देशभरातील सर्व बोर्डाचे बारावीचे आणि प्रवेश परीक्षांचे निकाल या वर्षीपासून ५ जूनपूर्वी जाहीर करण्यात यावेत अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या असल्या, तरी प्रत्यक्षात या वर्षी सर्व बोर्डाचे निकाल पाच जूनपूर्वी जाहीर होणे कठीण असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
या वर्षीपासून देशभरात वैद्यकीय आणि आभियांत्रिकी प्रवेशासाठी एकच प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी बारावीच्या गुणांनाही महत्त्व देण्यात येणार आहे. मात्र, देशामध्ये विविध बोर्ड बारावीची परीक्षा घेतात. प्रत्येक बोर्डाचे परीक्षेचे आणि निकालाचे वेळापत्रक वेगळे आहे, त्यामुळे अभियांत्रिकीची किंवा वैद्यकीय शाखेची प्रवेश प्रक्रिया राबवण्यापूर्वी देशातील सर्व बोर्डाचे आणि प्रवेश परीक्षांचे निकाल जाहीर करण्याचा सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या होत्या.
पुनर्मूल्यांकनाचे निकालही ५ जूनपूर्वी लावण्यात यावेत अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या असून या सूचनेनुसार कार्यवाही करण्याच्या दृष्टीने मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे देशातील सर्व बोर्डाच्या अध्यक्षांची बैठक घेण्यात आली.
सर्व बोर्डाचे बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवेश प्रक्रिया राबवण्यामध्ये अडचणी येणार आहेत. त्याचप्रमाणे बारावीच्या गुणांनाही महत्त्व देण्यात येणार असल्यामुळे पुनर्मूल्यांकनाचे निकालही जाहीर झाल्याशिवाय विद्यार्थ्यांना त्यांच्या नेमक्या क्रमवारीचा अंदाज येणार नाही. यामुळे प्रवेश प्रक्रियेमध्येही अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
निकाल जाहीर झाल्यानंतर साधारणपणे १० दिवसांमध्ये पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज मागवण्यात येतात. त्यानंतर पुनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर करण्यासाठी किमान एक महिन्याचा कालावधी लागतो. त्याचप्रमाणे या वर्षी सर्वच बोर्डाच्या परीक्षांचे आणि निकालाचे वेळापत्रक पूर्वीपासून तयार झाले आहे.
या सर्व बाबींचा विचार करता या वर्षी पाच जून पूर्वी सर्व परीक्षांचे निकाल जाहीर होणे कठीण असल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबत केंद्र सरकारच्या वतीने एक प्रस्ताव तयार करून तो सर्वोच्च न्यायालयाकडे विचारार्थ पाठवण्यात येणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.