केंद्रीय विद्यालयात संस्कृत भाषा अकरावी व बारावीपासून शिकवण्याचा निर्णय घेऊन मनुष्यबळ मंत्रालयाने आणखी एक नवीन वाद निर्माण केला आहे. केंद्रीय विद्यालयात तृतीय भाषा म्हणून जर्मनऐवजी संस्कृत भाषा शिकवण्याच्या वादातील अनेक प्रश्न अनुत्तरित असतानाच हा निर्णय घेण्यात आला आहे.
सर्व केंद्रीय विद्यालयांना पाठवण्यात आलेल्या संदेशात म्हटले आहे, की अकरावी व बारावीसाठी संस्कृत शिकवण्यासाठी या विद्यालयांनी शिक्षकांची भरती करावी.
अधिकाऱ्यांनी सांगितले, की संस्कृत हा ऐच्छिक विषय  असला तरी तो फार गांभीर्याने घेतला जात नाही व संस्कृतचे शिक्षक भरले जात नाहीत. संस्कृत शिक्षकांची भरती १९८० पासून बंद झाली आहे, संस्कृतचे पुनरुज्जीवन केल्याने अकरावी व बारावीसाठी संस्कृत शिकवण्याचा निर्णय २७ ऑक्टोबरला केंद्रीय विद्यालयाच्या मंडळाच्या ९९ व्या बैठकीत घेण्यात आला. मंडळाने असा प्रस्ताव मांडला, की २०१५-१६ पासून अकरावी व बारावीला संस्कृत शिकवण्यात यावे, पर्याय म्हणून संस्कृत विषय असलाच पाहिजे. सुरुवातीला कंत्राटावर का होईना संस्कृत शिक्षकाची नेमणूक केली पाहिजे.
केंद्रीय विद्यालयात तिसरी भाषा म्हणून जर्मनऐवजी संस्कृत भाषा आणण्याचा निर्णय सरकारने यापूर्वीच घेतला असून जर्मन भाषा शिकवणे हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या विरोधात आहे, असे मत मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी व्यक्त केले होते.