सर ज. जी. कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना गुरुवारी शिक्षक मिळतील, असे आश्वासन देऊन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी सभेतून त्यांची बोळवण केली होती. मात्र गुरुवार संपला तरी मागण्यांचा विचार करण्यासाठी कुणीही न फिरकल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. परिणामी सर्व मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी कायम ठेवला आहे.
सरकारी अनास्थेमुळे झालेली महाविद्यालयाची ही दूरवस्था पाहून माजी विद्यार्थीही या संपकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. गुरुवारी महाविद्यालयात ६० वर्षांपर्यंतचे माजी विद्यार्थी उपस्थित होते आणि त्यांनी विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी मार्गदर्शन केल्याचे माजी विद्यार्थी व ज. जी. कृती समितीचे निलेश किंकळे यांनी सांगितले. शिक्षकांचा प्रश्न गेली अनेक वष्रे रखडलेला आहे. विद्यार्थ्यांच्या इतर मागण्याही रास्त असल्याचा दावा त्यांनी केली. शासनाने सर्वप्रथम पूर्णवेळ कला संचालकाची नेमणूक करावी. हा कला संचालक कला शिक्षण घेतलेलाच असावा, अशी आजी आणि माजी विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे. सध्याचे कला संचालक प्रभारी असून ते अभियांत्रिकी पदवीधर आहेत. यामुळे या पदाबाबत तातडीने विचार व्हावा अशी मागणीही किंकळे यांनी केली. २-३ दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन रस्त्यावर येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
मागण्या होईपर्यंत आंदोलन
आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे महाविद्यालयाचा जीएस नील सालेकरने सांगितले. शिक्षकांची नियुक्तीबाबत काय झाले यासंदर्भात महाविद्यालय प्रशासन व मंत्र्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही.