वादग्रस्त शासन निर्णयामुळे आत्महत्या केलेल्या शिक्षकाच्या मृत्यूसाठी जबाबदार असणाऱ्या विनोद तावडे यांच्याकडील शिक्षण खाते काढून घ्या, नाहीतर शिक्षणाचे वाटोळे झाल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका करत कपिल पाटील यांनी सभागृहात आक्रमक पवित्रा घेतला.
शिक्षकांवरील शासन निर्णयासंदर्भात विधान परिषदेत आज नियम ९७ अन्वये अल्पकालीन चर्चा झाली. यावेळी कपिल पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित केला. वादग्रस्त शासन निर्णय स्थगित करावा अशी मागणी शिक्षकांकडून होत असतानाही शिक्षणमंत्र्यांनी स्थगिती नाकारली. त्यामुळे सय्यद रमीझोद्दीन याने सतत दोन वष्रे उच्च न्यायालयात हा मुद्दा रेटून धरला. त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने रमीझोद्दीन यांनी आत्महत्या केली. तत्पूर्वी लिहिलेल्या पत्रात त्याने आत्महत्येसाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि शिक्षण सचिव अश्विनी भिडे जबाबदार असल्याचे नमूद केले.  
या राज्याला कला शिक्षकाची गरज नाही का? असा प्रश्न कपिल पाटील यांनी यावेळी उपस्थित केला. कला व क्रीडा क्षेत्रातील सुमारे १७-१८ हजार शिक्षकसेवकांना आणि ३०-३४ हजार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरवून काढले. शिक्षणाचा दर्जा खालावत असताना विषयानुरूप शिक्षक न देता शिक्षणाचा खेळखंडोबा चालवण्यात आल्याची टीकाही त्यांनी केली. राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांनीही आतातरी शासनाने धोरणे बदलावी, अशी मागणी केली.