नागपुरात जन्मलेला व सध्या अमरावतीकर असलेल्या गौरव राय याने भारतीय अभियांत्रिकी परीक्षेत स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतून देशभरातून अव्वल येण्याचा बहुमान मिळवला आहे. तब्बल ५० हजार विद्यार्थ्यांमधून त्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. गौरवने पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे, हे विशेष.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने भारतीय अभियांत्रिकी परीक्षा घेण्यात येते. दरवर्षी हजारो विद्यार्थी ही परीक्षा देतात. स्थापत्य, यंत्र अभियांत्रिकी, विद्युत व अणुविद्युत या शाखांमध्ये ही परीक्षा घेतली जाते. २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेत स्थापत्य अभियांत्रिकीच्या परीक्षेला देशभरातून ५० हजार विद्यार्थी  बसले होते. लेखी परीक्षेनंतर त्यापैकी १७१७ विद्यार्थी मुलाखती व व्यक्तिमत्व चाचणीकरिता निवडण्यात आले. या परीक्षेचा अंतिम निकाल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आला. यात गौरव रायने अव्वल क्रमांक प्राप्त केला आहे.
गौरवचे वडील रामप्रवेश राय हे सध्या अमरावतीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात स्थापत्य अभियांत्रिकीचे प्राध्यापक आहेत, तर त्याचा भाऊ सांगलीच्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत आहे. त्याच्या घरी शिक्षणाला पोषक वातावरण असून आई मंजू राय यांनीही गेल्या वर्षी हिंदी भाषेत आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. वडिलांच्या नोकरीमुळे गौरवचे महाराष्ट्रात विविध ठिकाणी शिक्षण झाले आहे. त्याचे शालेय शिक्षण कराड येथे, तर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण अमरावतीच्या श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात झाले असून त्याने पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे. कुठल्याही शाखेत प्रवेश मिळत असताना त्याने जाणीवपूर्वक स्थापत्य शाखेला प्रवेश घेतला होता.
‘गेल्या वर्षी मी गेट परीक्षाही दिली होती. त्यात माझा देशात दुसरा क्रमांक होता. कोणत्याही आयआयटीमध्ये प्रवेश मिळाला असता. मात्र, या आयईएसच्या निकालाची वाट बघत होतो. मेहनतीच्या जोरावर या परीक्षेत मला यश आले. डिसेंबरमध्ये मला रुजू व्हावयाचे आहे व शासकीय नोकरीत जाण्याचा माझा निर्णय पक्का आहे,’ असे २३ वर्षीय गौरवने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.