केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या मार्च, २०१५च्या दहावी परीक्षेत ९९.४६ टक्के निकाल नोंदवीत महाराष्ट्राने भरीव कामगिरी नोंदवली आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्रातील निकालाची टक्केवारी ९८.८९ इतकी होती. या वर्षी देशस्तरावरील निकाल मात्र किंचितसा घसरला आहे. सीबीएसईचा यंदाचा निकाल ९७.३२ टक्के लागला आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण ९८.८७ टक्के इतके होते.
सीबीएसईचा निकाल श्रेणीनिहाय जाहीर केला जातो. त्यापैकी १०.० ही सवरेत्कृष्ट श्रेणी (सीजीपीए) या वर्षी एकूण ९४,४७४ विद्यार्थ्यांनी मिळविली आहे. त्यात ४९,३९२ इतके मुलगे आहेत. तर मुलींची संख्या ४५,०८२ इतकी आहे. त्या खालोखालचा ९.८ सीजीपीए असलेल्या १७,७७७ मुली आहेत. तर १८,७१९ इतके मुलगे आहेत. त्यानंतरही ९.६ सीजीपीए असलेल्या मुली २०,१३७ आणि मुलगे २२,९८१ आहेत. सीबीएसई १० विभागनिहाय निकाल जाहीर करते. यात बारावीप्रमाणेच तिरुवअनंतपुरम विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे ९९.७७ टक्के इतका आहे. सर्वात कमी निकाल गुवाहाटीचा (८६.५५टक्के) आहे. तर महाराष्ट्र ज्या विभागात समाविष्ट आहे तो चेन्नई विभाग ९९.०३ टक्के निकाल नोंदवून दुसऱ्या स्थानावर आहे.

संकेतस्थळ मंदावलेले
सीबीएसईने दुपारच्या सुमारास ऑनलाइन निकाल जाहीर करणार असल्याचे सांगितले होते. मात्र, सायंकाळी सुमारे सहा वाजेपर्यंत मंडळाचे संकेतस्थळ मंदावलेले होते. त्यामुळे विद्यार्थी-पालकांबरोबरच शाळांनाही निकाल जाणून घेण्यात अडचणी आल्या. अखेर सहानंतर संकेतस्थळ काम करू लागले.

मंडळाची भूमिका प्रसिद्धीपत्रकातही
दहावी-बारावीच्या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांवर येणारा अनावश्यक ताण कमी करण्याचे प्रयत्न गेली अनेक वर्षे सीबीएसई करीत आहे. मंडळ आपल्या या भूमिकेशी किती ठाम आहे, याचे प्रत्यंतर प्रसारमाध्यमांकरिता काढण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकावरूनही येते. यात अमुक इतके विद्यार्थी नापास असा उल्लेख कुठेही करण्यात आलेला नाही. अमुक इतके विद्यार्थी पुढील अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत, असा नमूद करून मंडळाने अनुत्तीर्ण हा शब्द खुबीने टाळला आहे.

विद्यार्थ्यांची पसंती ‘मंडळ’ परीक्षेलाच
विद्यार्थ्यांवर ‘बोर्डा’च्या परीक्षेचा अकारण ताण येतो म्हणून गेल्या काही वर्षांपासून शाळास्तरावरही परीक्षा घेण्यात येते आहे. यापैकी मंडळ स्तरावरील परीक्षार्थीमध्ये गेल्या वर्षीच्या ६,०९,४६६ वरून ६,६९,७२१ अशी वाढ झाली आहे. तर शाळा स्तरावर परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ७,११,६५२ वरून ६,९६,३६६ अशी घट झाली आहे. मंडळ स्तरावर परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाअभ्यासक्रमासाठी इतर शिक्षण मंडळांशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यास अडचणी येत असल्याने ही घट होते आहे.