पालिका शाळा आणि खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षण सेवकांना सानुग्रह अनुदान देण्याचे आदेश महापौर स्नेहल आंबेकर यांनी गुरुवारी पालिका प्रशासनाला दिले. त्यामुळे दिवाळीत बोनसपासून वंचित राहणाऱ्या तब्बल १७०० शिक्षण सेवकांना सानुग्रह अनुदान मिळणार आहे. पालिका प्रशासनाकडून दरवर्षी दिवाळीनिमित्त पालिका कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी आणि आरोग्य स्वयंसेविकांना बोनस दिला जातो. मात्र शिक्षण सेवकांना बोनस मिळत नाही. त्यामुळे शिक्षण सेवकांना सानुग्रह अनुदान द्यावे, अशी मागणी शिक्षण समिती अध्यक्ष विनोद शेलार यांनी महापौरांकडे केली होती. पालिका शाळांतील शिक्षण सेवकांना चार हजार रुपये, तर खासगी शाळांतील शिक्षक सेवकांना दोन हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे आदेश आंबेकर यांनी प्रशासनाला दिले. त्याचबरोबर प्रमुख कामगार अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील कल्याण विभागातील अंखसालीन कर्मचाऱ्यांनाही दोन हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे आदेश महापौरांनी यावेळी दिले.