वाशीच्या ‘फादर अॅग्नेल अभियांत्रिकी महाविद्यालया’ने गेल्या तीन वर्षांत व्यवस्थापन कोटय़ातून केलेल्या प्रवेशांची चौकशी तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत करण्यात येणार आहे. तसेच, या शैक्षणिक वर्षांमध्ये संस्थेने ‘अॅग्नेल चॅरिटीज’ या ट्रस्टच्या नावाने जमा केलेल्या देणग्यांच्या तपशिलांचीही चौकशी करण्यात येणार आहे.
संबंधित महाविद्यालयाने २०११-१२, २०१२-१३ आणि २०१३-१४ या वर्षांत व्यवस्थापन कोटय़ाचे प्रवेश गुणवत्ता डावलून व अवाच्या सव्वा देणग्या घेऊन केल्याचा आरोप ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने’चे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केला आहे. या संबंधात त्यांनी संचालनालयासह प्राप्तिकर विभाग, धर्मादाय आयुक्त आणि गृह विभागाकडेही तक्रार दाखल केली आहे. त्या अनुषंगाने संचालनालयाने सरकारी तंत्र निकेतनचे अधिव्याख्याता व्ही. पी. राठोड यांच्या अध्यक्षतेखाली तीन जणांची चौकशी समिती नेमली आहे.
संचालनालयाच्या नियमानुसार खासगी संस्थेला महाविद्यालयाच्या प्रवेश क्षमतेच्या २० टक्के जागा व्यवस्थापन कोटा म्हणून भरता येता. मात्र, या जागा भरताना गुणवत्तेनुसार भरल्या जाव्यात. तसेच, याकरिता कोणतीही नफेखोरी करू नये किंवा देणगी घेऊ नये, असा नियम आहे. परंतु, फादर अॅग्नेलने हे प्रवेश करताना तीन ते चार लाख रुपये याप्रमाणे देणग्या घेतल्या असल्याचा काळे यांचा आरोप आहे. या प्रमाणे वर्षांला अंदाजे १८ कोटी रुपये संस्थेने जमा केले असावते. त्यामुळे, गेल्या तीन वर्षांत संस्थेने प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांची यादी व ट्रस्टला मिळालेल्या देणग्यांच्या तपशिलाची चौकशी करावी. यात संस्था दोषी आढळल्यास व्यवस्थापनाविरोधात देणगी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी काळे यांनी संचालनालयाकडे केलेल्या तक्रारीत केली आहे.