणी जमिनी घेऊन ठेवल्या आहेत. काही आप्तेष्टांकडून सुरू असणाऱ्या जमीन खरेदी-विक्रीच्या प्रकरणीही शंका उपस्थित करण्यात येत आहेत. मुळात आहे त्या केंद्रांच्या परवानगीचे घोंगडे भिजत असताना नव्या जागांची खरेदी का करण्यात येत आहे, असा प्रश्न विद्यापीठातील काही माजी अधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.