पुण्यातील कमिन्स महाविद्यालय आणि ऑस्ट्रेलियातील ‘ल ट्रोब’ विद्यापीठामध्ये सामंजस्य करार झाला असून आता कमिन्स महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीच्या अभ्यासक्रमाचा काही भाग ऑस्ट्रेलियामध्ये पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे.
ऑस्ट्रेलियातील ‘ल ट्रोब’ विद्यापीठाने दुसऱ्या टप्प्यात भारतातील विद्यापीठांशी सामंजस्य करार केले असून, त्यामध्ये पुण्याच्या कमिन्स महाविद्यालयाचा आणि म्हैसूर येथील जेएसएस विद्यापीठाचा समावेश आहे. या शिक्षणसंस्था आणि ‘ल ट्रोब’ विद्यापीठ यांच्यामध्ये आदान-प्रदान कार्यक्रम आणि संशोधन प्रकल्प राबवण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे भारतात ‘सेंटर फॉर अ‍ॅग्रिबायो सायन्स’ या संशोधन केंद्राची उभारणीही ‘ल ट्रोब’ ने केली आहे.
‘ल ट्रोब’ शी सहकार्य करार केलेल्या शिक्षणसंस्थांमधील विद्यार्थी आणि संशोधकांना या संशोधन केंद्रामध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात महिंद्रा रेवा, एचसीएल या कंपन्यांशी आणि बिट्स पिलानी, दिल्ली टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी, आयआयटी मद्रास, बंगळुरू येथील प्रेसिडेन्सी कॉलेज या शिक्षण संस्थांशी ‘ल ट्रोब’ ने सामंजस्य करार केले होते.