अतिरिक्त शिक्षकांच्या प्रश्न सकारात्मक पद्धतीने निकाली काढू असे आश्वासन देऊन नंतर घुमजाव करणाऱ्या राज्य सरकारच्या निषेधार्थ शनिवारी शिक्षक भारतीतर्फे राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. ४५ हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरवून त्यांचे पगार ऑफलाइन करण्याचे आदेश विनोद तावडेंनी दिल्याने शिक्षकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. राज्यभर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी शिक्षणाधिकारी कार्यालयांवर धडक देणार आहेत. या प्रश्नावर राज्यातील १५ शिक्षक संघटनांनी एकत्रित यावे, असे आवाहन शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे यांनी केले होते. या आवाहनाला सर्व संघटनांनी होकार दर्शविला असून या संघटनांची एकत्रित बैठक शनिवारी दुपारी होणार आहे. या बैठकीला शिक्षण हक्क कृती समितीचे अमोल ढमढेरे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.