‘कोण मला वठणीवर आणतो ते पाहतो,’ असं काहीशा खोडकरपणे म्हणणाऱ्या उनाड वा व्रात्य मुलांसाठी ही शाळा आहे. विद्यार्थ्यांना व त्यांना अभ्यासात रस घ्यावा म्हणून ‘छडी लागे छम छम, विद्या येई घम घम,’ ही वेताच्या न मोडणाऱ्या काठीने चोप देण्याची गुरूची संकल्पना आजच्या जमान्यात कालबाह्य़ झाली आहे. कारण यामुळे मुलांतील कोडगेपणा छडीच्या प्रत्येक वळाबरोबर वाढतच जातो व शेवटी अभ्यासातील गोडीही संपते, म्हणूनच विद्यार्थ्यांच्या सर्वागीण प्रगतीचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून गुरुशिष्यातील गोड संवाद साधण्याचा प्रयत्न लोणावळ्यातील तुंगार्ली येथील ‘गुरुकुल’ शिक्षणसंस्थेच्या माध्यमातून होतो आहे.
ग. ल. चंदावरकर आणि वसुंधरा चंदावरकर यांनी ६ मार्च, १९४९ साली या शाळेची स्थापना केली. भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनी ‘विचारविनय सभे’कडे या शाळेचे चालकत्व सोपविण्यात आले. सुप्रसिद्ध उद्योगपती म. ल. ऊर्फ बाळासाहेब डहाणूकर हे संस्थेचे पहिले अध्यक्ष होत. ग. ल. चंदावरकर यांनी सुरुवातीची ३२ वर्षे संस्थेची प्रमुख कार्यवाह म्हणून, तर वसुंधराबाईंनी संचालिका म्हणून जबाबदारी सांभाळली. तेव्हापासून आजतागायत या सर्व समाजकार्याची धुरा या संस्थेचे संचालक दीपक गांगोळी आपल्या अविश्रांत परिश्रमातून सांभाळत आहेत.
हल्ली पालकांना आपल्या नोकरी-व्यवसायामुळे मुलांकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही, त्यामुळे मुलांचे, पालकांचे नाते बिघडते. ती काही वेळेस पालकांच्या शब्दाबाहेर जातात किंवा त्यांच्या प्रेमाला पारखी झाल्याने कदाचित काही वेळेला चुकीच्या मार्गाने जातात व वाईट लोकांच्या संगतीने अभ्यासापासून व शिक्षणापासून दूर भरकटत जातात. याउलट कधी-कधी पालक वा पाल्यांत गोड सुसंवाद असूनही नोकरी-व्यवसायाच्या किंवा तत्सम इतर कारणांमुळे मुलांच्या शिक्षणात खंड पडू लागतो. तेव्हा पालकांना पाल्याच्या स्थिर भवितव्याच्या दृष्टिकोनातून गुरुकुलासारख्या शाळेची संस्कारक्षम घरकुलांप्रमाणे गरज भासू लागते.
लोणावळ्याच्या गुरुकुल संस्थेत गुरुजन व विद्यार्थी एकत्र राहतात. त्यामुळे विद्यार्थी आपल्या घरापासून दूर असूनही त्यांना शाळा घरासारखी वाटते. शिक्षकांकडून मिळणाऱ्या मायेच्या पाखरीमुळे गुरुकुल हे अशा मुलांसाठी कुटुंबच असते.
गुरुकुलमधील गुरुशिष्यांचे नाते व सुसंवाद हा पुस्तकी नियमावर आधारित नसून वर्षांनुवर्षे, परंपरेने चालत आलेल्या मायेच्या नात्यावर आहे. विद्यार्थ्यांच्या मनाची जडणघडण करणे हेच मुख्य उद्दिष्ट सर्वागीण शैक्षणिक प्रगतीसोबत साधले जाते. या संस्थेत वयाचे बंधन नाही. तीन-चार वर्षांपासून मोठय़ा वयाच्या कोणत्याही जाती-धर्माच्या मुलांना प्रवेश दिला जातो. शाळेच्या वसतिगृहात शहरी व ग्रामीण तसेच आदिवासी भागातील विद्यार्थी एकत्र राहतात. शिक्षण हक्क कायदा येण्याआधीपासूनच शाळेच्या ३० टक्के जागा कमी उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांमधून भरल्या जात आहेत. शाळेतील निवडक उपक्रमांचा हा आढावा.
आयएसओ प्रमाणपत्र – संस्थेच्या मराठी, इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. संगणक, सुसज्ज ग्रंथालय, प्रयोगशाळा यांची चांगली सोय असल्याने शाळेला आयएसओ ९००१:२००० हे आंतरराष्ट्रीय गुणवत्तेचे प्रमाणपत्र मिळाले आहे. असे प्रमाणपत्र मिळविणारी ही पहिली मराठी शाळा. त्यामुळे विकसनशील देशातील शिक्षणतज्ज्ञांच्या भेटीची वेळ आली की या शाळेची निवड केली जाते. मॉरिशस, व्हिएतनाम, युगांडा, केनया, झांबिया, नेपाळ आदी देशांच्या प्रतिनिधींनी आतापर्यंत शाळेला भेट देऊन तेथील उपक्रमांची माहिती करून घेतली आहे. पश्चिम भारत विज्ञान प्रदर्शनात शिक्षक-विद्यार्थी गटात या शाळेने पहिले पारितोषिक पटकावले आहे. याशिवाय मूल्यशिक्षण, पर्यावरण अभ्यास, संगणक प्रशिक्षण इत्यादी विषय सरकारने अभ्यासक्रमात आणण्याआधी कितीतरी आधी शाळेत शिकविले जात आहेत.
इंग्रजी संभाषण – जून, २००२ साली संस्थेने इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली. विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास व इंग्रजी बोलण्याचे कौशल्य विकसित करण्यासाठी इंग्रजी संभाषण वर्ग सुरू झाले. हे वर्ग लंडनमधील पेस्टॉलॉजी इंटरनॅशनल स्कूलतर्फे आलेल्या केट बोर्ग, बेल्जिअमच्या डी. बोर्शग्रेट आदी परदेशी तज्ज्ञांनीही चालविले आहेत. इंग्रजी संभाषणासाठी लवकरच लिंग्वा फोन लॅब सुरू होणार आहे.
छात्र सेना – राष्ट्रीय छात्र सेनेचा ज्युनिअर विभाग मजबूत करण्यात आला आहे. इयत्ता आठवी-नववीचे विद्यार्थी यात सहभागी होतात. ३० वर्षांत अनेक कॅडेट्स राष्ट्रीय नेतृत्व, विकास शिबिरे, राष्ट्रीय साहस शिबिरे, राष्ट्रीय एकात्मता शिबिरे आदींसाठी निवडले गेले आहेत. गुरुकुलचे अनेक कॅडेट्सची प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील संचलनासाठी निवड झाली आहे. शाळेत वीरबाला, बालवीर ही पथकेही आहेत. पर्यवेक्षित अभ्यास योजनेत एका शिक्षकाकडे १५ ते २० विद्यार्थ्यांची जबाबदारी दिली जाते.
ज्ञानसाधना व्याख्याने – वर्षभर विविध विषयांवर तज्ज्ञांची व्याख्याने ठेवली जातात.
वार्ताफलक व सर्वसामान्य ज्ञान – शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ रोजच्या महत्त्वाच्या बातम्या लिहिल्या जातात. त्यासंबंधात एक चाचणी वर्षअखेरीला ठेवली जाते.
संचयिका – शाळेच्या विद्यार्थ्यांनी बचतीची सवय जोपासावी यासाठी शाळेत संचयिका आहे. पोस्टात रिकरिंग डिपॉझिट्स खाती सुरू करण्यात आली आहे.
पर्यावरण जाणीव – या उपक्रमांतर्गत शाळेच्या परिसरात दरवर्षी सुमारे १०० रोपटी लावली जातात. या रोपांचे संगोपन, संरक्षणाची जबाबदारी विद्यार्थी हौसेने पार पाडतात. लोणावळ्यातील तलाव परिसरातील वृक्षारोपणात सहभाग घेऊन ५०० ते १००० रोपे लावतात. २००४-०५मध्ये पुण्यातील एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने दहा हजारांहून रोपे तुंगार्ली आणि लोणावळा धरणाच्या परिसरात लावली आहेत. या उपक्रमांसाठी ५० विद्यार्थ्यांचा गट तयार करण्यात येतो. विद्यार्थ्यांमध्ये परिसर संरक्षण, निसर्ग निरीक्षण यासाठी अभ्यासवर्ग तयार केले जातात. त्यासाठी भ्रमण मंडळ तयार केले जाते. विद्यार्थ्यांनी औषधी वनस्पतींची रोपटी एकत्र करून शाळेत त्याची रोपवाटिका तयार केली आहे.
संस्कारांची रुजवण – दिवाळीच्या वेळेस विद्यार्थी आपल्या पॉकेटमनीमधून बचत करून अनाथ आश्रमशाळेतील मुलांना किंवा जवळच्या आदिवासी मुलांना भेटवस्तू देतात. त्यांच्याबरोबर खेळून दिवाळीचा आनंद द्विगुणित करतात.
साक्षरता प्रसार – निरक्षरता निर्मूलनासाठी शाळेने एक प्रकल्प सुरू केला आहे. ४०  विद्यार्थ्यांच्या एका तुकडीस साक्षरता प्रसाराचे प्रशिक्षण दिले जाते. हे विद्यार्थी जवळच्या खेडय़ात जाऊन निरक्षर व्यक्ती किती आहेत याचे सर्वेक्षण करतात. त्यांची यादी तयार करतात व प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन एक विद्यार्थी एक किंवा दोन निरक्षरास साक्षरतेचा धडा देतो.
सवरेदय निधी – शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्या सत्रात तीन महिने सवरेदय पेटी प्रत्येक वर्गात आठवडय़ात एकदा नेली जाते. विद्यार्थी, शिक्षक या पेटीत दान टाकतात. हा सर्व निधी गरीब व गरजू विद्यार्थ्यांना पुस्तक खरेदी, रेनकोट व इतके शैक्षणिक वस्तूंच्या खरेदीसाठी मदत म्हणून दिला जातो.
छंदवर्ग – गुरुकुलमध्ये चित्रकला, सिरॅमिक पेंटिंग, संगीत, योग, तायक्वांदो असे छंदवर्ग आहेत. दोन वर्षांनी विज्ञान, इतिहास, भूगोल आदी विषयांवर प्रकल्पांचे प्रदर्शन भरविले जाते. शाळेची सुसज्ज व्यायामशाळा आहे. येथे विविध खेळ घेतले जातात. अ‍ॅथलेटिक्स, टेबलटेनिस, व्हॉलीबॉल इत्यादी अनेक खेळांना प्राधान्य दिले जाते.
या उपक्रमांमुळे गुरुकुलच्या ६१ वर्षांच्या इतिहासात अनेक तालुका, जिल्हा, राज्यस्तरीय क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक स्पर्धामध्ये शाळेने अनेक बक्षिसे पटकावली. चंदावरकर द्वयींनी लावलेले हे रोपटे वटवृक्ष बनून डोलत आहे. अभ्यासाविना इथेतिथे भरकटणाऱ्या मुलांना मायेची पखरण करत, शैक्षणिक गोडी लावत, शिक्षण व चांगल्या संस्कारांचे पसायदान करते आहे.
संपर्क – २४४४८२८०