‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (आयआयटी) या देशातील अग्रगण्य अभियांत्रिकी संस्थेतील प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या ‘राज्य शिक्षण मंडळा’च्या बारावी (एचएससी) उत्तीर्ण विद्यार्थ्यांना श्रेणीसुधार योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
मार्च-ऑक्टोबर, २०११ आणि मार्च-ऑक्टोबर, २०१२च्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. या विद्यार्थ्यांना फेब्रुवारी-मार्च, २०१३ला होणाऱ्या बारावीच्या परीक्षेत एकाच वेळी सर्व विषय घेऊन श्रेणी सुधारण्याची संधी दिली जाईल. आयआयटी प्रवेशासाठी मुख्य (मेन) परीक्षेतील यशाबरोबरच बारावीचे ४० टक्के गुणही महत्त्वाचे ठरणार आहेत. आयआयटी प्रवेशासाठीचे हे सूत्र या वर्षी जाहीर झाल्यामुळे आधीच्या वर्षी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना समान संधी देण्यासाठी ही योजना राबविण्यात येणार आहे.
‘केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा’ने (सीबीएसई) याबाबत ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’ला कळवून बारावीच्या परीक्षेतील ४० टक्के गुण विचारात घेऊन गुणवत्ता यादी तयार करण्यात सांगितले आहे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह ८ जानेवारीपासून संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात अर्ज सादर करायचे आहेत. नियमित शुल्कासह १२ जानेवारीपर्यंत आणि विलंब शुल्कासह १२ ते १५ जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारले जातील. यानंतर येणारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. मार्च-ऑक्टोबर, २०११, मार्च-ऑक्टोबर, २०१२च्या परीक्षेतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व गणित या विषयाची जुन्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा द्यावी लागेल. विद्यार्थ्यांनी या विषयाचे वेळापत्रक पाहून परीक्षेला हजर राहावे. मात्र, तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण-श्रेणी पूर्वीचीच ग्राह्य़ धरली जाईल.
दहावीच्या विद्यार्थ्यांना श्रेणीसुधारासाठी दोन संधी
दहावी-बारावीच्या परीक्षेत एकाचवेळी सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधार योजनेअंतर्गत सलग दोनवेळा परीक्षेस बसण्याची संधी देण्यात येणार आहे. पूर्वी ही संधी एकदाच देण्यात येत होती. मात्र, या विद्यार्थ्यांना तोंडी-प्रात्यक्षिक परीक्षेस प्रत्येक वेळी नव्याने प्रविष्ठ व्हावे लागेल.