कर्मचारी निवड आयोगातर्फे १२ एप्रिल रोजी संयुक्त पदवी पातळीची परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये महाराष्ट्राला कठीण प्रश्नपत्रिका देण्यात आल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केला आहे.
या संदर्भात मनविसेच्या शिष्टमंडळाने आयोगाच्या विभागीय संचालकांची भेट घेऊन एक निवेदन सादर केले. सरकारी नोकऱ्यांमध्ये उत्तर भारतीयांचे वर्चस्व कायम राहावे यासाठी आयोगाने हा प्रयत्न केल्याचा आरोपही मनविसेने निवेदनातून केला आहे.
याचबरोबर महाराष्ट्रातील प्रश्नपत्रिकेत गणिताचा एक प्रश्न वाचण्यासाठी जेवढा वेळ लागत होता तेवढय़ा वेळात उत्तर भारतात देण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेमधील दोन प्रश्न सोडवून होत होते असेही नमूद केले आहे. पेपरफूटीच्या नावाखाली उत्तर भारतात फेरपरीक्षा घेऊन काठिण्यपातळी तुलनेत कमी असलेले प्रश्न विचारण्यात आल्याचा आरोपही त्यांनी निवेदनात केला आहे. मराठी तरुणांवरील हा अन्याय तातडीने दूर करावा अन्यथा आम्ही आंदोलन करू असा इशारा मनविसेनेतर्फे देण्यात आला आहे.
या शिष्टमंडळात अधिसभा सदस्य सुधाकर तांबोळी, उपाध्यक्ष चेतन पेडणेकर, विद्यापीठ सरचिटणीस संतोष गांगुर्डे, र्काकारणी सदस्य संतोष राणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, प्रश्नपत्रिका तयार करण्याचे काम आयोगाच्या दिल्लीच्या कार्यालयातून होते. विभागीय कार्यालये केवळ परीक्षा घेण्याचे काम करत असतात. याप्रकरणी आलेल्या शिष्टमंडळाबाबत मुख्य कार्यालयाला कळविले जाईल असे विभागीय संचालक जगताप यांनी स्पष्ट केले.