अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार प्रत्येकासाठी मान्य करीत असताना मोबाईल आजची गरज आहे, हे सामान्य माणसानेच नव्हे, तर मानवाधिकारानेही मान्य केले आहे. मोबाईल केवळ संवादाची सोय नसून ती मूलभूत गरज बनली आहे, एवढे मोबाईलने सर्वाचेच जग व्यापले आहे. संगणक युग म्हणता म्हणता मोबाईलने कधी सामान्य माणसाचा हात काबीज केला, हे कळले देखील नाही, एवढे ते संपर्क साधण्याचे प्रभावी माध्यम बनले आहे.
पण जरा थांबा. हा मोबाईल तेव्हाच कामी पडतो जेव्हा त्याची बॅटरी चार्ज असते. बॅटरी डिस्चार्ज असल्यास मोबाईल निव्वळ शोभेची वस्तू आहे. ही शोभेची वस्तू चार्ज केली तरच उपयोगाची ठरते. ती चार्ज करण्यासाठी वीज हवी असते. मात्र, महाराष्ट्रात आजही ग्रामीण भागात भारनियमनाचा सामाना ग्रामीणांना करावा लागतो. शहरातील काही भागात वेळोवेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने मोबाईल चार्ज करणे अशक्य होऊन बसते. यावर कळमेश्वर तालुक्यातील खापरी उबगी येथील नुवा अभियांत्रिकी महाविद्यालयातील पवन चापके या विद्यार्थ्यांने लोकोपयोगी पडेल, अशी मोबाईल बॅटरी चार्जरची निर्मिती प्रा. उपेंद्र महात्मे यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे. केवळ हाताने फिरवून किंवा नॉब हाताच्या अंगठय़ाने फिरवून मोबाईल चार्ज होऊ शकतो. पवनने हे उपकरण बनवताना ते सामान्य माणसाला परवडेल, अशा कमी किमतीत बनवले आहे. एका हातात उपकरण सहज मावणारे असून ते चांगले मजबूत आहे. त्याद्वारे पूर्णपणे डिस्चार्ज झालेल्या मोबाईल बॅटरी पाच ते दहा मिनिटे बोलण्याइतपत चार्ज करता येते. म्हणजे, गंतव्य स्थळी पोहोचेपर्यंत मोबाईल कामी पडतो. याकरता एक ते दोन मिनिटे या उपकरणास हाताने फिरवावे लागते.
ग्रामीण भागातील नागरिकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, लांब गावी जाणाऱ्या प्रवाशांकरता, तसेच दुर्गम भागात सीमेवर असणाऱ्या सैनिकांकरता हे उपकरण अत्यंत उपयुक्त ठरू शकते, असे पवन म्हणाला. या उपकरणाची निर्मिती करणारा पवन चापके नुवा अभियांत्रिकी महाविद्यालयात शेवटच्या वर्षांला शिकणारा विद्यार्थी आहे. त्याची घरची परिस्थिती सामान्य आहे. भौतिकशास्त्राचे प्राध्यापक डॉ. उपेंद्र महात्मे आणि पवन यांनी बॅटरी चार्जरची उपयोगिता लक्षात घेऊन तिचे उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या शोधात ते आहेत. नुवा अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. आनंद तिखे यांनी या नावीन्यपूर्ण उपलब्धतेविषयी मार्गदर्शक आणि विद्यार्थी या दोघांचेही अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सुयश चिंतिले आहे.