आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय ख्यातीच्या संशोधक आणि अभ्यासकांसोबत संवाद साधण्याची संधी अभ्यासकांना मुंबईत लवकरच भरणाऱ्या ‘भारतीय विज्ञान परिषदे’च्या निमित्ताने मिळणार आहे.
मुंबईची ‘वित्तीय राजधानी’ या ओळखीसह ‘विज्ञान शहर’ म्हणून नवी ओळख ठसविण्याचा प्रयत्न आहे. मुंबईत ४५ वर्षांनी भरणाऱ्या या १०२व्या परिषदेचे आयोजन मुंबई विद्यापीठाने केले आहे. ३ ते ७ जानेवारी दरम्यान विद्यापीठाचे कलिना व फोर्ट संकुल, बीकेसीचे मैदान, नेहरू विज्ञान केंद्र अशा विविध ठिकाणी या परिषदेतील विविध कार्यक्रम होतील. परिषदेत सुमारे १२ हजार प्रतिनिधी सहभागी होतील. ‘मानवी विकासासाठी विज्ञान-तंत्रज्ञान’ हा या परिषदेचा विषय असणार आहे.
३ जानेवारीला सकाळी कलिना संकुलात होणाऱ्या उद्घाटन कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री हर्षवर्धन आणि मानव विकास मंत्री स्मृती इराणी या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. या शिवाय पाच दिवस विविध विषयांवर होणाऱ्या चर्चासत्रांच्या व व्याख्यानांच्या निमित्ताने या परिषदेला देशभरातील सात पारितोषिक विजेते हजेरी लावणार आहेत. यात कैलाश सत्यार्थी आणि बांगलादेशचे मोहम्मद युनुस यांचाही समावेश असेल.
एपीजे अब्दुल कलाम, अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, इस्त्रोचे अध्यक्ष के. राधाकृष्णन आदी मान्यवर व्याख्याने यामध्ये होणार आहेत. परिषदेच्या अधिक माहिती आणि व्याख्यानाच्या वेळा ६६६.्र२ू102.्रल्ल या संकेतस्थळावर उपलब्ध होऊ होतील, असे आयोजकांनी सांगितले. बीकेसीच्या एमएमआरडीए मैदानावर विज्ञान आणि तंत्रज्ञानात भारतीय संस्था व कंपन्यांनी केलेल्या संशोधनावर आधारलेले भव्य प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे.