मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर बीडमधील ‘आदित्य दंत महाविद्यालया’ची चौकशी करण्याचा निर्णय ‘वैद्यकीय शिक्षण विभागा’ने घेतला खरा, पण चौकशीचे काम अत्यंत धीम्या गतीने पुढे जात असल्याने आपल्याला न्याय मिळणार तरी कधी असा प्रश्न या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पडला आहे. १५ जानेवारीला विद्यार्थिनींनी खासदार संजय निरूपम आणि ‘फोरम फॉर फेअरनेस इन एज्युकेशन’चे अध्यक्ष जयंत जैन यांच्यासह मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. मुख्यमंत्र्यांच्या आदेशावर तब्बल महिनाभराचा काळ घालवून विभागाने चौकशीचे आदेश काढले. पण, त्यानंतरही चौकशीचे काम धीम्या गतीने पुढे जात असल्याने विद्यार्थी हवालदील झाले आहेत. शैक्षणिक व भौतिक सुविधांची कमतरता आणि महाविद्यालयाकडून विद्यार्थिनींना दिली जाणारी गैरवर्तणूक या दोन स्वतंत्र बाबी करून विभागाने सरकारी दंत महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांमार्फत चौकशी करण्याचा निर्णय गेल्या आठवडय़ात घेतला. औरंगाबादचे डॉ. एस. आर. बारपांडे आणि लातूरच्या डॉ. दिप्ती डोणगावकर यांच्यामार्फत ही चौकशी करण्यात येणार आहे. पण, अधिष्ठात्यांनी आठवडाभर चौकशीला सुरूवातच केला नाही. दरम्यान, ‘चौकशी पूर्ण झाली असून विभागाला अहवाल सादर केला जाईल,’ असे डॉ. बारपांडे यांनी सांगितले. पण, लैंगिक छळवणुकीसंदर्भातील चौकशी अद्याप सुरू झालेली नाही.