महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा तेरावा दीक्षांत सोहळा शनिवारी होणार असून त्यात विविध विद्याशाखांच्या एकूण सहा हजार ७१० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी विविध विद्याशाखांमधील गुणवत्ताप्राप्त केलेल्या ४७ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदक देण्यात येणार आहे.
या बाबतची माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. के. डी. गर्कळ यांनी दिली. आरोग्य विद्यापीठाच्या मुख्यालयातील शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनीत होणाऱ्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा विद्यापीठाचे प्र-कुलपती जितेंद्र आव्हाड राहणार आहेत.
0यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. विश्वमोहन कटोच आणि मध्यप्रदेश वैद्यकीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. पी. लोकवानी, आरोग्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर आणि प्रतिकुलगुरू डॉ. शेखर राजदेरकर उपस्थित राहणार आहेत.
या दीक्षांत सोहळ्यात हिवाळी २०१२, उन्हाळी २०१३ आणि हिवाळी २०१३ मध्ये घेतलेल्या पदवीका, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षांमध्ये उत्तीर्ण होऊन आंतरवासीयता पूर्ण केलेल्या आरोग्य शाखांच्या एकूण ६,७१० विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान केल्या जाणार आहेत.

आम्ही डॉक्टर झालो!
आधुनिक वैद्यक विद्याशाखा पदवी २६६१ ( पदव्युत्तर १५० विद्यार्थी), दंत वैद्यक विद्याशाखा ४१५ (१५), आयुर्वेद विद्याशाखा ११२४ (३०१), युनानी विद्याशाखा १२५ (५), होमिओपॅथी विद्याशाखा ९५९ (५३), बीपीटीएस ३६९ (३४) यांच्यासह इतर काही अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.