मुंबई विद्यापीठाच्या ‘दूर व मुक्त अध्ययन संस्थे’च्या (आयडॉल) सर्व अभ्यासक्रमांकरिता मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सरकारकडून शुल्क प्रतिपूर्ती हवी असल्यास प्रवेशापूर्वीच समाजकल्याण विभागाकडे नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु, समाजकल्याण विभागाने योजनेकरिता अर्ज करण्याची प्रक्रिया अद्याप सुरूच न केल्याने आयडॉलच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची शेवटची तारीख दोन दिवसांवर आली तरी एकाही मागासवर्गीय विद्यार्थ्यांला प्रवेश घेता आलेला नाही. त्यामुळे, आयडॉलला प्रवेशाची मुदत आणखी महिनाभराने वाढवावी लागली आहे.
शुल्क प्रतिपूर्ती योजनेकरिता समाजकल्याण विभागाकडे ऑनलाइन अर्ज सादर करावा लागतो. हा अर्ज सादर केल्यानंतर विभागातर्फे मिळणारा नोंदणी क्रमांक आयडॉलकरिता ऑनलाईन प्रवेश घेताना अर्जावर सादर करण्याचे बंधन विद्यार्थ्यांवर घालण्यात आले आहे. परंतु, समाजकल्याण विभागाची शुल्क प्रतिपूर्तीकरिता अर्ज करण्याची प्रक्रिया मुळातच ऑगस्ट महिन्यात किंवा त्यानंतरच सुरू होते. परंतु, ही गोष्ट ध्यानात न घेताच आयडॉलने वरातीमागून घोडे प्रकारातला निर्णय घेत आपल्या ऑनलाइन अर्जामध्ये समाजकल्याणचा नोंदणी क्रमांक लिहिणे बंधनकारक केल्याने एकाही मागासवर्गीय विद्यार्थ्यांला आयडॉलमध्ये प्रवेश घेता आलेला नाही.
आयडॉलतर्फे १४ वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यासक्रम चालविले जातात. त्यांचे शुल्क चार हजारापासून १६ हजार रुपयांपर्यंत आहे. पण शुल्क प्रतिपूर्ती योजनेमुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अवघ्या ३०० ते ७०० रुपये शुल्कात हे अभ्यासक्रम पूर्ण करता येतात. परंतु, आयडॉलने घालून ठेवलेल्या या घोळामुळे हे विद्यार्थी विनाकारण प्रवेशापासून वंचित राहिले आहेत, अशी टीका ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने’चे संतोष गांगुर्डे यांनी केली आहे.
आयडॉलची प्रवेशाची मुदत २५ जुलैला संपणार होती. परंतु, या घोळामुळे विनाविलंब शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत आता १९ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यानंतर विलंब शुल्कासह मर्यादीत मुदतीपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज सादर करता येतील.