विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरची वाट निवडण्याबरोबरच या प्रक्रियेत पालकांची भूमिका काय असावी, या विषयी मार्गदर्शन करणाऱ्या ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या दोन दिवसांच्या परिषदेला उद्यापासून (गुरुवार) सुरुवात होणार आहे.
व्हीआयटी युनिव्हर्सिटी प्रस्तुत आणि विद्यालंकार यांच्या सहकार्याने ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे होणाऱ्या या परिषेदत दोन दिवस तज्ज्ञ करिअरसंबंधी विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. शुक्रवार ३१ ऑक्टोबरलाही ही परिषद पार पडणार आहे. आतापर्यंत अनेक जणांनी नोंदणी केली असून कार्यक्रमाच्या दिवशी प्रवेशिकेसह प्रथम येणाऱ्यांनाच प्राधान्य दिले जाणार आहे.
अनेकदा माहितीच्या अभावी करिअरच्या त्याच त्याच वाटा चोखाळल्या जातात. या मळलेल्या वाटांशिवायही यशाचे अनेक मार्ग आहेत, याची माहिती या दोन दिवसांत करून दिली जाईल.  गुरुवार आणि शुक्रवार या दोन्ही दिवशी पहिल्या सत्रात डॉ. हरीश शेट्टी ‘अभ्यास व करिअरसंबंधी ताणतणावांचा सामना कसा करावा’ हा विषय मांडणार आहेत. मुलांच्या करिअरच्या बाबतीत पालक आणि मुले यांनी एकत्र येऊन कसे निर्णय घ्यावेत, मुलांनी करिअर निवडल्यानंतर पालकांनी पाठिंबा कसा द्यावा, करिअरच्या बाबतीत येणाऱ्या विविध अडचणींवर मानसिकदृष्टय़ा मात कशी करता येईल, यावर शेट्टी मार्गदर्शन करतील.
त्यानंतर ‘पाल्याच्या करिअरमध्ये पालकांची भूमिका कोणती?’ या विषयावर मिथिला दळवी बोलतील. अपयश म्हणजे रस्ता संपणे नव्हे, तर ती नव्या रस्त्याची सुरुवात आहे, हा विश्वास पालकांनी आपल्या पाल्याला कसा द्यावा, यावर या सत्रात भर दिला जाईल, तर शेवटच्या सत्रात ग्रोथ सेंटरच्या करिअर समुपदेशक मुग्धा शेटय़े व स्नेहल महाडिक ‘१०वी-१२वी नंतर कला, वाणिज्य, विज्ञान या शाळांतील विविध पदवी अभ्यासक्रमांची ओळख’ करून देणार आहेत. विज्ञान शाखेत वैद्यकीय आणि अभियांत्रिकी यांव्यतिरिक्त पर्यायांची चर्चा होणार आहे. तसेच आर्किटेक्चर, मीडिया यांच्यासह इतरही ऑफबिट करिअरबाबत सखोल माहिती या सत्रात घेता येईल.
संधी सोडू नका!
*३० व ३१ ऑक्टोबरच्या कार्यक्रमाच्या प्रवेशिका ठाणे येथे टिपटॉप प्लाझा (तीन हात नाक्याजवळ) मिळतील.
*३१ ऑक्टोबरच्या कार्यक्रमाच्या प्रवेशिका विद्यालंकार, ईशान आर्केड-२, तिसरा मजला, हनुमान मंदिरासमोर, गोखले रोड येथे सकाळी १० ते सायं. ६.०० वाजेपर्यंत ५० रुपये दरांत उपलब्ध आहेत.