मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या फीची प्रतिपूर्ती शासनाकडून करण्यात येत असल्यामुळे महाविद्यालयांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्क घेऊ नये, असे समाजकल्याण खात्याचे स्पष्ट आदेश असतानाही विलेपार्ले येथील साठय़े महाविद्यालयाने मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून फी घेतल्याने महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. कविता रेगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी समाजकल्याण विभागाच्या साहाय्यक आयुक्तांनी तसेच मनविसेने विलेपार्ले पोलीस ठाण्यात केली आहे. मात्र आपण समाजकल्याण खात्याच्या आदेशाविरोधात कोणतीही गोष्ट केली नसल्याचे प्राचार्य डॉ. रेगे यांनी सांगितले.
गेली दोन वर्षे साठय़े महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून सामान्य विद्यार्थ्यांकडून प्रवेशासाठी घेण्यात येणारे शुल्क आकारण्यात येत असल्याची तक्रार आहे. मनविसेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांवरील अन्याय सहन करणार नाही, असे सांगत प्राचार्य रेगे यांच्यावर गुन्हा दाखल न झाल्यास मनविसे आंदोलन करील, असा इशारा दिला आहे. समाजकल्याण विभागाच्या साहाय्यक आयुक्तांनी त्यांच्याकडे आलेल्या तक्रारीनुसार महाविद्यालयाला १७ सप्टेंबर २०१४ मध्ये भेट दिली असता तक्रारीत तथ्य असल्याचे त्यांना आढळून आले. या प्रकरणी महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने समिती स्थापून प्राचार्यावर कारवाई करावी, असे आदेशही साहाय्यक आयुक्तांनी दिले असून डॉ. रेगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी विलेपार्ले पोलीस ठाण्याला पत्रही देण्यात आले आहे.
या प्रकरणी प्राचार्य डॉ. रेगे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, समाजकल्याण खात्याच्या परिपत्रकाचे तसेच आदेशाचे महाविद्यालयाने कोणतेही उल्लंघन केलेले नाही. ज्या विद्यार्थ्यांनी मागासवर्गीय असल्याबाबतचे प्रमाणपत्र अथवा आवश्यक कागदपत्रे सादर केली नाहीत, अशाच विद्यार्थ्यांकडून समाजकल्याण खात्याच्याच धोरणानुसार सामान्य विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे फी आकारण्यात येते तसेच प्रवेश शुल्क आकारणी केली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला अथवा प्रमाणपत्र सादर केले नाही अशाच विद्यार्थ्यांकडून फी आकारण्यात आली आहे. याबाबतचे ऑडिटही करण्यात आले असून आपण काहीही चुकीचे केले नाही, असेही डॉ. कविता रेगे यांनी सांगितले.