राज्यातील अभियांत्रिकी प्रवेशासाठी केंद्रीय पातळीवर घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेचा निकाल (जेईई – मुख्य परीक्षा) सोमवारी जाहीर झाला असून या वर्षी परीक्षेचा कट ऑफ १० गुणांनी घसरला आहे.
    या वर्षी १०५ गुणांचा कट ऑफ आहे, तर गेल्यावर्षी ११५ गुणांचा कट ऑफ होता. या परीक्षेत गुणांची घसरगुंडी झाल्यामुळे या वर्षी राज्यातील प्रवेशासाठी बारावीच्या गुणांचे महत्त्व वाढण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यत येत आहे.
देशातील अभियांत्रिकी आणि विज्ञान शिक्षणाच्या प्रमुख केंद्रीय संस्थांबरोबर राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांचे प्रवेशही गेल्या दोन वर्षांपासून जेईई मुख्य परीक्षेतील गुणांच्या आधारे करण्यात येतात. केंद्रीय संस्थांमधील प्रवेशासाठी अ‍ॅडव्हान्स परीक्षा घेतली जाते. या वर्षी मेन्ससाठी देशभरातून १२ लाख ९२ हजार ७११ विद्यार्थी बसले होते. या वर्षी जेईईचा कट ऑफ हा १० गुणांनी कमी झाला आहे. एकूण ३६० गुणांच्या या परीक्षेत खुल्या गटातून १०५ गुण, इतर मागासवर्गीय (ओबीसी) गटातून ७० गुण, अनुसूचित जाती वर्गातून (एससी) ५० गुण आणि अनुसूचित जमाती वर्गातून ४४ गुण मिळालेले विद्यार्थी अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.
गेल्यावर्षीचा खुल्या वर्गाचा कट ऑफ ११५ होता. देशभरातून १ लाख ५२ हजार ४०१ विद्यार्थी अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. त्यापैकी साधारण ४ हजार विद्यार्थी महाराष्ट्रातील असल्याचा दावा करण्यात येत आहे.
या वर्षी मुख्य परीक्षेत गुणांची घसरगुंडी झाल्यामुळे त्याचा परिणाम राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेवरही होणार आहे. राज्यातील प्रवेश प्रक्रियेसाठी जेईई आणि बारावीच्या गुणांना समान महत्त्व आहे. मात्र, जेईईच्या गुणांमध्ये घसरण दिसत असल्यामुळे राज्याच्या प्रवेश प्रक्रियेसाठी बारावीच्या गुणांचे महत्त्व वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

या वर्षी भौतिक शास्त्रची परीक्षेची काठिण्यपातळी वाढली होती. त्याचा परिणाम आता कट ऑफ वर दिसतो आहे. अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी महाराष्ट्रातून पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणात फारसा बदल असण्याची शक्यता नाही. राज्यातील साधारण अडीच लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी बहुतेक विद्यार्थी हे १०० गुणांच्या आतील आहेत. ज्या विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेत ७० टक्क्य़ांपेक्षा अधिक गुण मिळतील, त्यांना चांगल्या महाविद्यालयांत प्रवेश मिळू शकेल.
दुर्गेश मंगेशकर, संचालक आयआयटी प्रतिष्ठान

परीक्षेचा निकाल http://jeemain.nic.in/,  http://cbseresults.nic.in/ या संकेतस्थळांवर पाहता येईल.