राज्य शासनातर्फे मराठी भाषेसाठी र्सवकष धोरण लवकरच आणले जाणार आहे. याबाबतचा मसुदा मराठी भाषा विभागाच्या संकेतस्थळावर टाकण्यात आला असून या धोरणाबाबत सर्वसामान्य नागरिकांनीही आपला अभिप्राय आणि सूचना नोंदवाव्यात, असे आवाहन सांस्कृतिक कार्य व मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी मुंबईत केले.
महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाने तयार केलेल्या विश्वकोशाच्या २० व्या खंडाच्या पूर्वार्धाचे प्रकाशन लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन आणि तावडे यांच्या हस्ते सहय़ाद्री विश्रामगृहात एका कार्यक्रमात झाले. त्या वेळी ते बोलत होते. विश्वकोश मंडळाच्या अध्यक्षा डॉ. विजया वाड, खासदार अरविंद सावंत आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. मराठी कुमार विश्वकोशाच्या ध्वनिफितीचे प्रकाशनही या वेळी करण्यात आले.
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्वानी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक असून मराठी भाषेसाठी आग्रह धरणे गरजेचे आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगून तावडे म्हणाले, मराठी विश्वकोश आणि कुमार विश्वकोश हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या शाळांमधील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, जेणेकरून त्याचा फायदा खेडय़ापाडय़ांतील विद्यार्थ्यांना होईल.
तर विश्वकोशाच्या २० व्या खंडाच्या उत्तरार्धाचे प्रकाशन एका जाहीर कार्यक्रमात करावे म्हणजे मराठीप्रेमी आणि अभ्यासकांना या कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने उपस्थित राहता येईल. मराठी भाषा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्यासाठीही प्रयत्न केले जावेत, अशी सूचना लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी केली.