मुंबई विद्यापीठाच्या जमनालाल बजाज व्यवस्थापन शिक्षण संस्थेच्या (जेबीआयएमएस) विकासासाठी माजी विद्यार्थी सरसावले आहेत. त्यांनी कालिना येथील विद्यानगरीत नवी वास्तू उभारण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले असून तब्बल ८५ कोटींचा निधी उभा केला आहे.
जमनालाल बजाज संस्थेतून आजपर्यंत अनेक यशस्वी व्यवस्थापक विविध उद्योगांना मिळाले आहेत. यातील नीरज बजाज, चंदा कोचर, अजय पिरामल, उदय कोटक, सॅम बलसारा, नोशीर काका, हरीश मनवानी यांनी पुढाकार घेऊन ही संस्था साकारण्याचे ठरविले आहे. यासाठी निधी व्यवस्थापनापासून ते संस्थेच्या उभारणीसाठीच्या विविध जबाबदाऱ्याही विद्यार्थ्यांंनी वाटून घेतल्या आहेत. विद्यानगरी संकुलात जागतिक दर्जाची व्यवस्थापन संस्था उभारण्यासाठी स्थाननिश्चितीसाठी बुधवारी माजी विद्यार्थ्यांची कुलगुरू डॉ. राजन वेळूकर, प्र-कुलगुरू डॉ. नरेश चंद्र, विद्यापीठ आणि महाविद्यालये विकास मंडळाचे संचालक डॉ. राजपाल हांडे, कुलसचिव डॉ. एम. ए. खान, जेबीआयएमएसच्या संचालक डॉ. कविता लघाटे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यात परवडणाऱ्या दरामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून दिले जाणार असून त्यांना शिष्यवृत्ती योजनाही उपलब्ध करून देण्याचे ठरले. या संस्थेमुळे मुंबईतील विद्यार्थ्यांना येथेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळणे शक्य होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.