शाळेने सांगितलेले शुल्क भरा, अन्यथा विद्यार्थ्यांला शाळेतून काढून टाकले जाईल, असा पवित्रा बोरिवली येथील जेबीसीएन आंतरराष्ट्रीय शाळेने घेतल्याने पालका आणि शाळा व्यवस्थापनातील वाद अधिकच तीव्र झाला आहे.
    शाळा व्यवस्थापन पालकांकडून जे बेकायदा शुल्क वसूल करत आहे, ते शुल्क भरण्यास काही पालकांनी विरोध केला आहे. यातून शाळा व्यवस्थापन आणि पालक यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू आहे.

जेबीसीएन शाळेमध्ये प्रवेशाच्या वेळी पालकांना शाळेत पायाभूत सुविधा व उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी ५० ते ६० हजार रुपयांच्या दरम्यान शुल्क आकारले जाईल व या शुल्कात प्रत्येक वर्षी ५ ते १० टक्क्यांनी वाढ केली जाईल असे आश्वासन शाळा व्यवस्थापनाने दिले होते. परंतु, शाळा सुरू झाल्यानंतर शाळा प्रशासनाने पालकांना दिलेले आश्वासन धुडकावून मनमानी कारभारास सुरुवात केली आणि विद्यार्थ्यांचे ‘पायोनिअर’ आणि ‘नॉन पायोनिअर’ असे गट केले. यानंतर पायोनिअर गटात मोडणाऱ्या विद्यार्थ्यांकडून वर्षांला ६८ हजार रुपये तर नॉन पायोनिअर गटातील विद्यार्थ्यांकडून १ लाख १७ हजार रुपये शुल्क आकारण्यात आले. यामुळे एकाच वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शुल्कात दरी निर्माण केल्याचे पालकांचे म्हणणे आहे. नॉन पायोनिअर गटातील काही पालकांनी शाळेच्या या मनमानी कारभाराला विरोध करत केवळ ६८ हजार रुपये शुल्क भरण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे पालकांनी शुल्क भरलेही, मात्र त्यावरील शुल्क भरले नाही तर पुढील शैक्षणिक वर्षांपासून प्रवेश रद्द करण्याचा इशारा शाळा व्यवस्थापनाने पालकांना लेखी पत्र लिहून दिला आहे.
आपल्या मागण्यांसाठी पालक गुरुवारी महाराष्ट्र नव निर्माण विद्यार्थी सेनेतर्फे शाळेसमोर आंदोलन करणार आहेत.

पालकांच्या प्रमुख तक्रारी
*पालक व मुलांमध्ये ‘पायोनिअर’ आणि ‘नॉन पायोनिअर’निमित्ताने भेदभाव
*साल २०१४-१५ मध्ये वरिष्ठ केजीमधून इयत्ता पहिलीत जाताना फक्त नॉन पायोनिअर पालकांना ७० टक्के शुल्कवाढ
*शाळेद्वारे चार हजार रुपयांपर्यंतचा गणवेश व सुमारे २० हजार रुपयांपर्यंतचे शैक्षणिक साहित्य घेण्याची सक्ती
*शाळेत पालक-शिक्षक समितीची कायद्याप्रमाणे निवड नाही