शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संचमान्यतेस लागणारा विलंब टाळण्यासाठी राज्यातील सर्व अनुदानित शाळा आणि महाविद्यालये ऑनलाईनच्या माध्यमातून जोडण्यात येत असून येत्या शैक्षणिक वर्षांपासून १५ ऑगस्टपूर्वी संच मान्यतेची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. तसेच अतिरिक्त ठरलेल्या एकाही शिक्षकांचा पगार रोखला जाणार नाही, सर्व शिक्षकांना वेतन देण्यात येईल असे आश्वासन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी गुरूवारी विधानपरिषदेत दिले.
   अतिरिक्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबतचा प्रश्न कपिल पाटील, विक्रम काळे, आदी सदस्यांनी उपस्थित केला होता. सन २०१२-१३ची संचमान्यता चालू शैक्षणिक वर्ष संपत आले तरी झालेली नाही, तसेच यंदाच्या वर्षीचीही संचमान्यता अद्यापही झालेली नाही. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन लवकर करण्यात यावे अशी मागणी सदस्यांनी केली. त्यावर समायोजन, संचमान्यता यांची प्रक्रिया रखडल्याची कबुली देताना यापुढे ही प्रक्रीया बदलली जाईल असेही तावडे यांनी स्पष्ट केले. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतर त्या शिक्षकांना शाळेमध्ये सामावून घेणे बंधनकारक आहे, पण जे संस्थाचालक नियमांचे पालन करीत नाहीत आणि पळवाटा शोधून काढतात त्या संस्थाचालकांविरुध्द कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.   
शासनमान्य अनुदानित संस्थामधील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्यासाठी तसेच वैद्यकीय देयकाच्या प्रतिपूर्तीसाठी ३ टक्के रक्कम देण्याची अट रद्द करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. तसेच शिक्षकांसाठी लवकरच कॅशलेस योजना सुरु करणार असून लवकरच याबाबतचे आदेश काढण्यात येईल असेही तावडे यांनी सांगितले.